कोरोना हे जागतिक महामारीचे संकट होईल आणि जगाचे अर्थचक्र ठप्प होईल, असा विचार गेल्या वर्षीच्या प्रारंभी कोणाच्या मनातही आला नव्हता. पण, या संकटातही लोकांना धीर देत, त्यांना या आजाराशी सामना करण्यासाठी बळ दिले ते मुंबईतील प्रभाग क्र. २ चे भाजप नगरसेवक जगदिश ओझा यांनी. तेव्हा, या कोरोना महामारीच्या काळात त्यांनी केलेल्या मदतकार्याचा सविस्तर आढावा घेणारा हा लेख...
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची पार्श्वभूमी लाभलेल्या ओझा कुटुंबात जगदिश ओझा यांचा जन्म झाला. त्यांचे वडील करुणाशंकर ओझा हे रा. स्व. संघाचे जुनेजाणते स्वयंसेवक. त्यांच्याकडून प्रेरणा घेऊनच जगदिश ओझा यांनी आपल्या सामाजिक कार्याला सुरुवात केली. कुटुंबाला रा. स्व. संघाची पार्श्वभूमी लाभलेली असल्यामुळे सुरुवातीपासूनच ते संघाशी संपर्कात होते. त्यानंतर ते बजरंग दल, विश्व हिंदू परिषदेत सामील झाले. रामजन्मभूमी आंदोलनासह अनेक सामाजिक आंदोलने केल्यानंतर ते भारतीय जनता पक्षात सक्रिय झाले. पक्षात सचिव, महासचिव आणि वॉर्ड अध्यक्ष अशी पदे ओझा यांनी या आधी भूषविलेली आहेत. कोरोनाची पहिली लाट येताच नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. अशा परिस्थितीत सर्वप्रथम नागरिकांचे मनोधैर्य वाढविणे हे सर्वात महत्त्वाचे काम ओझा यांनी आपल्या सहकार्यांच्या माध्यमातून केले.
कोरोनाची पहिली लाट आल्यानंतर रोजंदारीवर जगणार्या लोकांच्या उदरनिर्वाहाची फार मोठी समस्या निर्माण झाली. ओझा यांनी त्यांच्या प्रभागात सर्वप्रथम ‘कम्युनिटी किचन‘ची सुरुवात केली. ‘कम्युनिटी किचन’च्या माध्यमातून अनेक भुकेल्यांच्या उदरात चार घास जातील, हे प्राधान्याने ओझा यांनी पाहिले. या काळात सुमारे दोन लाख फूड पॅकेटसह विविध प्रकारच्या अन्नपदार्थांचे वाटप करण्यात आले. तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या एक हजारांहून अधिक कुटुंबीयांना दैनंदिन वापरासाठी लागणार्या अन्नधान्य आणि किराणा गोष्टींच्या किटचे वाटप ओझा आणि सहकार्यांनी त्या काळात केले.कोरोनाची पहिली लाट आली तेव्हा प्रभागामधील प्रत्येक इमारत, झोपडपट्टीमध्ये आणि प्रत्येक निवासी सोसायटीमध्ये पूर्णपणे निर्जंतुकीकरण करण्याचे उद्दिष्ट भाजप कार्यकर्त्यांनी उराशी बाळगत गरजूंना मास्क, हॅण्डग्लोव्हज, सॅनिटायझरचे वाटप केले. तसेच मोठमोठ्या ट्रक्सच्या माध्यमातून प्रभागातील संपूर्ण परिसराचे निर्जंतुकीकरण केले. आनंद नगर, छत्रपती शिवाजी महाराज कॉम्प्लेक्स, एनएल कॉम्प्लेक्स या मुख्य इमारतींसह ७०० पेक्षा अधिक इमारतींमध्ये निर्जंतुकीकरण करण्यात आले. विशेष बाब म्हणजे, प्रभागात दोन ठिकाणी विलगीकरण कक्षांची स्थापनाही करण्यात आली.
त्याचबरोबर आरोग्य कर्मचार्यांना ‘पीपीई किट’चे वाटपदेखील करण्यात आले. प्रभागातील लोकांना रुग्णालयात दाखल करणे व त्यांना सुखरुप घरी पोहोचवण्याचे काम भाजप कार्यकर्त्यांनी ओझा यांच्या मार्गदर्शनाखाली केले. कोरोना काळात परराज्यातील मजुरांना त्यांच्या स्वगृही परतण्यासाठी लागणारी आवश्यक ती व्यवस्था, मग ती आर्थिक असो वा अन्नधान्याची, अशी विविध प्रकारची मदत स्थानिकांना देण्यासाठी भाजप कार्यकर्ते सक्रियपणे पुढे सरसावले. संपूर्ण सेवाकार्यात केली जाणारी मदत ही वंचित असलेल्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांनी मोठी मदतशृंखला निर्माण केली. ‘कम्युनिटी किचन’ उभारण्याच्या कामात ‘मनन फाऊंडेशन‘ नावाच्या एका अशासकीय सेवाभावी संघटनेची मदत लाभली. तसेच ‘श्री दहिसर काशीमठ’ नामक संघटनेचे सहकार्य लाभल्याचेही ओझा सांगतात.

