अफगाणिस्तान : सुवर्णभूमी ते स्मशानभूमी

    21-Aug-2021
Total Views |


aasamant 1_1  H


सुवर्णभूमी अफगाणिस्तानात बघता बघता महिनाभरात केवळ ६०-७० हजार तालिबानी सैन्याने साडेतीन लाखांच्या प्रशिक्षित (?), शस्त्रास्त्रांनी सुसज्ज असलेल्या राष्ट्रीय (?) सैन्यावर विजय मिळविला. ही बाब संरक्षण आणि युद्धतज्ज्ञांसाठी अभ्यासण्याचा विषय राहील. चर्चिलने दुसर्‍या महायुद्धादरम्यान डंकर्कच्या खाडीतून शस्त्रास्त्रे घेतल्याविना सैन्य काढले. त्यावेळी त्याने सांगितले होते की, “मनोबल असलेली मनगटे लढतात, शस्त्रे नाही.” त्याचे पुरेपूर प्रत्यंतर गेल्या महिनाभरात अफगाणिस्तानात दिसले. अफगाणिस्तानात यापुढे काय घडण्याची शक्यता आहे, हे सांगायला कुणा ज्योतिषाची आवश्यकता नाही. यापुढेही अफगाणिस्तान स्मशानभूमीच राहिले तर आश्चर्य वाटायला नको. एके काळी सुवर्णभूमी असलेल्या अफगाणिस्तानची स्मशानभूमीकडे झालेल्या वाटचालीतून आपल्याला काही धडे घेण्यासारखे आहेत.

अफगाणिस्तान सर्व बाजूंनी भूमिबद्ध (ङरपवश्रेलज्ञशव) असलेला अफगाणिस्तान हा वैदिक काळापासून भारताचा अविभाज्य भाग होता. अफगाणिस्तान अनेक वैदिक ऋषींची जन्मभूमी, कर्मभूमी होता. ऋग्वेदातील नदीसूक्तात (१०.७५) गंगेपासून अफगाणिस्तानात असलेल्या ‘तुष्टोमा’ (आधु. तोची) आणि ‘सुसुर्तु’ (सरदारिया) या नद्यांचे उल्लेख आहेत. इतर काही सूक्तांतून ‘काबूल’, ‘क्रुमू’ (कुर्रम), ‘गोमती’ (गोमल), ‘रसा’ (लघमान) इ. नद्यांचे उल्लेख आहेत. उत्तरेस ‘ऑक्सस’ नदीपर्यंतच्या भूभागात वैदिक संस्कृती नांदत होती. त्याचा ठोस पुरावा देवीसिंग चौहान यांच्या ‘वैदिक आणि शुग्नी भाषा’ (विदर्भ सं. मं. १९९१) या लेखात आहे. ‘ऑक्सस’ नदीच्या पूर्वतीरावर बोलली जाणारी शुग्नीभाषा आणि अफगाणिस्तानातील पश्तू या भाषांतील संस्कृतोद्भव शब्दांवरून ते दिसते. माझ्या ’ढहश अषसहरप उेपपशलींळेप’ (१९९९) या पुस्तकात ऋग्वेदात नमूद केलेला, आर्यांचा ज्या दासांशी संघर्ष झाला, ते दास सिस्तान प्रांतातील आधुनिक दाहमर्द होते. आर्यांनी नष्ट केलेली दासांची शारदीपुरे ही सु-ह-द-गाल नावाच्या टेकड्या; ऋग्वेदातील ‘अपां नपात्’ ही देवता अफगाणिस्तानातील चक्रीवादळ निदर्शक आणि उत्तर अफगाणिस्तानातील बाष्गुल नदीखोरे हा ऋग्वेदाच्या लुप्त झालेल्या बाष्कलशाखेचा प्रदेश इ. गोष्टी मी दर्शविल्या आहेत. वैदिक ऋषींचा सन्मान करून त्यांना भरघोस दान देणार्‍या अफगाणिस्तानातील दात्यांची नावे ऋग्वेदात येतात. ऋ. ५.३० सूक्तात रुशम देशाच्या ऋणंचय राजाने बभ्रू आत्रेय ऋषीला उत्कृष्ट निवासस्थान, सहस्रावधी गायी आणि अन्य संपत्ती दान केल्याचा उल्लेख आहे. रुशम देश माझ्या मते रसा (लघमान) नदीचे खोरे असावा. तो देश सुसंपन्न होता. तिरिंदर पार्शव्य राजाने ऋषींना ३०० अश्व, दहा हजार गाई आणि सुवर्णखचित उंट दान दिल्याचा उल्लेख वत्स काण्व ऋषी करतात (ऋ ८.६.४६-४८). अभ्यवर्ती चायमानाने भरद्वाज बार्हस्पत्य ऋषींना गाई, रथ आणि स्त्रिया आदी दान दिल्याचे उल्लेख (ऋ. ६.२७) आहेत. हे दोन्ही राजे अफगाणिस्तान इराण प्रदेशातील होते. हे पाहता अफगाणिस्तान प्राचीन काळात सुवर्णभूमी होता. अफगाणिस्तान सुवर्णभूमी असल्याचे पुरातत्त्वीय पुरावे सिंधू संस्कृती काळापासून उपलब्ध आहेत. अफगाणिस्तानातील बदक्षान प्रांतात अजूनही नीलमच्या (ङरळिी ङर्रूीश्रळ) खाणीतून उत्खनन चालते. त्याचे नीलमण्यांचे दागिने सिंधू संस्कृतीत मोठ्या प्रमाणावर मिळाले. इराण-अफगाणिस्तानच्या सीमेवरील शोर्तुगाई सिंधू संस्कृतीचे शेवटचे व्यापारी ठाणे होते. थेट मेसोपोटामियापर्यंत सिंधू संस्कृतीचा व्यापार खुष्कीच्या मार्गाने अफगाणिस्तानातूनच होत असे. त्याच मार्गावर इतिहास काळात अतिभव्य बुद्धमूर्तींसाठी प्रसिद्ध असलेले बामियान आहे. या मूर्ती इ.स.च्या पाचव्या शतकादरम्यान कोरल्याचा अंदाज आहे. बामियान परिसरात मिळालेले अवशेष, तेथे बुद्धभिक्षूंसाठी असलेल्या गुंफांमधील समाजाची चित्रणे दर्शवितात की, तो समाज अत्यंत सुसंपन्न होता. भारताप्रमाणेच अफगाणिस्तान सुवर्णभूमी होता.


