संस्कृतमधील करिअरच्या वाटा...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Aug-2021   
Total Views |


s v_1  H x W: 0

आज श्रावण पौर्णिमा म्हणजेच संस्कृत दिन! संस्कृत भाषेची महती सर्वज्ञात आहे. संस्कृत भाषेतील करिअरला सध्या ‘अच्छे दिन’ आले आहेत. त्यामुळे मळलेल्या वाटा सोडून संस्कृतमध्ये करिअर करण्याच्या वाटांचा वेध या लेखातून घेऊया...
संस्कृत भाषा ही देवभाषा, गीर्वाणभाषा म्हणून ज्ञात आहे, यातच तिची प्राचीनता दिसते. व्याकरणामुळे बांधेसूद, शब्दवैभवाने संपन्न, साहित्य-शास्त्र-ज्ञान याचा विपुल साठा असणारी संस्कृत भाषा. या भाषेबद्दल समज-गैरसमज बरेच असल्यामुळे संस्कृतमधील करिअरला ‘आऊटडेटेड’ असेही म्हणत. पण, संस्कृतला म्हणण्यापेक्षा संस्कृत भाषेत करिअर करण्यास आता ‘अच्छे दिन’ आले आहेत, असेच म्हणता येईल.साधारण संस्कृत भाषेची आणि आपली ओळख शाळेत होते. काही घरांमध्ये स्तोत्रे, परवचा म्हटला जातो, त्या घरातील मुलांना ही भाषा लहानपणी अवगत होऊ लागते. मुळात संस्कृत भाषा अवघड आहे, हा समज या वयात घरी आणि शाळेत दूर होणे आवश्यक आहे. केवळ मार्क, ‘स्कोअरिंग लॅन्ग्वेज’ म्हणून न बघता तिच्याकडे भाषिक अंगांनी बघणे आवश्यक आहे.
करिअरची पूर्वतयारी
संस्कृतमध्ये करिअर करताना प्रथम संस्कृत भाषेचा पाया भक्कम होणे आवश्यक आहे. यामध्ये मूलभूत व्याकरण, भाषेची रचना पक्की होणे गरजेचे असते. अगदी आठवीपासून जरी संस्कृत भाषा शिकायला सुरुवात केली तरी दहावीपर्यंत मूलभूत व्याकरण नक्कीच येऊ शकते. संस्कृत भाषेत करिअर करताना आठवी ते दहावीपर्यंतचं अगदी पाठ्यक्रमातील संस्कृत अभ्यासाने व्यवस्थित झालं की, पुढील मार्ग सुकर होतो.संस्कृत भाषेकडे करिअरच्या दृष्टीने विचार करत असताना इंग्रजी आणि परदेशी भाषा यांच्यावरही प्रभुत्व मिळवावे. कारण, भारतात जशा करिअरच्या संधी आहेत, तशा परदेशातही आहेत. त्यामुळे संस्कृत आणि इंग्रजी, जर्मन, फ्रेंच हे समीकरण भविष्याच्या दृष्टिकोनातून उपयुक्त ठरते. याची सुरुवात शालेय वयात अगदीच नाहीतर कनिष्ठ महाविद्यालयीन काळात करावी. कारण, परदेशी भाषांच्या ‘लेव्हल्स’ पूर्ण होण्यास चार-पाच वर्षांचा काळ लागतो. लवकर करिअरच्या प्राथमिक तयारीला सुरुवात केली तर वयाच्या १९ ते २० म्हणजे पदवी पूर्ण होईपर्यंत संस्कृत भाषेसह परदेशी भाषा, इंग्रजी यांच्यावर प्रभुत्व येऊ शकते.
संस्कृत भाषेत पदवी संपादन करत असताना महाविद्यालयीन काळात ‘मॅन्युस्क्रिप्टॉलॉजी’ (हस्तलिखितशास्त्र), ‘मायथोलॉजी’, संस्कृत संभाषण वर्ग, मोडी, ब्राह्मी, शारदा अशा विविध लिपी शिकण्याचे कोर्सेस करावे. ‘नेट’, ‘सेट’ परीक्षांचीही तयारी या काळात सुरू करावी. तुमच्या बायोडाटातील शैक्षणिक विभाग यामुळे ‘स्ट्राँग’ होतोच, तसेच तुमच्या ज्ञानात भर पडते, हे महत्त्वाचे!अशा विविध कोर्सेस, पदवीने संपन्न झाल्यावर संस्कृतमध्ये विविध वाटा दिसू शकतात.
 
