सदूर क्षेत्राचा सेवक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Aug-2021   
Total Views |
 
Ravindra Gangole_1 &
 

‘जिथे कोणी नाही तेथे आम्ही’ या न्यायाने सदूर क्षेत्रातील नागरिकांचे जीवन सुसाहाय्य करण्याचा यथोचित प्रयत्न करणारे रवींद्र गांगोले. गांगोले यांना समाजकार्याची प्रेरणा रा. स्व. संघाकडूनच मिळाली. त्यांचे वडील सोहनलाल गांगोले हे संघ स्वयंसेवक असल्याने घरातच समाजसेवेचे बाळकडू त्यांना मिळाले. जे म्हणून काही आपण भोगले ते अन्य कोणी भोगू नये, याच धारणेतून गांगोले कार्य करत आहेत. त्यांच्या सेवाकार्याचा परिचय करुन देणारा हा लेख...
 
 
 
भारतीय प्रशासकीय भाषेत अडचणीचे ठिकाण, विविध प्राकृतिक घटकांचे आव्हान असणारे ठिकाण अशा क्षेत्राला ‘सदूर क्षेत्र’ म्हणून संबोधले जाते. मात्र, सेवाकार्यात जनमानसात असूनही जेथे संकटात मदत पोहोचत नाही, जे क्षेत्र, तेथील रहिवासी हे ज्ञात असूनही अज्ञात असल्यासारखे समजतील, काही घटक वावरत असतात त्याला खेदाने ‘सदूर क्षेत्र’ म्हणावे लागले. तांडे, वस्त्या, पाले येथे कोरोना काळात मदत पोहोचणे, हे नक्कीच आवश्यक होते. तसेच, येथे वास्तव्यास असणार्‍या नागरिकांचे प्रबोधन होणे हेदेखील तितकेच महत्त्वाचे होते. मात्र, सामाजिक क्षेत्रात कार्य करणार्‍या काही लोकांना येथे जाणे शक्य झाले नाही, अशा वेळी रवींद्र गांगोले यांनी ‘जेथे कोणी नाही, तेथे आम्ही‘ या न्यायाने या भागात जात तेथील नागरिकांचे जीवन सुसाहाय्य करण्याचा यथोचित प्रयत्न या काळात केला.
 
 
 
मूलत: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक असणारे गांगोले हे २०१० मध्ये भाजपमध्ये सक्रिय झाले. रस्ता बांधणी हा व्यवसाय असणारे गांगोले यांनी आपल्या मदतीने अनेकांच्या रस्त्यातील अडचणी दूर करत त्यांचा मार्ग सुसाहाय्य करण्याचा प्रयत्न केला. नाशिक शहरासह जिल्ह्याला कोरोनाच्या पहिल्या आणि दुसर्‍या लाटेत भंडावून सोडले होते. खाटा कमी रुग्ण जास्त, ऑक्सिजनची मोठ्या प्रमाणात लागणारी निकड अशा भयंकर स्थितीला जिल्हा सामोरे जात होता. त्याच वेळी अनेकांना दोन वेळच्या जेवणाची भ्रांत होती. अशातच एक प्रकारे निर्वासितांचे आयुष्य जगणार्‍या तांड्यावरील लोकांना, तर ‘इकडे आड तिकडे विहीर’ अशा प्रकारच्या प्रसंगांना सामोरे जावे लागत होते. अशावेळी गांगोले यांनी या लोकांना आधार देत अन्नधान्याची मदत देऊ केली. अनेक लोक हे रोजगार नसल्याने घरी बसले होते. त्यांना विविध सरकारी योजना, तसेच वैयक्तिक मदत करत औषधेदेखील उपलब्ध करून देण्याचे कार्य गांगोले यांनी केले.
 
दैनंदिन जीवनमान व्यतित करण्यासाठी आणि क्षुधातृप्तीसाठी म्हणून गांगोले यांनी गहू, तांदूळ, डाळ, खाद्यतेल, मसाले, साबण यांचे वाटप केले. तसेच, त्यांना कोरोना काळात सजगता कशी बाळगावी, याबाबतदेखील मार्गदर्शन केले. साबणाने कायम स्वच्छ हात धुण्यासाठी त्यांना प्रोत्साहित केले. भाजीपाल्यासह सामानांच्या सुमारे ४३१ किटचे वाटप याकाळात गांगोले यांनी केले.
 