aasamnt_1  H x  

सोन्याच्या तिलिया टेप येथे दोन कबरींमध्ये मिळालेले दागिने 
 
सुवर्णयुगाचे अवशेष
१९७०च्या दशकात विक्टर सिरियानिडी या रशियन पुरातत्वज्ञाने ‘तिलिया टेप’ या ठिकाणी उत्खनन केले. ‘तिलिया टेप’ याचा अर्थ ‘सोन्याची टेकडी’ असा होतो. हे नाव पडण्याचे कारण स्थानिकांच्या पारंपरिक स्मृतीशी जोडलेले असावे. ‘सोन्याची टेकडी’ खरोखरच सोन्याच्या अवशेषांची खाण निघाली. तेथे कमी नव्हे, २६ हजार सोन्याच्या वस्तू उत्खननात मिळाल्या. स्त्री-पुरुषांना नखशिखांत मढविणारे दागिने मिळाले. सोन्याच्या रत्नजडित मुठी असलेली शस्त्रे, अनेक प्रकारच्या मूर्ती, नाणी असे सोन्याचे भांडार मिळाले. अफगाणिस्तान सुवर्णभूमी असल्याचा हा फार महत्त्वाचा पुरावा आहे. अफगाणिस्तानात इतरत्रही सोन्याची नाणी मिळाली आहेत. तेथे इ. स. १०२६ पर्यंत हिंदूशाहीचे राज्य होते. त्यातील सामंतदेवाचे सुवर्ण नाणे उपलब्ध आहे. मोठ्या प्रमाणात मिळणारी सोन्याची नाणी राज्याच्या सुसंपन्नतेची निदर्शक असतात. ती सुसंपन्नता ११व्या शतकापर्यंत अफगाणिस्तानात होती. ‘अल्बेरुणी’ हा अरब प्रवासी अफगाणिस्तान मार्गे भारतात आला होता. तो नमूद करतो की, वजनमापासाठी हिंदू सोन्याचे नाणे वापरत असत.ही सुबत्ता सोन्याच्या वस्तूंपुरती मर्यादित नव्हती. तेथे विविध कलांचा विकास झाला होता. हिंदू देवदेवतांच्या आणि बुद्ध जीवनाशी संबंधित ऐतिहासिक पाषाणशिल्पे आणि कांस मूर्ती एकेकाळी काबूल वस्तुसंग्रहालयात प्रदर्शित होत्या. अफगाणिस्तानातील सुप्रसिद्ध गांधार शैलीतील शिल्पांची कलाजगतात आगळीवेगळी ओळख होती. तालिबानने कब्जा केल्यावर बामियान बुद्धमूर्तींपाठोपाठ आता त्यांचाही ठावठिकाणा नाही. काही वर्षांपूर्वीच्या बातम्यांनुसार तालिबानी त्या मूर्तींची आंतरराष्ट्रीय बाजारात विक्री करत होते.