दरम्यान, सेवाकार्याचे काही टीममध्ये विभाजन करुनच या कामाची सुरुवात करण्यात आली होती. त्यानुसार अन्न बनवणारी एक टीम, त्याचे वाटप करण्यासाठी दुसरी टीम, कोरोनाबाधितांना रुग्णालयात भरती करण्यासाठी योग्य ती कारवाई करणारी एक टीम आणि भरती झाल्यानंतर तिथे योग्य त्या सेवासुविधा उपलब्ध करुन देणारी टीम, यासह अशा एकूण आठ ते नऊ टीम ओझा यांच्या नेतृत्वाखाली तयार करण्यात आल्या होत्या, जेणेकरुन शेवटच्या गरजवंतापर्यंत मदत पोहोचविण्याचा आणि सेवाकार्याचा उद्देश सफल होईल. कोरोनाच्या पहिल्या लाटेचा सर्वाधिक फटका झोपडपट्टीतील रहिवाशांना बसला. त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांच्या माध्यमातून पहिल्या लाटेत झोपडपट्टीतील लोकांपर्यंत सर्वाधिक मदत पोहोचविण्याचा प्रयत्न केला गेला. दुसर्या लाटेत कोरोनाने निवासी इमारतींना आपल्या कवेत घेण्याचा प्रयत्न केला, तेव्हा औषधे, इंजेक्शन्स आणि आवश्यक ती सर्व सेवा पुरविण्यासाठी भाजप कार्यकर्त्यांनी विशेष लक्ष दिले.
‘वसुधैव कुटुंबकम्’ या मंत्राला अंगीकारुन कार्यकर्ते सेवाकार्याचा श्रीगणेशा करत सेवायज्ञाच्या भूमीवर उतरले. त्यामुळे मदत करताना समोरील व्यक्ती कोण आहे? कुठल्या प्रभागातील आहे? कुठल्या राज्यातील आहे? असा कुठलाही विचार कार्यकर्त्यांच्या मनाला शिवला नाही. शहरात कुठेही काहीही आवश्यकता भासली, तिथे ते नि:स्पृहपणे मदत पोहोचवण्याचे काम करत होते आणि अद्याप करत आहेत. सेवाकार्याच्या दरम्यान आलेल्या समस्या आणि अडचणींविषयी बोलताना जगदिश ओझा म्हणतात की, “पहिली गोष्ट म्हणजे हे कार्य करताना आम्ही आमच्या कार्यकर्त्यांची खूप काळजी घेतली. कारण, आम्ही कार्यकर्त्यांच्या माध्यमातून जनतेची सेवा करत होतो. त्यामुळे जर आमचा सेवाभावी कार्यकर्ताच जर बाधित झाला, तर त्यामुळे इतरही कार्यकर्ते बाधित होण्याची दाट शक्यता होती.” जगदिश ओझा आणि त्यांचे इतर आठ ते नऊ सहकारीदेखील कोरोनाबधित झाले होते. मात्र, परमेश्वराचे आशीर्वाद आणि सर्वसामान्य मुंबईकरांच्या सदिच्छांवर आम्ही कोरोनावर मात करु शकलो, असे जगदीश ओझा नमूद करतात.
“जेव्हा लोक आम्हाला आम्ही केलेल्या मदतीसाठी धन्यवाद देण्यासाठी, आभार मानण्यासाठी फोन करतात, संदेश पाठवतात, तेव्हा आम्हाला आम्ही केलेल्या कार्याची पोचपावती मिळाली, असे वाटते. वास्तविक मी आणि माझे काही सहकारी कोरोनाबाधित झालो होतो. काहींची प्रकृती तर अत्यंत नाजूक होती. मात्र, तरीही आम्ही त्यावर मात करुन सेवाकार्याला प्रारंभ करु शकलो, हे केवळ आणि केवळ सर्वसामान्य मुंबईकरांनी आमच्या कार्याला दिलेल्या आशीर्वादाच्या बळावर शक्य झाले,” असे ओझा मनमोकळेपणाने सांगतात. तेव्हा, त्यांच्या या कार्याला दै. ‘मुंबई तरुण भारत’चा सलाम!
- ओम देशमुख