 
करिअरच्या संधी
संस्कृतमध्ये पाया पक्का केला की, संपूर्ण जगामध्ये तुम्हाला विविध क्षेत्रात नोकरी-व्यवसायाच्या संधी उपलब्ध होऊ शकतात. त्यासाठी जिज्ञासा, विविध क्षेत्रातील लोकांशी सहसंबंंध ठेवावेत.

शिक्षक
संस्कृतमध्ये पदवी आणि ‘बी.एड.’ करून तुम्ही शाळेमध्ये संस्कृत शिक्षक म्हणून नोकरी करू शकता. आज अनेक शाळांमध्ये संस्कृत विषय उपलब्ध असून शिक्षक नसल्याची समस्या आहे. महाविद्यालयांमध्ये संस्कृत प्राध्यापक होण्यासाठी संस्कृतमध्ये पदव्युत्तर पदवी अधिक ‘नेट’, ‘सेट’ किंवा ‘पीएच.डी’ पूर्ण असावी लागते. सध्या महाविद्यालयात कायमस्वरूपी प्राध्यापक नोकरी मिळण्याबाबत सांशकता आहे. परंतु, ‘नेट’, ‘सेट’ उत्तीर्ण असल्यास अजूनही फायदे असतात.
परदेशातही संस्कृत शिक्षक शाळांमध्ये आवश्यक असतात. काही देशांत शिक्षकाला त्या देशाची राष्ट्रभाषा येणे अनिवार्य आहे. परंतु, अनेक राष्ट्रांमध्ये संस्कृत शिक्षकांसाठी जागा आहेत आणि मुख्य म्हणजे त्यांचा पगारही उत्तम असतो.
सध्या भारतातही लहान मुलांसाठी किंवा आपल्या पाल्यांसाठी ‘खासगी शिक्षक’ ठेवले जातात. यात संस्कृत शिक्षकही आवश्यक असतात. संस्कृत पदवी नुकतीच प्राप्त केलेल्या मुलांसाठी ‘खासगी शिक्षक’ म्हणून नोकरी करता येऊ शकते. तसेच परदेशात उच्च शिक्षण घेण्यास गेलेल्या मुलांना ‘खासगी शिक्षक’ म्हणून नोकरी करण्यास परदेशात खूप वाव आहे. तिथे अशा शिकवणींसाठी पालक उत्तम पैसे मोजण्यास तयार असतात.शिकवणी वर्ग हा सध्या खूप प्रचलित असलेला पर्याय आहे.विविध शिकवणी वर्गांमध्ये शिकवणे, अथवा स्वत:चे शिकवणी वर्ग घेणे हा पर्याय आहे.