 
सामंतदेवाचे अश्वारूढ राजा आणि महादेवाचे वाहन वृषभाचे सोन्याचे नाणे 
 
अफगाणिस्तानची समृद्धी केवळ व्यापारातून आलेली नव्हती. तसे पाहिले तर पावसाची कमतरता असलेल्या अफगाणिस्तानात पाणी अडवून ते भुयारी कालव्यांमधून दूरवर भागात नेण्याचे तंत्र विकसित झाले होते. जवळपास पूर्ण अफगाणिस्तानात कालव्यांचे जाळे पसरले होते. अफगाणिस्तानातील सुकामेवा जगभर निर्यात होत असे. डाळिंबे, द्राक्ष, मनुका, अक्रोड इत्यादींचा त्यात समावेश होता. त्या व्यापारातून समृद्धी अगदी खालच्या स्तरापर्यंत पोहोचली होती. अफगाणिस्तानचा भाग असलेल्या कपिश आणि गांधार या प्रातांचा सर्वांगीण इतिहास नीलिमा सेनगुप्तांच्या ’र्उीर्श्रीीींरश्र कळीीेीूं ेष घरळिीर ॠरपवहरीर ६२०-१०२१ अऊ (१९८४)’ या पुस्तकात वाचायला मिळतो.



Photo 2_1  H x

ब्राह्मीलिपीतील मजकूर आणि धर्मचक्र असलेले सोन्याचे नाणे


शतकानुशतकांची गंडांतरे

भारतावर मुहंमद बीन कासिमने इ. स ७१०च्या दरम्यान राजा दाहिरवर आक्रमण केल्याच्या सुमारासच अफगाणिस्तानवर मुस्लीम आक्रमकांची नजर वळली. शूर अफगाणी लोकांनी त्यांना चांगलीच अद्दल घडविली. पुढची दोन शतके अफगाणिस्तान त्या वावटळींपासून वाचला होता. इसवी सनाच्या दहाव्या शतकाच्या शेवटी मुहंमद गझनीने तेथे सत्ता स्थिर केली. अफगाणिस्तानच्या हिंदूशाहीला ग्रहण लागले. अफगाणिस्तानचा बलाढ्य राजा अनंगपाळ याचा नातेवाईक सुखपाळ याला मुहंमद गझनीने कैद करून मुस्लीम बनविले. सुखपाळाने हिंदू धर्मात परतण्याचा प्रयत्न करताच त्याला जन्मभर कैदेत ठेवले. इथून अफगाणिस्तानात बाटवाबाटवीचे सत्र सुरू झाले. इसवी सन १०१२-१५च्या दरम्यान अनंगपाळ मरण पावल्यानंतर एका दशकातच हिंदूशाहीचे राज्य मुहंमद गझनीने धुळीस मिळविले. सुमारे चार शतकांपूर्वी हूणांच्या टोळधाडींचा समर्थपणे प्रतिकार करून हिंदूशाहीचे राज्य प्रस्थापित झालेल्या अफगाणिस्तानात पुन्हा हिंदूराज्य स्थापन झाले नाही. जे मुस्लिमानांनी इतरत्र केले, तेच त्यांनी अफगाणिस्तानात केले. त्यांनी स्थानिक हिंदू-बौद्ध-पारशी संस्कृतीचा नाश करायला सुरुवात केली. मंदिरे, मूर्तींची तोडफोड केली. विशेष करून बौद्धांना बाटविले. बौद्ध धर्माचे अफगाणिस्तानातून पूर्णपणे उच्चाटन झाले. मात्र, अनेक शतके हिंदू आपले अस्तित्व टिकवून होते. मुहंमद गझनीने भारतावर १७ चढाया केल्या. अमाप संपत्ती लुटून नेली. त्याचा मुलगा मसूद याच्या कार्यकाळात सेलजूक मुस्लिमांनी आक्रमण करून गझनीचे राज्य धुळीस मिळविले. पाठोपाठ घोरी घराण्याचे राज्य घोर प्रांतात स्थापन झाले. नंतरही अफगाणिस्तानवर पश्चिमेकडून एका पाठोपाठ एक आक्रमणे होत राहिली. त्यात चंगीझ खानाची टोळधाड, तैमूरलंगाचे भयानक आक्रमण यांनी अफगाणिस्तानची रया घालविली. दरम्यान, अफगाणिस्तानात पूर्वापार कालव्यांची व्यवस्था नामशेष करण्यात आली. अफगाणिस्तानच्या स्वयंपूर्णतेचा कणाच मोडला. अफगाणिस्तान अनेक छोट्या प्रांतांत विभागला गेला. अठराव्या शतकात नादिरशहाच्या तालमीत तयार झालेला अहमदशहा अब्दाल्ली-दुर्राणी इराणातून अफगाणिस्तानात परतला. त्याने आक्रमक धोरण अवलंबून पूर्वेस भारतावर आणि ‘ऑक्सस’ नदीच्या उत्तरेस चढाया करण्याचे धोरण ठेवले. त्याच्या एका स्वारीदरम्यान पानिपतावर मराठ्यांशी त्याला युद्ध करावे लागले. तो जरी युद्ध जिंकला तरी त्याची मोठ्या प्रमाणावर हानी झाली. अब्दालीच्या पश्चात अफगाणिस्तान एक प्रकारे स्थानिक युद्धखोर (थरीश्रेीवी) टोळीवाल्यांच्या समूहांनी चालविलेला प्रदेश झाला. त्यात पख्तून टोळ्या बहुसंख्य असल्या तरी ताजिक, हजारा, तुर्कमेन, उझबेक इ. टोळ्यांनी आपापले वर्चस्व एकेका भागात प्रस्थापित केले. त्यांच्यातील कटोकटीच्या संघर्षामुळे देश एकसंघ बनण्याची प्रक्रिया अजूनही मूळ धरत नाही. इस्लाममधील कडवे पंथभेद आणि वंशभेद, शिया-सुन्नींमधील विभक्तता आणि त्याचबरोबर पराकोटीचा काफिरद्वेष (घरषळीेहिेलळर) ही त्याची कारणे होती. ती आजही आहेत.



