स्वानुभवातून इतरांना प्रेरणा देणारा योद्धा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Aug-2021   
Total Views |

Vaibhav Mahale_1 &nb 
 

आपल्याला झालेला त्रास हा इतरांना होऊ नये, यासाठी आपल्याठायी असलेल्या वैद्यकीय ज्ञानाच्या जोरावर आणि ‘कल्पतरू मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल’च्या माध्यमातून डॉ. वैभव महाले यांनी कोरोनाग्रस्तांच्या सेवेचे व्रत हाती घेतले.
स्वतःला कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर, त्यातून प्रेरणा घेत इतरांना या आजारातून मुक्त करण्यासाठी अहोरात्र कार्यरत असणार्‍या डॉ. वैभव महाले यांच्या कार्याचा सविस्तर आढावा घेणारा हा लेख...
 
 
 
 कोरोना हा जसा संसर्गजन्य रोग आहे, तसाच त्याच्या प्रादुर्भावामुळे न केवळ शारीरिक तर मानसिक आघातदेखील होत असतात. त्यामुळे एक प्रकारे कोरोना हा आजार त्याच्या विषाणूमुळे जितका संसर्गजन्य आहे, तितकीच त्याच्या परिणामांचीदेखील संसर्गजन्यता क्लेशदायक आहे. ज्या कोणाला कोरोना झाला, त्याने आपले अनुभव इतरांना सांगत लागण होऊ नये, म्हणून काय करावे, तसेच लागण झाल्यानंतर काय करावे, याबाबत नक्कीच मार्गदर्शन केल्याची अनेक उदाहरणे दिसून येतात. मात्र, आपल्याला कोरोना झाल्यावर त्याचा असणारा त्रास, खर्च, नेमकी असणारी स्थिती, आरोग्यस्थिती पाहता आवश्यक असणारा खर्च याची नेमकी जाणीव डॉ. वैभव महाले यांना झाली. त्यांचा हा स्वानुभवच त्यांच्यासाठी कोरोना काळात करावयाच्या कार्याचा प्रेरणास्रोत ठरला.

 
आपल्याला झालेला त्रास हा इतरांना होऊ नये, यासाठी आपल्याठायी असलेल्या वैद्यकीय ज्ञानाच्या जोरावर आणि ‘कल्पतरू मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल’च्या माध्यमातून डॉ. महाले यांनी कोरोनाग्रस्तांच्या सेवेचे व्रत हाती घेतले. कोरोनाग्रस्तांसाठी अन्नदान, वस्त्रदान आदी कार्य डॉ. महाले यांनी केले आहेच. मात्र, त्यांनी लोकांच्या आरोग्याचे रक्षण करण्याचे महत्त्वाचे कार्य केले. ३५०० ते ४५०० नागरिकांना घरीच उपचार देण्यास त्यांनी सुरुवात केली. कोरोना काळात नाशिकमध्ये रुग्णसंख्या झपाट्याने वाढत होती. परिणामी, हॉस्पिटलमध्ये देखील रुग्णसंख्येमध्ये वाढ होणे स्वाभाविक होते. अशावेळी घरीच रुग्ण बरे करण्याचे डॉ. महाले यांचे हे व्रत नक्कीच फलदायी ठरले. डॉ. महाले यांचा ९८ ते ९९ टक्के इतका रुग्ण बरे करण्याचा दर या काळात होता. हा दर त्यावेळच्या शहरातील स्थिती पाहता नक्कीच महत्त्वाची भूमिका बजाविणार ठरला.
 
‘सिडको’ भागात आपल्या मदतकार्याचा अश्वमेध दौडवत असताना ६०० ते ७०० कुटुंबांपर्यंत अन्नदानाची मदत पोहोचवत डॉ. महाले यांनी त्यांची क्षुधातृप्ती करण्यातदेखील महत्त्वाची भूमिका बजावली. ऑगस्ट २०२० पासून डॉ. महाले यांचा असणारा हा मदतकार्याचा झरा आजही कार्यरत आहे. कोरोना काळात अनेक नागरिक हे भीतीच्या सावटाखाली आपले जीवन व्यतित करत होते. तसेच, अनेकांच्या मानसिक स्थितीवरदेखील यामुळे विपरित परिणाम होत होता. या काळात रुग्णालयात दाखल होऊन उपचार घेणे हे अनेकांना परवडणारे नव्हते. तसेच, प्रत्येक रुग्णाने रुग्णालयातच दाखल व्हावे, अशीदेखील स्थिती प्रत्येकाच्या बाबतीत नव्हती. त्यामुळे डॉ. महाले यांनी रुग्णांना घरीच उपचार देत त्यांचे मनोधैर्य वाढविणे आणि त्यांना व्याधीमुक्त करणे कामी महत्त्वाची भूमिका बजावली. डॉ. महाले यांना या कामात नाशिक पश्चिमच्या आमदार सीमा हिरे, शहर भाजपचे पदाधिकारी यांची मोलाची मदत झाली.
 
