शहराच्या पालनपोषणाची जबाबदारी ज्यांच्या खांद्यावर होती, त्या सत्ताधारी पक्षाचे काही नेते कोरोना वैश्विक महामारीच्या काळात आपल्या जीवाची काळजी घेत घरात कडी लावून बसले होते. मात्र, या कठीण परिस्थितीतही आपल्या प्रभागातील शेवटच्या कोरोनाबाधितापर्यंत पोहोचून त्याला रुग्णालयात भरती करण्यापासून, त्याला कोरोना केंद्रातून सुखरुप बाहेर काढण्याची जबाबदारी लीलया पेलली ती भाजप नगरसेवक अभिजित सामंत यांनी...
मागील दीड वर्षापासून संपूर्ण देश कोरोनाविरुद्धची लढाई प्रत्यक्ष मैदानात उतरुन आक्रमकपणे लढत आहे. समाजातील विविध घटक जसे की, आरोग्य कर्मचारी, पोलीस, अत्यावश्यक सेवेतील माणसं यांच्याकडे या लढाईचे नेतृत्व आहे व त्यांच्यामागे संपूर्ण देश खंबीरपणे उभाही राहिला. साहजिकच या घटकांचे समाजमाध्यमांनीही कौतुक केले. मात्र, समाजात काही अशी मंडळीदेखील आहेत, ज्यांनी या कोरोना युद्धात प्रसिद्धी आणि आत्मस्तुती करून घेण्यापेक्षा थेट मैदानात उतरून प्रत्यक्षात कोरोना विरुद्ध काम करण्याचा निश्चय केला आणि तो तडीसही नेला.
साधारणपणे सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात वावरणारी मंडळी ‘काम कमी, पण प्रसिद्धी अधिक’ या तत्त्वानुसार चालतात. मात्र, त्याला भाजपचे नगरसेवक अभिजित सामंत यांच्यासारखी काही माणसं अपवाद ठरतात.मुंबई महानगरपालिकेत भाजपची भूमिका जरी पहारेकर्याची असली, तरी जनहिताच्या कुठल्याही कामाला कसलीही आडकाठी न आणणार्या भाजप व अभिजित सामंत यांच्यासारख्या नगरसेवकांनी आपली जनतेशी असलेली बांधिलकी कधीही सोडली नाही. मुंबईकर सत्ताधीशांच्या दरबारी किती वेळा गेले, यापेक्षा लोकांनी भाजपच्या लोकांना आपले मानून त्यांना आपल्या वेदना सांगितल्या व अभिजित सामंत यांच्यासारख्या असंख्य भाजप कार्यकर्त्यांनीदेखील सत्ताधीशांचे अनेक वज्राघात सहन करुन लोकांच्या मागण्या पूर्ण केल्या, त्या फक्त जनतेशी असलेल्या बांधिलकीमुळेच!
राजकारणासोबतच समाजकारणाचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या अभिजित सामंतांनी गाठीशी असलेले अनुभव आणि जोडलेली मानवश्रृंखला याला एका धाग्यात गुंफून कोरोनाच्या चक्रव्युहात अडकलेल्या आपल्या प्रभागातील नागरिकांना सुखरुप बाहेर काढण्याचा संकल्प केला.शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव ज्वालामुखीच्या उद्रेकापेक्षाही तीव्र गतीने होत होता. ‘करून दाखवलं‘चा डांगोरा पिटणार्या मंडळींचा या काळात थांगपत्ताही नव्हता. तेव्हा अभिजित सामंतांसारख्या भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांनी तन-मन-धनाने लोकांच्या सेवेसाठी अव्याहतपणे कामाला सुरुवात केली.तसे पाहायला गेले, तर अभिजित सामंत यांचा वॉर्ड अंधेरी ते विलेपार्ले दरम्यान विस्तीर्ण स्वरुपात पसरलेला. त्यातही या भागात वाढत्या रुग्णसंख्येची टांगती तलवार तर डोक्यावर होतीच. मात्र, तरीही उपलब्ध संसाधनांचा सुयोग्य वापर आणि पाठीशी उभे राहिलेल्या कार्यकर्त्यांची कामं करण्याची तयारी या बळावर त्यांनी कामाची रचना केली. ज्याला जी जबाबदारी दिली, त्या प्रत्येकाने ती तितकीच काळजीपूर्वक आणि आत्मियतेने बजावली.
कोरोना असो वा इतर कुठलाही आजार, त्या आजाराची लागण झालेल्या व्यक्तीला वैद्यकीय उपचारांपेक्षाही अधिक आवश्यकता असते ती म्हणजे मानसिक पाठबळाची. अभिजित सामंत आणि मंडळींनी आपल्या कामाची सुरुवात याच कामापासून केली ते म्हणजे कोरोनाबाधित व त्याच्या कुटुंबीयांचे मानसिक स्थैर्य टिकवणे. सर्वप्रथम त्यांनी कोरोनाबाधित आणि कोरोनाबाधितांच्या कुटुंबीयांना मानसिकदृष्ट्या स्थैर्य दिले. आपल्याला किंवा आपल्या कुटुंबीयांना झालेला आजार हा बरा होऊ शकतो आणि त्यातून तो आजार बरा होईलच, हा विश्वास त्यांनी प्रत्येकामध्ये भिनवला, ज्यामुळे त्यांनी अर्धी लढाई इथेच जिंकली.
