नगरसेवक नव्हे जनसेवक!

    20-Aug-2021
Total Views |

Vinod Mishra_1  


कोरोना महामारी जशी सुरु झाली, तेव्हापासून शहराची जबाबदारी ज्यांच्या खांद्यांवर होती, जे खर्‍या अर्थाने या शहराचे पालक आहेत, ती मंडळी मात्र काहीशी अदृश्य झाली. मात्र, मुंबई महापालिकेतील भाजपचे नगरसेवक, पदाधिकारी आपल्या वॉर्ड आणि विभागामध्ये स्थानिकांच्या सेवेत एकहाती किल्ला लढवत कोरोनाचा मुकाबला करत होते. भाजपमधील त्या बिनीच्या शिलेदारांपैकी एक नाव म्हणजे नगरसेवक विनोद मिश्रा.
 

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि सामाजिक कार्याची पार्श्वभूमी असलेले विनोद मिश्रा हे मागील २९ वर्षांपासून सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात सक्रियपणे कार्यरत आहेत.संघाचे स्वयंसेवक ते भाजपचे राज्य सरचिटणीस अशी विविध पदे विनोद मिश्रा यांनी भूषविली आहेत. सन २००१ मध्ये वयाच्या अवघ्या २६व्या वर्षी सहकारी बँकेच्या संचालकपदी निवडून आलेले विनोद मिश्रा हे संचालकांमध्ये सर्वात तरुण संचालक आणि बँकेचे उपाध्यक्षही होते. पुढे २०१७ मध्ये झालेल्या मुंबई महापालिका निवडणुकांमध्ये मिश्रांनी भाजपच्यावतीने वॉर्ड क्र. ४३ मधून निवडणूक लढवत शिवसेना आणि काँग्रेसचे ३० वर्षांचे वर्चस्व मोडीत काढत विजय मिळवला.
 
 
मिश्रा यांनी आजवर वॉर्ड अध्यक्ष, मंडळ महामंत्री, जिल्हा सचिव, भाजयुमो मंत्री, महामंत्री, महाराष्ट्र भाजप सरचिटणीस, मुंबई भाजपचे चिटणीस आणि २०१७ पासून आजतागायत नगरसेवक व पक्षनेते अशा विविध भूमिका पार पाडलेल्या आहेत. वास्तविक कोरोना आणि त्याच्या उपचारांबाबत संपूर्ण जग प्रारंभी अनभिज्ञ होते. कालांतराने कोरोनावरील लसीचा शोध लागला खरा. मात्र, सुरुवातीला या आजारावर नेमक्या कोणत्या उपाययोजना करायच्या, याची अचूक माहिती काही मोजक्या मंडळींनाच होती. पण, विनोद मिश्रांसारख्या काही देवदूतांनी लोकांना मदतीचा हात देत सेवाकार्याला हातभार लावला.
कोरोना संसर्गाला सुरुवात झाल्यानंतर मिश्रा यांनी सर्वप्रथम प्रभागातील सर्व इमारती, शौचालये व आस्थापनांचे निर्जंतुकीकरण करुन घेतले. कोरोना या आजारापेक्षा त्याबद्दल पसरविण्यात आलेले गैरसमज आणि अफवांमुळे लोक अधिक भ्रमित होऊ लागले. तेव्हा मिश्रा आणि त्यांच्या सहकार्‍यांनी सर्वप्रथम लोकांच्या मनात जे गैरसमज निर्माण झाले होते, ते दूर करण्याचा प्रयत्न केला. सरकारच्या निर्बंधांमुळे शहरातील उपाहारगृहे आणि अन्नपदार्थांचे वितरण करणारी सर्व आस्थापने बंद होती, ज्यामुळे अनेकांवर उपासमारीची वेळ आली. यावर उपाय म्हणून त्यांनी प्रभागामध्ये अन्न-पाण्यावाचून वंचित असलेल्या नागरिकांसाठी ‘कम्युनिटी किचन’ची सुरुवात केली. त्या काळात ‘कम्युनिटी किचन’च्या माध्यमातून दररोज तीन ते चार हजार लोकांना अन्न पुरवले गेले. त्यासोबतच वॉर्ड क्र. ४३ सह मुंबई आणि आसपासच्या भागात २५ किलोंच्या ‘किराणा किट’चे मोठ्या प्रमाणात वाटप केले गेले. लोकांच्या आरोग्यविषयक तक्रारी असोत, अन्नधान्याची मागणी असो वा इतर कुठलीही तक्रार अथवा सूचनांच्या निवारणासाठी मिश्रा आणि त्यांच्या सहकार्‍यांनी एक साहाय्यता क्रमांक आणि समाजमाध्यमांवर दहा लोकांचा ‘व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप’ बनवला होता, जेणेकरुन समाजातील शेवटच्या घटकापर्यंत त्यांना आपली मदत योग्यरीत्या पोहोचवता येईल. पहिल्या लाटेत आर्थिकदृष्ट्या कमकुवत लोकांना किराणा, औषधांचे वाटप तथा ३० टन गहू आणि तांदळाचे वाटप केले गेले. पहिल्या लाटेमध्ये एक लाखांहून अधिक फूड पॅकेटचे वाटप करण्यात आले. कोरोनाबाधितांच्या रुग्णालयांसंबंधी समस्यांच्या निराकरणासाठी समाजातील काही उच्चशिक्षित लोकांची एक टीम बनवली जी रुग्णालय आणि आरोग्यासंबंधी सर्व समस्या सोडवण्यासाठी सक्रिय राहिली. या टीमच्या प्रयत्नांमुळे कोरोनाच्या पहिल्या लाटेत त्या भागातील ५०० पेक्षा अधिक कोरोनाबाधितांना रुग्णालयात बेड्स उपलब्ध करुन देण्यात आले, असे विनोद मिश्रा यांनी सांगितले. मागील दीड वर्षांपेक्षा अधिक कालावधीपासून अविरतपणे सुरु असलेल्या या सेवायज्ञाच्या माध्यमातून आतापर्यंत एकूण ८ हजार, ७०० लोकांपर्यंत प्रत्येकी २५ किलो वजनाच्या ‘किराणा किट’चे वाटप करण्यात आलेले आहे. प्रभागातील बहुसंख्य निवासी-अनिवासी आणि व्यावसायिक इमारतींचे निर्जंतुकीकरण करण्यात आले. निर्जंतुकीकरणाच्या कामाद्वारे तब्बल दहा हजार घरांपर्यंत पोहोचलो, असे मिश्रा यांनी सांगितले. कोरोनामुळे आणखी एक दुरगामी वाईट परिणाम करणारी घडलेली घटना म्हणजे विद्यार्थ्यांच्या शिक्षणात पडलेला खंड. अनेक विद्यार्थी ‘ऑनलाईन’ माध्यमांद्वारे शिक्षण घेत होते. मात्र, आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांनादेखील या काळात मिश्रांनी यथाशक्ती मदत करण्याचा प्रयत्न केला.
 