भाषांतरकार
संस्कृतमधून मराठी, इंग्रजी, हिंदी तसेच अन्य भाषिक साहित्य संस्कृतमध्ये भाषांतरित करण्यास खूप संधी आहेत. उत्तम भाषांतरकार झाल्यास ‘फ्रिलान्स’ किंवा संशोधन मंडळे, ग्रंथालये यामध्ये काम करता येते. विविध संस्कृत ग्रंथांचे अनेक ठिकाणी अनुवादाचे कार्य योग्य मानधन देऊन चालते.आज संस्कृत विद्यापीठांमध्ये संस्कृतमध्ये प्रबंधाचं लिखाण अनिवार्य केलेले आहे. अनेकांना हे शक्य होत नाही. अशा वेळी भाषांतरकाराची आवश्यकता भासते. संस्कृत मुद्रितशोधकही दुर्मीळ असल्यामुळे संस्कृत ग्रंथांचे मुद्रितशोधन करण्यासही संधी उपलब्ध आहेत. ‘ट्रान्सलेटरडिक्शनरी.कॉम’ अशा वेबसाईट जागतिक स्तरावर भाषांतरकार सुचवण्याचे कार्य करतात. ०.१० युरो प्रत्येक शब्द म्हणजे आठ ते नऊ रुपये परदेशामध्ये भाषांतराकरिता घेतले जातात. भाषांतरकार ही एक संस्कृतच्या मुलांना चांगली संधी आहे.
संशोधक
 
संस्कृतमध्ये भारतात त्याहीपेक्षा अधिक परदेशात संशोधन सुरू आहे. संस्कृत संशोधकांना यामध्ये कार्य करण्याची संधी मिळू शकते. भारतात संस्कृतमध्ये पदव्युत्तर पदवी/पीएच.डी/‘नेट’-‘सेट’ उत्तीर्ण रिसर्च स्कॉलर्सना संशोधन मंडळांमध्ये विविध प्रकल्पांवरती कार्य करता येते. संस्कृत पदवी संपादित करताना पूरक कोर्सेस जसे की, हस्तलिखितशास्त्र, विविध लिपींचे प्रशिक्षण केलेले असेल तर हस्तलिखितांवरती होणार्‍या कार्यांत, तसेच अन्य प्रोजेक्ट्समध्ये, भाषांवरती संशोधन करण्यास संधी मिळू शकते. उत्तम संशोधक असाल तर ‘रिसर्च पेपर’ही योग्य मानधनासह लिहून देऊ शकता. परदेशात ‘पीएच.डी’ करत असाल, तर तिथे तुम्हाला संशोधन संधी उपलब्ध होऊ शकतात. ‘पीएच.डी’ रिसर्च स्कॉलर्सना योग्यतेनुसार शिष्यवृत्तीही दिली जाते.

डिजिटल संधी
आज अनेक वेबसीरिज, चित्रपट, मालिका या पुराणकथा, प्राचीन कथांवर आधारित असतात. याची सत्यासत्यता पडताळणे, त्यासाठी योग्य अभ्यास करणे, अर्थविनिमय करणे याकरिताही अभ्यासकांची आवश्यकता असते. संस्कृताधारित प्रसिद्ध होणारी गोष्ट अचूक असावी, याकरिता या अभ्यासकांची नियुक्ती होते.सध्या संस्कृत ‘फॅड’ असल्याप्रमाणेही वापरतात. मग त्यात संस्कृत कोट्स, वाक्ये टीशर्टवर प्रिंट करणे असो, त्याच्या इमेज बनवणे असो, संस्कृत सुभाषितांचे ‘एसएमएस’ बनवणे असो, यासाठी मूलभूत संस्कृत ज्ञानाची अत्यंत आवश्यकता असते. आज मॅडोनासारख्या पाश्चात्त्य गायिकाही आपल्या संगीतात संस्कृतचा वापर करतात. तेव्हा उच्चार आणि शुद्धता यासाठी संस्कृत अभ्यासक आवश्यक असतो.‘ऑनलाईन’ संस्कृत टेक्ट, अभ्यास मटेरियल देणारी काही अ‍ॅप्स, संकेतस्थळे आहेत. त्यांच्या ‘शुद्धीकरणा’साठी संस्कृत अभ्यासकांची गरज असते.
लेखन व संपादन
संस्कृतवरती प्रभुत्व असणार्‍या व्यक्ती या क्षेत्रात नक्कीच कार्य करू शकतात. संस्कृत नाटके, संस्कृत पटकथा, संस्कृत लेख, लघुशोधनिबंध यासारखे संस्कृत साहित्य लिहिणार्‍यास आज योग्य मानधन दिले जाते. तसेच संस्कृत ग्रंथांचे संशोधनात्मक संपादनासही अभ्यासक गरजेचे असतात.
 