Photo 3_1  H x

माशांवर आरूढ चमत्कऋतीपूर्ण अप्सरा मूर्ती 

नष्टचर्याला सुरुवात
 
गेल्या दोन शतकांपासून जागतिक सत्ता होऊ पाहणार्‍या देशांच्या साठमारीत अफगाणिस्तान एका प्याद्याप्रमाणे बळी जातो आहे. एकीकडे भारतात जम बसवू पाहणारी ब्रिटिश राजवट आणि हिंदी महासागराला थेट पोहोचू पाहणारा रशिया यांच्या चढाओढीत रशियाकडे झुकू पाहणार्‍या अफगाणिस्तानवर ब्रिटिशांनी तीन आक्रमणे केली. त्यांना अफगाणिस्तानवर पूर्णपणे सत्ता प्रस्थापित करता आलीच नाही. उलट नामुष्कीचा पराभव पत्करावा लागला. गेल्या शतकात अफगाणिस्तानात राजे झाहीर शहा यांची १९३३-७३ ही चार दशकांची राजवट देशाला लोकशाहीच्या वाटेने नेणारी होती. झाहीर शहा उदारमतवादी होते. त्यांनी निवडणूक प्रथा सुरू केली. त्यांचा चुलतभाऊ असलेल्या मुहंमद दाऊदने १९७३ साली राजसत्ता उलथवून अफगाणिस्तानला नष्टचर्याकडे ढकलले. साम्यवाद्यांशी जवळीक साधणार्‍या दाऊदचा साम्यवाद्यांनीच खात्मा करून एप्रिल १९७८ मध्ये सत्ता काबीज केली. त्यावर कडी झाली ती डिसेंबर १९७९मध्ये सोव्हिएत रशियाने सलांग बोगद्यामार्गे अफगाणिस्तानात सैन्य घुसविले. सलांग बोगदा बांधण्यामागे रशियाचा तोच हेतू होता. रशियाने अफगाणिस्तानात दमनचक्र आरंभले. फिरोझ रानडेंच्या ‘काबूलनामा’त त्यावेळची साद्यंत माहिती आहे. अफगाणिस्तानी नागरिकांना दहशत बसावी म्हणून उलटे टांगून हेलिकॉप्टर उडविणे, फुलपाखरांच्या आकाराचे हॅण्डग्रेनेड पसरून ते उचलणारी मुले कायमची जायबंदी होणे, सैनिकांच्या स्थानिक महिलांवरील अनन्वित अत्याचारांमुळे सामान्य जनता होरपळत होती. त्यानंतरची ११ वर्षे साम्यवादी नेत्यांचा सत्तेसाठी संगीतखुर्चीचा खेळ चालला होता. नूर महंमद तराकी, बरबाक करमाल, खल्क आणि परचाम या गटांमधील सत्तास्पर्धा चालली. त्यात अफगाणी जनता भरडून निघत होती. सत्तेवर उभे केलेल्या बाहुल्या निष्फल ठरत गेल्या.