कोरोनाची पहिली लाट जेव्हा भारतात आली तेव्हा लोक त्याबद्दल पूर्णत: अनभिज्ञ होते. त्यावेळी ‘कमोडिटी आयसोलेशन’मध्ये दाखल होणार्या रुग्णांची संख्या अधिक होती. कोरोनाबाधितांची मोठी संख्या तिथे भरती होत असल्याने स्वाभाविकपणे सर्व संसाधनांवर तणाव निर्माण झाला. त्यातून कोरोनाबाधितांना जेवण व इतर सुविधा योग्यरित्या मिळत नव्हत्या, त्यांची देखरेख व्यवस्थितरित्या होत नव्हती, यावर अभिजित सामंत व त्यांच्या सहकार्यांनी अनेक प्रयत्न करून रुग्णांना आवश्यक त्या सुविधा ‘कोरोना सेंटर’मध्येदेखील उपलब्ध करून दिल्या. वॉर्डात एप्रिल २०२० मध्ये १८ हजार मास्कचे वाटपही सामंत यांनी केलेले आहे. काही लोक आजारापेक्षा त्याच्या धास्तीने अधिक खचून जायचे, यावर तोडगा काढणे अत्यंत महत्त्वपूर्ण होते. कॅनडावरुन आलेल्या एका मुलाला रात्री दीड वाजता उलट्या व कोरोनाची इतर लक्षणे दिसू लागली होती. त्याने मध्यरात्री अभिजित सामंत यांना फोन लावला. प्रचंड मानसिक दडपण आणि शारीरिक आजार अशा दुहेरी यातनेत अडकलेल्या त्या मुलाला अभिजित सामंत यांनी बळ दिले, त्याच्याशी बोलून त्याला आजाराशी मुकाबला करण्यासाठी धैर्यशील बनवले आणि त्याचा सुयोग्य परिणाम झालाच. रात्री दीड वाजता शारीरिक व मानसिक अशा दुहेरी संकटातून हतबल झालेल्या त्या मुलाने त्यांना पहाटे ५ वाजता फोन लावून सांगितले की, मी लढेन, पण हार मानणार नाही आणि काही दिवसांत तो मुलगा ठणठणीत बरा झालाही!
काही तासांपूर्वी आजाराने नैराश्येकडे झुकलेल्या मुलाला केवळ आपल्या शब्दांनी आधार दिला तो अभिजित सामंत यांनी. हे उदाहरण केवळ प्रातिनिधिक स्वरुपातले होते, अशी अनेक उदाहरणं त्यांनी केलेल्या कामातून आपल्या समोर येतील. त्यानंतर अभिजित सामंत यांनी रुग्णालय प्रशासन, पालिका प्रशासन यांच्यासोबत आपला समन्वय राखून ठेवला. रुग्णांसाठी ‘ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर’ उपलब्ध करून देणे, घरात असलेल्या कोरोना रुग्णांना रुग्णालयात भरती करणे, त्यांच्यासाठी रुग्णवाहिकेची व्यवस्था करणे, झोपडपट्टीतील गरीब परिवारांना मोफत अन्नधान्य व इतर आवश्यक वस्तूंचे वाटप करणे, ‘आर्सेनिक अल्बम’च्या गोळ्यांचे १३ हजार घरांमध्ये भाजप पदाधिकारी, सोसायटी व चाळीचे पदाधिकारी यांच्यामार्फत वाटप करणे, यांसारख्या अनेक गोष्टी केल्यामुळेच अनेकांचे आयुष्य त्या कठीण काळातही सुसाहाय्य बनले. दीड हजारांपेक्षा अधिक कुटुंबीयांना अन्नधान्य वाटप केल्यानंतर त्या गरीब कुटुंबातील सदस्यांच्या डोळ्यात येणारे अश्रू हृदयाला हेलावणारे होते. क्षणार्धात डोळ्याला अश्रूंच्या धारा लागाव्यात, असे अनेक प्रसंग त्यांनी या काळात अनुभवलेले.
अभिजित सामंत यांनी ‘रवींद्र जोशी मेडिकल फाऊंडेशन’ व ‘केशवसृष्टी’च्या साहाय्याने प्रभाग क्र. ८४ मध्ये माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत एका अद्ययावत ‘कोविड सेंटर’ची सुरुवात केली. त्यामध्ये उत्तम दर्जाची भोजन व्यवस्था, लहान मुलांसाठी करमणुकीची साधनं या सर्व सुविधा पुरवण्यात आल्या अन् जेव्हा आजपर्यंत या सेंटरमध्ये १०० रुग्ण दाखल झाले आहेत, त्यापैकी ७५ रुग्ण बरे होऊन परतले आहेत, तर १४ रुग्ण उपचार घेत असून, ११ रुग्णांना मोठ्या इस्पितळात दाखल करण्यात आले.‘कोरोना सेंटर’मध्ये थेट रुग्णांपर्यंत जाऊन त्यांची काळजी घेणार्या अन् शेवटच्या रुग्णापर्यंत आपण आपल्या मदतीच्या माध्यमातून पोहोचलो पाहिजेत, या भावनेने अविरतपणे काम करणार्या सच्च्या कोरोना योद्धा देवदूताला दै. ‘मुंबई तरुण भारत’चा सलाम!
- ओम देशमुख