मुंबई : मागील जवळपास दोन वर्षांपासून सुरू असलेला कोरोना संसर्ग आणि राज्यातील निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर एक आनंदाची बातमी आली आहे. मुंबईकरांचे आराध्य दैवत असलेला ‘लालबागचा राजा’ यंदा विराजमान होणार असून बाप्पाच्या दर्शनाचा लाभ सर्व गणेशभक्तांना मिळणार आहे.
मागील वर्षी कोरोना संसर्गामुळे लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळ समितीतर्फे ‘आरोग्य उत्सव’ साजरा करण्यात आला होता. यावर्षी मात्र राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचनेनुसार कोरोना प्रतिबंधक सर्व नियमांचे पालन करून गणेश उत्सव साजरा केला जाणार असल्याचे ‘लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ समिती’च्या बैठकीत निश्चित करण्यात आले आहे.
“मूर्तीच्या उंचीबाबत जे निर्बंध, जे नियम शासनाने घालून दिले आहेत, त्याचे काटेकोरपणे पालन केले जाईल, तसेच राजाच्या दर्शनासाठीही भाविकांना ‘ऑनलाईन’ दर्शनाची सुविधा उपलब्ध करून दिली जाईल,“ असे मंडळाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.