 
 
Vaibhav Mahale 1_1 &
 
 
कोरोनाचा फैलाव हा सर्वत्र होता. अशावेळी लोकांपर्यंत पोहोचत त्यांना मदत करणे, या एका मोठ्या आव्हानाचा सामना आपल्याला या काळात करावा लागला असल्याचे डॉ. महाले सांगतात. तसेच, लोकांच्या मनात कोरोनाबाबत भीती, समज-गैरसमज होते. त्यामुळे अनेकांच्या मनात नकारात्मकतादेखील निर्माण झाली होती. त्यांच्या मनातील सर्व अनाठायी भीती घालवत मनात सकारात्मकता जागृत करण्याचे मोठे आव्हान डॉ. महाले यांच्या समोर या काळात होते. या आव्हानांचा सामना करण्यासाठी डॉ. महाले यांनी संवादावर भर दिला. अनेक रुग्णांचे ‘फिडबॅक’ घेत त्यांच्याशी संवाद साधत त्यांच्या मनातील नेमक्या भावना त्यांनी जाणून घेतल्या. यासाठी त्यांनी प्रसंगी ‘ऑनलाईन’ सेशन घेत रुग्णांचा आत्मविश्वास जागृत करण्यावर भर देत, त्यांनी रुग्णांचे न केवळ कायिक, तर मानसिक आरोग्यदेखील या काळात जपले.
 
 
एका परिवारातील सहा रुग्ण हे कोरोनाबाधित होते. त्यांचे नातेवाईकदेखील त्यांना भेटण्यास येऊ शकत नव्हते. कोरोनासाठी आवश्यक असणारे सर्व उपचार डॉ. महाले यांनी त्या कुटुंबावर केले. हे रुग्ण आपल्या घरातीलच सदस्य आहेत, या भावनेतून डॉ. महाले यांनी त्यांच्यावर उपचार केले. ते सर्व रुग्ण ठणठणीत बरे झाले. त्यांच्या चेहर्‍यावरील असणारे कृतकृत्यतेचे भाव, डोळ्यातील आपलेपणाची भावना ही कधीही न विसरता येण्याजोगी असल्याचे डॉ. महाले आवर्जून सांगतात. हा क्षण आपल्या जीवनातील अत्यंत पराकोटीचा भावनिक क्षण असल्याचे ते आवर्जून नमूद करतात.डॉ. महाले यांना दि. ११ मार्च, २०२१ रोजी पुत्ररत्न प्राप्त झाले. मात्र, ते स्वतः कोरोना रुग्णांची सेवा करत असल्याने पुढील तीन महिने ते आपल्या नवजात शिशुला साधे पाहूदेखील शकले नव्हते. अशावेळी डॉ. महाले यांना त्यांच्या कुटुंबातील सर्वच सदस्यांचा मिळालेला भावनिक आधार हा खूप मोलाचा होता.
 
 
डॉ. महाले यांना त्यांच्या या कार्यासाठी आमदार सीमा हिरे, भाजप नेते लक्ष्मण सावजी, भाजपचे सर्व शहर पदाधिकारी स्वतःच्या हॉस्पिटलमधील सर्व कर्मचारी वर्ग यांचे सहकार्य लाभले. तसेच, डॉ. महाले यांचे यांचे शालेय जीवनातील मित्र महेंद्र थोरात, धनराज मोहन, गणेश व्यवहारे, सचिन निसळ, विजय पवार, दिनेश भदाणे, भरत बाविस्कर, सुजय पारख, दिपक सोनावणे यांचे महत्त्वाचे सहकार्य लाभले. डॉ. महाले यांच्या या मित्रांनी त्या काळात असणारा ऑक्सिजनचा पुरवठा करण्यासाठी स्वतःच्या वाहनातून व्यवस्था केली. त्यामुळे अनेकांना आवश्यक असणारा प्राणवायू या काळात सहजतेने उपलब्ध होण्यास मदत झाली.

 
आपल्यावर ओढवलेल्या दुर्दैवी क्षणाचा सुयोग्य वापर करत, डॉ. महाले यांनी अनेकांना आधार देण्याचे मोठे कार्य या काळात केले. स्वत: कोरोना बाधितांच्या सेवेत असताना पितृप्रेम, ओढ बाजूला सारत डॉ. महाले यांनी आपल्या वैद्यकीय कर्तव्यास महत्त्व दिले. त्यांचे हे कार्य अनेकांसाठी महत्त्वाची भूमिका बजाविणारे ठरले. जी व्यक्ती मनापासून कार्य करते तिच्या मदतीला अनेकांची साथ लाभत असते, हेच डॉ. महाले यांच्या कार्याला मिळालेल्या प्रतिसादावरून दिसून येते. रुग्णांना मानसिक आधार देत त्यांना घरीच बरे करण्याचे डॉ. महाले यांनी केलेले कार्य हे अनेकांसाठी जीवनाधार देणारे ठरले, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

 
@@AUTHORINFO_V1@@