पत्रकारिता
 
संस्कृतमध्ये वृत्तपत्रे, मासिके यांचे प्रमाण कमी असले तरी त्यांचे अस्तित्व नाकारता येत नाही. आजही संस्कृतमध्ये बातम्या दिल्या जातात. याकरिता ‘संस्कृत जर्नालिझम’ हा कोर्स संस्कृत विद्यापीठांनी सुरू केला आहे. याला प्रतिसादही मिळत आहे. संस्कृत पत्रकारिता नव्या संधी घेऊन येणारे क्षेत्र आहे.
अन्य संधी
सध्या पूर्णपणे संस्कृत घेण्यासोबत संस्कृत + तत्त्वज्ञान/पुरातत्त्वविद्या/मानसशास्त्र/नाट्यशास्त्र/ग्रंथालयशास्त्र किंवा अन्य भाषा किंवा मॅनेजमेंट विषय असे समीकरण (पान ७ वर) (पान ६ वरून) करता येते. यामुळे अन्य ‘अप्लाईड’ विषयांमध्ये संस्कृतच्या आधारे संशोधन किंवा कार्य करता येणे शक्य आहे. ‘इंटरडिसिप्लिनरी’ म्हणजेच संस्कृतसह आंतरशाखीय संशोधनास तर अवकाशाहून अधिक संधी भारतात व परदेशात उपलब्ध आहेत. त्यामुळे पूर्णत: संस्कृत भाषेवर अवलंबून राहण्यापेक्षा अन्य शाखांच्या साहाय्याने करिअर करता येऊ शकते. आज कौटिल्य अर्थशास्त्र, नीतिशास्त्र, भगवद्गीता अभ्यासकांना ‘मॅनेजमेंट गुरू’ किंवा ‘मॅनेजमेंट’, ‘कॉर्पोरेट’ क्षेत्रात संधी उपलब्ध आहेत.
संस्कृतकडे वाढता ओघ
संस्कृत भाषेकडे मोठ्या प्रमाणात विद्यार्थी आकर्षित होत आहेत. संस्कृत महाविद्यालये, विद्यापीठांमध्ये संस्कृत कोर्सेस, पदवी-पदव्युत्तर वर्ग यांना विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय आहे. केवळ पुणे, मुंबई याव्यतिरिक्तही परदेशातही संस्कृत शिक्षणासाठी अधिक संधी व शिष्यवृत्ती उपलब्ध केल्या जात आहेत. राष्ट्रीय संस्कृत संस्थान, कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय, नागपूर, मुंबई-पुणे विद्यापीठे, संस्कृत भारती या संस्था तसेच खासगी पातळीवरही संस्कृत भाषा शिकण्याचे कोर्सेस घेतले जातात. संभाषण वर्गही आयोजित केले जातात. त्यांना वयाचे कोणतेही बंधन नसते. यामुळे अनेक विविध क्षेत्रातील लोक या वर्गांमध्ये संस्कृत शिकण्यास व संस्कृतच्या प्रचार-प्रसारात सहभागी होत आहेत.
संस्कृतमधील वैदिक, वेदान्त, नाट्यशास्त्र, अलंकार तसेच विविध शास्त्रांचा आज मोठ्याप्रमाणावर अभ्यास होत आहे. डॉक्टर, इंजिनिअर किंवा त्याच पठडीतील करिअरच्या वाटांपेक्षा किंचित काही काळ दुर्लक्षित राहिलेली संस्कृतमधील करिअरची वाट आहे. आनंद, अभ्यास, योग्य मानधन आणि सन्मान याचा समन्वय या क्षेत्रात आहे. त्यामुळे पुढील पिढीने संस्कृतमधील करिअरची वाट नक्की निवडावी!


- वसुमती करंदीकर




 
 
 
@@AUTHORINFO_V1@@