रक्षाबंधनानिमित्त माताभगिनींचे मनोगत

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Aug-2021   
Total Views |

women _1  H x W


रक्षाबंधन सणानिमित्त वाटते की, आज महाराष्ट्रात भगिनींच्या मनातले काहीतरी बोलायलाच हवे. महाराष्ट्रातल्या ताईंनो, आयाबायांनो काय चालले आहे? पतीचे, तुमच्या मुलांबाळांचे जगणे ठीक आहे ना? तुम्ही सुखी आहात का? तुमचा संसार कसा चालला आहे? तुम्हाला कोरोना काळात दोन वर्षांत काय वाटले? काय म्हणता, रक्ताचा माणूस कोरोनामुळे अंतिम श्वास घेत असताना तुम्हाला अ‍ॅम्ब्युलन्स मिळाली नाही! दवाखान्यात प्रवेश मिळाला नाही! तुमच्या समोर त्याने तडफडून प्राण सोडला, ते आठवले? कोरोनामुळे वस्तीतले दवाखाने बंद होते. मासिक पाळीत ‘सॅनिटरी पॅड’ही मिळाले नाही की साधी डोकेदुखीवरची गोळीही मिळाली नाही. त्याचा तो मनस्ताप भयंकररीत्या सहन करावा लागला, हे आठवले? केंद्र सरकारने तुम्हाला राशन दुकानात राशन पाठवले. पण ‘आवाज कुणाचा’ म्हणत तुमच्याकडून मते मागून नेता झालेल्यांनी ते राशन स्वत:च्या चमच्यांना वाटले. साधे हक्काचे राशन घेण्यासाठीही तुम्हाला मग या नेत्यामंडळींनी चपला झिजवायला लावल्या, हे आठवले? मास्क घाला, हात धुवा, सॅनिटायझर वापरा, तुम्हाला सांगितले गेले. पण मास्क आणि सॅनिटायझर घेण्यासाठी पैसे नव्हते. ते पैसे मिळवण्यासाठी काम करणे गरजेचे. पण मग मास्क घातला नाही म्हणून तुम्हाला दंड आकारणारे, दंडुके मारण्याची भाषा करणारे, ते लोक आठवले? काय म्हणता, भय, भूक, भ्रष्टाचार यामुळे झालेली वाताहत तुम्हाला आठवली? कोरोनाबद्दल माहिती नाही, याचा गैरफायदा घेऊन त्या निष्पाप मुलीच्या गुप्तांगात नळी टाकणारे, तिचे शोषण करणारे आठवतात. कोरोना झाला असताना ‘कोरोना सेंटर’मध्येही बलात्कार होणार्‍या त्या निष्पाप आयाबहिणी आठवतात? काय म्हणता, रक्षाबंधनच्या पवित्र दिवशी तुम्हाला हे काही काही आठवायचे नाही. काय म्हणता, येणार्‍या मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये या सगळ्या प्रश्नांची उत्तरे देणार आहात? दोन वर्षांत राज्य सरकारने तुम्हाला जे दिले आहे, त्याची सव्याज परतफेड करणार आहात? ठीक आहे. यापुढे तरी असे काही घडो की, पुढच्या रक्षाबंधनापर्यंत तुम्हाला महाराष्ट्राबाबत काहीतरी चांगले आठवेल.
 
 


पण लक्षात कोण घेतो?
 

 
तिसरी लाट येणार, असे भाकित केले होते. ‘फेसबुक लाईव्ह’ करून करून असे सारखे सांगितले जात होते की, पावसाच्या जशा सरीवर सरी येतातच, तसे महाराष्ट्राच्या भाळी या कोरोनाच्या लाटेचा रतीब घालण्याचा यांचा मनसुबा दिसतोय. आता कोरोनाची लाट की, ‘लॉकडाऊन’ची लाट? हे मोठे प्रश्नचिन्ह आहे. कोरोनाला रोखण्यासाठी ‘लॉकडाऊन’ लावले. लोकांच्या रोजीरोटी चिरडून टाकल्या. पण कोरोना गेला का? कोरोनाचे भय इथले संपत नाही म्हणण्यापेक्षा भय इथले संपवले जाते का? नाही, ज्या सामाजिक व्यवस्थांमुळे सामान्यांच्या मनाला आनंद, समाधान, आत्मविश्वास मिळायचा, त्या धार्मिक व्यवस्था आणि त्यावर काटेकोर बंधन सुरूच आहेत. मंदिरं आणि मदिरालयं यातील मदिरालयांना मोकळीक आहे आणि मंदिरं मात्र टाळेबंदीत. तुम्ही आंदोलनं करा, मोर्चे काढा की, आणखी काही काही करा. तुमची मंदिरं बंद म्हणजे बंद. देवाला कोंडून ठेवणारे हे अजब शासन. पण याबद्दल बोलले तर कोरोनाचा बाऊ पुढे केला जातो. कोरोना आहे मान्य आहे. जसे कर्करोग, एड्स, क्षयरोग आणि इतर आजार आहेत, तसाच कोरोनाही आजार आहे, हे कुणीही विसरणार नाहीच. पण कोरोना आहे म्हणून माणसाला त्याचे जगणे विसरायला लावणे हे कितपत योग्य आहे? आता कुणी म्हणेल सगळ्या जगात हेच चाललंय यात महाराष्ट्राचा उल्लेख का? तो यासाठी की, कोरोनाविरोधात लढण्यासाठी राज्य सरकारकडे ‘लॉकडाऊन’शिवाय काही अस्त्रच नाही. कोंडून कोंडून माणूस किती दिवस राहणार? ‘पूर्ण लॉकडाऊन’, ‘अंशत: लॉकडाऊन’ हे शब्द आणि त्याची अंमलबजावणी तीही भ्रष्ट अंमलबजावणी पाहून वाटते की, ‘लॉकडाऊन’चा अवतार केवळ सामान्यांचे जगणे निष्प्रभ करण्यासाठी झाला की काय? मुख्यमंत्रीसाहेब आणि सर्व मंत्रिगण सामान्य जनतेच्या नजरेतून पाहा, त्यांना कोरोनाच्या लाटेची भीती नाही. त्यांना भीती आहे, तुम्ही लावलेल्या ‘लॉकडाऊन’मुळे आजची भाकरी उद्या मिळेल की नाही याची. सामान्य जनता तडफडली, मेली, पण लक्षात कोण घेतो?


9594969638
@@AUTHORINFO_V1@@