गरजवंतांचा ‘प्रकाश’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Aug-2021   
Total Views |

Prakash Darekar_1 &n 

कोरोना महामारीच्या वैश्विक संकटात संपूर्ण जग त्रस्त झाले असताना गरजू नागरिकांची होणारी गैरसोय, ओढवलेली बेरोजगारी, रोजंदारीवरील कामगारांचे होणारे हाल, त्यांच्या कुटुंबांच्या व्यथा आणि रुग्णांच्या वैद्यकीय गरजा जाणून घेत, त्यांना पुरेपूर मदत पोहोचविण्याचे काम करणारे, अशा सगळ्या गरजवंतांमध्ये जगण्याची एक नवी उमेद निर्माण करणारे प्रकाश दरेकर यांच्या कार्याचा घेतलेला हा थोडक्यात आढावा...



मागील वर्षी जगभरात कोरोना महामारीने हाहाकार माजवला होता. अजूनही कोरोनाचा संपूर्णपणे नायनाट झाला नसून त्याचा लाखो नागरिकांना जबदरस्त फटका बसला. सर्वच परिस्थिती बिकट असताना अनेकांनी कोरोनाग्रस्तांना सर्वोतोपरी मदतीचा निर्धार केला. मात्र, भाजप मुंबईचे उपाध्यक्ष आणि ‘मुंबई हाऊसिंग फेडरेशन’चे अध्यक्ष प्रकाश दरेकर यांनी एक पाऊल पुढे टाकत नागरिकांसाठी अनोख्या पद्धतीने मदत करण्याचा प्रयत्न केला.कोरोना काळात नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेता, त्यांनी अनेक प्रकारे गरजूंना मदतीचा हात दिला. विशेष म्हणजे, त्यांनी ‘मुंबई हाऊसिंग फेडरशन’ अ‍ॅप तयार करून मुंबईत तयार जेवण, धान्य आणि भाजीपाला घरपोच पोहोचविण्याचेदेखील काम केले.
 
 
‘लॉकडाऊन’मुळे लक्षावधी नागरिक, कुटुंबेच्या कुटुंबे रस्त्यावर आली होती. अशा परिस्थितीत समाजात जाऊन पीडित-वंचितांना मदत करणे हेच मुळात एक मोठे आव्हान होते. सुरुवातीचे काही दिवस कशाप्रकारची मदत करावी, हाच प्रश्न सर्वांना पडला होता. सगळीकडे कोरोनाच्या या वादळामुळे चिंतेचे वातावरण होते. अशावेळी प्रकाश दरेकर यांनी पुढाकार घेत आपल्या प्रभागातील नागरिकांना कशाप्रकारे मदत करून दिलासा देऊ शकतो, याचा विचार केला आणि ते मदतीसाठी पुढे सरसावले. सुरुवातीला सर्वत्र गोंधळलेले वातावरण असताना त्यांनी जनतेला मानसिक आणि भावनिक आधार देण्यास सुरुवात केली. ‘लॉकडाऊन’मध्ये घरात अडकलेल्या नागरिकांशी संवाद साधत त्यांनी धीर दिला. याचा सकारात्मक परिणामदेखील त्यांना जाणवला. कार्यकर्त्यांना सोबत घेऊन त्यांनी प्रथम कोरोनाबाबत जनजागृतीवर भर दिला.
 
 
प्रकाश दरेकर यांना समाजसेवेचा वारसा घरातूनच लाभलेला. ते आणि त्यांचे मोठे बंधू विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर हे दोघेही महाविद्यालयात असल्यापासूनच सामाजिक कामांमध्ये सक्रिय आहेत. या दोघांचे ज्येष्ठ बंधू प्रदीपभाई दरेकर यांचा या दोघांवरही मोठा पगडा. याच सामाजिक कार्यामुळे ते बोरिवलीमधून नगरसेवक म्हणून निवडून आले होते. सध्या ते मुंबईतील सुमारे ४० हजार सहकारी गृहनिर्माण संस्थांचे प्रतिनिधित्व करत असलेल्या ‘दि मुंबई डिस्ट्रिक्ट को-ऑप. हाऊसिंग फेडरेशन’चे अध्यक्ष आहेत. याशिवाय भारतीय जनता पक्ष, मुंबई प्रदेशाचे उपाध्यक्षदेखील आहेत. ‘यशवंत चॅरिटेबल ट्रस्ट’चे विश्वस्त या नात्याने दहिसर ते कांदिवली परिसरात प्रकाश दरेकर यांचे विविध प्रकारचे सामाजिक काम गेली किमान २५ वर्षे सुरू आहे.
 

Prakash Darekar 1_1  
 
 
या कोरोना काळात प्रकाश दरेकर यांनी ‘मुंबई हाऊसिंग फेडरेशन’च्या वतीने एक मोबाईल अ‍ॅप्लिकेशन तयार केले. या अ‍ॅपच्या माध्यमातून मुंबईत अनेक ठिकाणी त्यांनी गरजू नागरिकांना तयार भोजन, अन्नधान्य, भाजीपाला इत्यादींचे वितरण केले. इमारतींमध्ये विविध कारणांसाठी येणारे कामगार म्हणजेच वृत्तपत्रविक्रेते, दूधवाले अशांसाठी एक ‘आदर्श आचारसंहिता’ म्हणजेच ‘स्टॅण्डर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर’ (एसओपी) तयार केली होती. या ‘एसओपी’चा खूप मोठा फायदा इमारतींमधील रहिवाशांना झाला.
 