 
 
Ravindra Gangole 1_1 
 
 
पहिल्या लाटेत हे कार्य केल्यावर कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत मास्क, ‘सॅनिटायझर’, प्रबोधनपर स्टीकरचे वाटप करत जनप्रबोधन आणि जनआरोग्य रक्षण यावर गांगोले यांनी भर दिला.नाशिक जिल्ह्यातील काही वनवासी तालुक्यांपैकी दिंडोरी हादेखील वनवासीबहुल तालुका आहे. या भागात शिक्षण, आरोग्य याबाबत तुलनेने कमी प्रगती असल्याचे दिसून येते. त्यामुळे येथील रामनगर वस्ती, भेंडी परिसर, निफाड तालुक्यातील बोकडदरा तांडा या भागात गांगोले यांनी कार्य केले. या भागात सहसा कोणी पोहोचलेले नव्हते. अशा भागात कार्य करत गांगोले यांनी तेथील नागरिकांना मदत केली. या भागात मदत आणि प्रबोधन अशा दोन्ही बाबींची गरज असल्याचे ओळखून गांगोले यांनी आपल्या कार्याची दिशा त्याच पद्धतीने आखली, हे विशेष. यासाठी त्यांना भाजप, स्वतःचा व्यवसाय असलेल्या साईकृपा कन्स्ट्रक्शन, रा. स्व. संघाचे स्वयंसेवक यांचे मोलाचे सहकार्य लाभले. तसेच, मीनाताई बिडकर यांच्या महिला बचत गटामार्फत महिलांना गरजेच्या असलेल्या वस्तू पोहोचविण्यासाठी गांगोले यांनी सहकार्य केले.
 
 
कोरोना काळात स्वत:ला लागण होण्याची दाट शक्यता, जीवाचा असणारा धोका, कोरोनाबाबत नागरिकांना असणारी कमी माहिती, त्यांच्या अंगी नसलेली सजगता, लोकांना काळजी घेणेसाठी प्रवृत्त करणे आदी स्वरूपाच्या आव्हानांचा सामना या काळात गांगोले यांना करावा लागला. काम करताना आव्हाने ही येणारच, हे गांगोले यांना माहीत होते. त्यामुळे या समस्यांचे निराकरण करण्याचे सूत्र त्यांना आपल्या कामातूनच गवसले. लोकसंवाद वाढविणे आणि स्वतःची सुरक्षा स्वत: राखणे यावर भर देत गांगोले यांनी आव्हानांचा सामना केला. गांगोले यांच्या पत्नी स्वत: डॉक्टर आहेत. तसेच, त्या वैद्यकीय अधिकारी म्हणूनदेखील सेवा बजावत आहेत. घरात पाच वर्षांची मुलगी व ११ वर्षांचा मुलगा अशी गांगोले यांच्या घरातील स्थिती आहे. अशावेळी त्यांच्या कुटुंबाची त्यांना मिळालेली साथ ही त्यांच्यासाठी नक्कीच बहुमोल अशीच ठरली.
 
 
दिंडोरी तालुक्यातील एक रुग्ण हे कोरोनामुळे अत्यवस्थ झाले होते. त्यांना खाटा उपलब्ध नसल्याने अनेकविध समस्यांचा सामना करावा लागत होता. त्यांना घरीच उपचार घावे लागले. त्यात बराच वेळ गेला. शेवटी त्यांना संगमनेर येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले. मात्र, दुर्दैवाने त्यांची प्राणज्योत मालवली. ते कोरोनाने मृत झाल्याने त्यांचे शव दिंडोेरी येथे आणण्यात अनेकविध अडथळे येत होते. अशावेळी गांगोले व त्यांचे मोठे बंधू गजराज गांगोले यांनी संगमनेर येथे जात त्यांचे अंत्यविधी पार पाडले.
 
 
तसेच, नाशिकमध्ये ‘म्युकर मायकोसिस’चे रुग्ण वाढत असताना, कळवण तालुक्यातील एका व्यक्तीला त्याची लागण झाली. त्यांना जिल्हा रुग्णालयात नेले असता शासकीय अनास्थेचा सामना गांगोले यांना करावा लागला.त्यावेळी जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी लोकप्रतिनिधींचा फोन आल्यासच रुग्ण दाखल केला जाईल, अशी भूमिका घेतली. यामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी केल्याने तो रुग्ण दाखल होऊ शकला.
 
 
हे दोन प्रसंग कायमस्वरूपी स्मरणात राहतील, असे गांगोले आवर्जून सांगतात.प्रसंगी केवळ बारावी उत्तीर्ण असलेल्या आपल्या पत्नीला गांगोले यांनी मोठ्या निष्ठेने शिक्षणास प्रोत्साहन दिले. त्या आज लमाण बंजारा समाजातील महिला डॉक्टर आहेत. तसेच, त्यांनी एमबीएदेखील केले आहे. आपल्या कुटुंबाप्रति विकासाची परिभाषा अधोरेखित करताना त्यांनी कोरोना काळात समाजातील घटकांनादेखील मदत केली. ‘सदूर’ क्षेत्रातील त्यांची मदत ही अनेकांसाठी वरदान देणारी ठरली आहे.
 
 
@@AUTHORINFO_V1@@