 

Vinod Mishra 1_1 &nb 
 
 
आर्थिक परिस्थिती बिकट असलेल्या गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडू नये, या हेतूसाठी दोन लाखांपेक्षा अधिकची मदत करण्यात आली. कोरोना काळात करण्यात आलेल्या या कार्यात आलेल्या काही संस्मरणीय अनुभवांविषयी बोलताना विनोद मिश्रा म्हणाले की, “एका विद्यार्थ्याला ज्याने काही दिवसांपूर्वीच पितृछत्र गमावलं होतं, त्याला आमच्यातर्फे आयआयटीच्या शैक्षणिक शुल्कात मदत म्हणून २५ हजार रुपयांची मदत करण्यात आली. त्या मुलानेही माझ्या मदतीचं चीज केलं. काही दिवसांनंतर तो मुलगा माझ्याकडे आला आणि त्याने आयआयटीमध्ये मिळवलेल्या यशाची बातमी सांगितली, तेव्हा मी भावनांनी ओतप्रोत भरुन गेलो. माझ्यासाठी तो क्षण म्हणजे मी केलेल्या कामाची पोचपावती होती. केलेल्या छोट्याशा मदतीमुळेही मला प्रचंड समाधान मिळाले.”
 
 
 
लसीकरणातही मिश्रा आणि सहकार्‍यांनी आपली बाजू भक्कमरित्या सांभाळली. आतापर्यंत पाच हजारांपेक्षा अधिक लोकांना खासगी रुग्णालयात लसी देण्यात आल्याचे मिश्रा म्हणाले. मात्र, हे सामाजिक कार्य फक्त प्रभागातच नाही, तर मुंबई आणि मुंबईबाहेरही त्यांनी केले. मात्र, या काळातही मुंबई महापालिकेच्या गलथान कारभाराचा प्रत्यय सर्व मुंबईकरांना आला. कोरोना रुग्णांचे उपचार करणार्‍या डॉक्टरांसाठी ६०० रुपयांच्या ‘पीपीई किट’ची खरेदी करण्यात आली, तर कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या रुग्णांचे मृतदेह ठेवण्यासाठी तब्बल ६७०० रुपयांच्या शवपिशव्यांची महापालिकेने खरेदी केली होती आणि त्यातही भ्रष्टाचार झाला होता, असा आरोपही विनोद मिश्रा यांनी केला.“मदतकार्यासाठी आम्ही जी टीम बनवली होती, त्या टीममधील जवळपास प्रत्येक व्यक्तीला कोरोना झाला होता. अनेक जण तर मृत्यूच्या दाढेत जाऊन परत आले. अशा भीषण परिस्थितीत काम केल्यानंतर लोकांच्या चेहर्‍यावर असलेल्या कृतज्ञतेच्या भावना आणि लोकांनी दिलेले आशीर्वाद ही आमच्यासाठी खूप मोठी बाब होती,” असे मिश्रा विशेषत्वाने अधोरेखित करतात.


- ओम देशमुख