 
कोरोनाच्या पहिल्या लाटेमध्ये सुरुवातीला मुंबईतून लाखो मजूर-कामगार रस्तामार्गे मुंबईबाहेर पडत होते. प्रकाश दरेकर राहत असलेल्या परिसरात म्हणजेच बोरिवली, दहिसरमधून जाणार्‍या पश्चिम द्रुतगती महामार्गावरून मोठ्या संख्येने हे मजूर बांधव जात होते. त्यांना भोजन आणि शिधासामग्रीची व्यवस्था दरेकर यांनी करून दिली. यावेळी दरेकर यांनी केलेल्या मदतीमुळे त्यांना मोठा दिलासा मिळाला आणि आपापल्या गावापर्यंत जाण्याची एक नवी उमेद मिळाली. त्यांच्या परिसरातील झोपडपट्ट्या, चाळी, इमारतींमध्ये राहणार्‍या रहिवाशांना तयार भोजन, शिधासामग्री, भाज्या, फळे इ. जीवनावश्यक गोष्टींचे वितरण केले. यावेळी कार्यकर्त्यांनीदेखील त्यांना साथ दिली.
 
 
कोरोनाचा प्रादुर्भाव आणि वाढती रुग्णसंख्या पाहता, सरकारने जागोजागी ‘कोविड सेंटर’ उभारली. तसेच, अनेक मोठ्या रुग्णालयांचे रूपांतर ‘कोविड सेंटर’मध्ये केले. या केंद्रांवरही प्रकाश दरेकर यांनी आवश्यक ती सर्व मदत पोहोचवली. संशयितांना रुग्णालयात दाखल करण्यापासून ते रुग्णांना औषधे उपलब्ध करून देण्यापर्यंत सर्व मदत त्यांनी केली. एवढेच नव्हे, तर एखाद्या घरामध्ये दुर्दैवी घटना घडल्यास किंवा कोणाचा मृत्यू झाल्यास अंत्यसंस्कारापर्यंतची सर्व व्यवस्था करून देण्याचे कामदेखील त्यांनी केले. रुग्णांची विचारपूस करून आवश्यक ती मदतही केली. सेच आरोग्य आणि रक्तदान शिबिरांचे आयोजन करणे आणि त्यांना योग्य तो प्रतिसाद मिळवणे, हे मोठे आव्हान होते. तसेच, या कालावधीमध्ये रक्ताचा मोठा तुटवडा निर्माण झाला होता. तो पूर्ववत व्हावा म्हणून त्यांनी रक्तदान शिबिरेदेखील आयोजित केली. कोरोनाग्रस्तांना योग्य त्या रुग्णालयात दाखल करण्यासाठी व्यवस्था उभी केली. कोरोनाग्रस्तांना सर्वात जास्त गरज असते ती प्राणवायू, अर्थात ‘ऑक्सिजन’ची. दुसर्‍या लाटेत एक कालावधी असा आला होता की, रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांनाही ‘ऑक्सिजन’ मिळणे दुरापास्त होत होते. रुग्णालयात जागा न मिळालेल्या रुग्णांची अवस्था तर बिकट होती. अशा वेळी आवश्यकता असलेल्या कोरोना रुग्णांना घरी ‘ऑक्सिजन’ मिळवून देण्याचे मोठेच काम प्रकाश दरेकर यांनी केले. अनेक ‘ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर’ विकत घेऊन त्यांनी रुग्णांना वेळेवर ते उपलब्ध करून दिले. परिणामी रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांनी या मदतीबद्दल त्यांचे मनापासून आभार मानले!
 
 
कोणत्याही आपत्तीत समाजाच्या मदतीला धावून जायचे, या मूळ प्रेरणेतून प्रकाश दरेकर यांनी कोरोना काळात काम केले. यावेळी त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. पण, त्या त्या वेळच्या परिस्थितीनुसार, ते त्यातून मार्ग काढत गेले. प्रकाश दरेकर यांच्या मोठ्या बंधूंचे स्मरण, प्रवीण दरेकर यांची प्रेरणा, पक्षकार्यकर्त्यांचा समर्पण भाव आणि परिस्थितीने उभे केलेले आव्हान, या सगळ्यामुळे आपण हे काम करू शकलो, असे ते आवर्जून नमूद करतात. “सामाजिक कामाचा पिंड असलेल्या कार्यकर्त्यासमोरची परिस्थिती जेवढी बिकट असते, तेवढी त्याची काम करण्याची जिद्द अधिक प्रखर बनते. हे आम्ही या काळात चांगलेच अनुभवले,” असेही ते सांगतात.


 
@@AUTHORINFO_V1@@