Photo 3_1  H x

इकडे अमेरिकेने रशियाला पायबंद घालण्यासाठी, सौदी अरबच्या आर्थिक मदतीने पाकिस्तानात ‘मुजाहिद्दीन’ संघटनेला खतपाणी घातले. कंदहारमध्ये मुल्ला ओमरने त्याच्या विद्यार्थ्यांच्या-तालिबानींच्या मदतीने एका चकमकीत अफगाण सैनिक तुकडीला हरवून आपले अस्तित्व सिद्ध केले. तेव्हापासून अफगाणिस्तानात तालिबानींचा बोलबाला सुरू झाला. मुल्ला ओमरने आपले युद्धकौशल्य सिद्ध केल्यावर त्याची सत्तेच्या दिशेने वाटचाल सुरू झाली. अमेरिकेने पाकिस्तानी सहकार्याने उभ्या केलेल्या ‘मुजाहिद्दीन’ संघटनेची त्याला साथ मिळाली. अमाप पेट्रोडॉलर घेऊन आलेला ओसामा बिन लादेन आणि मुल्ला ओमर एकत्र आले. या संघर्षात रशियाला नामुष्कीचा पराभव पत्करावा लागला. आता जे घडले, तेच रशियाच्या बाबतीत घडले. अफूच्या नादी लागलेले रशियाचे सैनिक अफूसाठी आपली शस्त्रे ‘मुजाहिद्दीनां’ना देऊन काढता पाय घेऊ लागले. फेब्रुवारी १९८९ मध्ये रशियाने माघार घेताच बलाढ्य सोव्हिएत युनियन एका झटक्यात विघटित झाले.



सुरुवातीचा काही काळ तालिबान-मुजाहिद्दीन राजवट चांगली होती. तो चांगुलपणा फार काळ टिकला नाही. तालिबान्यांनी सौदी अरबच्या तालावर ‘शरिया’ची अतिरेकी अंमलबजावणी सुरू केली. इस्लामी राजवटीत जे घडते ते आपसूकच होत गेले. तालिबान्यांची अरेरावी अतिशय वाढली. महिलांवर बंधने आली. एकीकडे त्यांचे पुरुष कैदेत जात होते किंवा मारले जात होते, तर दुसरीकडे त्यांना देहविक्रय करण्यावाचून पर्याय नव्हता. शुक्रवारचा नमाज पढणे झाल्यावर, छोट्या-मोठ्या अपराधांसाठी उघड्यावर हातपाय कलम करणे, मुंड्या छाटणे या शिक्षा काबूलच्या फुटबॉल मैदानावर देण्यात येत असत. काबूलकर नागरिक ते पाहण्यासाठी जमत. हातपाय कलम केल्यावर विव्हळणार्‍या गुन्हेगारांच्या किंचाळ्यांना हर्षोल्हासात प्रतिसाद देत. लहान मुलेही ते पाहण्यासाठी येत. अफगाणिस्तानात दोन दशकांपेक्षा अधिक काळ वार्ताहर राहिलेल्या ख्रिस्तिना लॅम्बने ’'The Sewing Circles of Herat' (२००२) या पुस्तकात मैदानाची देखरेख करणार्‍या मुहंमद नासिरशी झालेला वार्तालाप दिला आहे (पृ २४५). ते मैदान सतत वाहिलेल्या रक्ताच्या ओहोळांनी सुकून काळपट पडले होते. ते धुतांना वाहणार्‍या पाण्याला गडद रंग होता. महिलांना दगड मारून ठार करण्याची शिक्षा करण्याचे ठिकाण त्याने लॅम्बला दाखवले. त्या अभागी महिलांवर दगडधोंडे मारताना आनंदाने किंचाळणार्‍या पाषाणहृदयी जमावाची दृश्ये डोळ्यासमोर येऊन लॅम्बचे हृदय गलबलून गेले. आपल्या विरोधात जाणार्‍यांची सरसहा कत्तल करणार्‍या अहमदशहा दुर्राणीचे थडगे तिथून जवळच दिसत होते. जणू त्याच्या नृशंषतेची काळी छाया त्या मैदानवर पडली होती. लॅम्ब एका मुलाशी, नीदा मोहंमदशी बोलली. त्याने शंभरपेक्षा जास्त घटना पाहिल्या होत्या. तो मैदानावर करमणुकीसाठी येत होता. अत्याचारांमुळे विव्हळणारे पीडित पाहणे त्याची करमणूक होती. नीदा त्या निर्मम दृश्यांना निर्ढावला होता. रमझान त्याच्यासाठी विशेष महिना होता. रमझानमध्ये दररोज शिक्षा देण्याचा कार्यक्रम होत असे. हजारो लोक त्यावेळी उपस्थित असत. लॅम्बने दिलेले वर्णन वाचताना अंगावर शहारे येतात. कमी-जास्त प्रमाणात अशीच परिस्थिती अफगाणिस्तानात इतरत्र होती. तालिबान्यांची क्रूरता ओसंडून वाहत होती. त्यावर कडी म्हणून ओसामाने अमेरिकेतील ट्विनटॉवर आणि पेंटागॉनवर हवाई हल्ले करून अमेरिकेला आणि मित्रदेशांना अफगाणिस्तानवर सैनिकी चढाईचे आमंत्रण दिले. गेली दोन दशके अफगाणिस्तानात कतलेआम सुरू होते. अत्यंत भ्रष्टाचारी, दिखाऊ लोकशाहीत जनसामान्य भरडला जात होते. पंजशिर पर्वतरांगामध्ये एकदा अमेरिकेने ‘डर्टीबॉम्ब’ वापरून कत्तलखान्यात रूपांतर केले होते. बरोबर हजार वर्षांच्या कालावधीत सुवर्णभूमी अफगाणिस्तानचे स्मशानभूमीत पूर्ण रूपांतर झाले. अरबी इस्लामच्या आक्रमणासंदर्भात खान अब्दुल घफ्फारखान म्हणतात,''The result was that we were deprived of our rich culture, and in exchange we did not receive even the true spirit of Islam.'' (Abdul Ghaffar Khan: faith is battle, (ले. डी. जी. तेंडुलकर १९८७, पृ १६). वर्तमान अफगाणिस्तान आणि मध्यपूर्वेतील ‘शरिया’ आधारित'True spirit of Islam' पाहून खानसाहेब नक्कीच कबरीत विव्हळत असतील.




तालिबान दुसरी आवृत्ती
केवळ महिनाभरात साडेतीन लाखांच्या अफगाणी सैन्याने तालिबान्यांपुढे शरणागती पत्करली. महासत्तेने अफगाणिस्तानात नांगी टाकून पाय काढण्याची दोन शतकातील ही तिसरी घटना. १५ ऑगस्ट, २०२१ या दिवशी काबूल तालिबान्यांच्या हातात पडले. ट्रम्पबरोबर केलेल्या उभयपक्षी करारातील एकही कलम तालिबानने पाळले नाही. तालिबान्यांचा मवाळपणाचा मुखवटा चार दिवसांत उघड्यावर पडला. नीदा मोहंमदसारखे निर्ढावलेले, आता तिशीत आलेले तरुण जर तालिबान्यांना सामील असतील, तर आधीच क्रूरकर्मा असलेले नेते त्यांना कितपत आवरू शकतील, हा प्रश्न सर्व जगापुढे आहे. पूर्वी तालिबान्यांच्या आंतरगोटात सामील होण्यासाठी कमीत कमी दहा शियांची कत्तल केल्याचा जणू दाखला द्यावा लागे. (लॅम्ब पृ. १६९). परवाच पाकिस्तानात मुहरमच्या मिरवणुकीवरील स्फोटात तीन शिया मारले गेले. जगाला दहशतीच्या छायेतून बाहेर काढून अंतर्गत वांशिक कत्तलींवर आळा घालायचा असेल, तर अफगाणिस्तान आणि पाकिस्तान हे दोन्ही दहशतवादी देश विभाजित करून भाषा-वंशाच्या आधारवर पाच-सात देश निर्माण करून इस्लाम अंतर्गत काफिरद्वेष (Kafirophobia) नष्ट करण्यासाठी नियोजन केले पाहिजे. तो वेगळ्या लेखाचा विषय आहे.

- डॉ. प्रमोद पाठक