कर्करोगाचे ‘टॉप सर्जन’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Aug-2021   
Total Views |

Herur _1  H x W
कर्करोग झालेल्या रुग्णाला ‘कोविड’ची लागण झाल्यास, त्याच्यावर उपचार करणे, हे काम या महामारीच्या काळात डॉक्टरांसाठी आव्हानात्मक होते. परंतु, हे आव्हान अगदी समर्थपणे पेलण्याचे काम डोंबिवलीतील डॉ. अनिल अशोक हेरूर आणि त्यांच्या डॉक्टरांच्या टीमने आवर्जून केले. त्यामुळे आधीच कर्करोग व त्यात कोरोनाबाधित, अशा रुग्णांसाठी ‘देवदूत’ ठरलेल्या डॉ. अनिल हेरुर यांच्या कार्याचा परिचय करुन देणारा हा लेख...
 
डॉ. अनिल हेरूर यांचे शालेय शिक्षण ‘मॉडेल इंग्लिश स्कूल’ येथे झाले. ‘डी. जे. रूपारेल’ या महाविद्यालयातून बारावीपर्यंतचे शिक्षण त्यांनी घेतले. त्यानंतर त्यांनी ‘सेंट जी. एस मेडिकल कॉलेज’ आणि ‘केईएम’ रुग्णालयातून वैद्यकीय प्रशिक्षण घेतले. ‘लोकमान्य टिळक म्युनिसिपल मेडिकल महाविद्यालया’तून शल्य चिकित्सेत मास्टर्सची पदवी त्यांनी संपादन केली. ‘टाटा’ रुग्णालयात सात वर्षे पॅ्रक्टिसही केली. त्यानंतर काही वर्षे शिक्षणासाठी ते परदेशातही होते. अन्ननलिका आणि मोठ्या आतड्यांचा कर्करोग या विषयामध्ये त्यांना विशेष रस होता. त्या विषयाचे शिक्षण त्यांनी परदेशात जाऊन घेतले.
 
 
अमेरिकेत प्रसिद्ध रुग्णालयाची शिष्यवृत्ती डॉ. अनिल यांना मिळाली होती. एवढेच नव्हे, तर त्यांना जपानमध्येही शिष्यवृत्ती मिळाली होती. परदेशात वैद्यकीय शिक्षण घेतल्यानंतर डॉ. हेरूर मायदेशी परतले. डोंबिवलीत कर्करोगावर उपचार करणारे डॉक्टर फारसे नसल्याने त्यांनी डोंबिवलीतील रुग्णांची सेवा करण्याचा वसा घेतला. त्यांच्या घरात सर्व सदस्य डॉक्टर असल्याने लहानपणापासूनच आपणही डॉक्टर व्हायचे, हे त्यांनी मनोमन पक्के केले होते. पुढे गुणवत्तेवर त्यांना वैद्यकीय अभ्यासक्रमाला प्रवेश मिळाला. त्यांची ‘टाटा’ रुग्णालयात पोस्टिंग झाली. ‘एम.एस.’ करताना त्या ठिकाणी शल्यक्रिया पाहून त्यांना ‘कर्करोग’ या विषयात ‘स्पेशलायझेशन’ करण्याची इच्छा निर्माण झाली.
 
 
डॉ. हेरूर यांच्या आई डॉक्टर असल्याने त्यांचे फडके रोडवर रुग्णालय होतेच. त्याच रुग्णालयाच्या दुसर्‍या मजल्यावर डॉ. हेरूर यांनी कर्करोगावर उपचार करणारा विभाग सुरू केला. ‘अनिल आय केअर’ नावाने त्यांचे रुग्णालय आहे. २००४ मध्ये डोंबिवलीतील कर्करुग्णांना डोंबिवलीतच उपचार मिळण्यास मदत झाली. त्यांनी बरेच ‘पब्लिकेशन्स रिसर्च’ केले आहेत. गेल्या वर्षात सात पब्लिकेशन्स राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर झाले आहेत. डॉ. हेरूर यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय फोरममध्ये दीडशेहून अधिक व्याख्याने दिली आहेत. मोठ्या आतड्याच्या कर्करोग शस्त्रक्रियेच्या प्रशिक्षणासाठी डॉ. हेरूर यांना बांगलादेश, श्रीलंका, आफ्रिकेतील विविध देशांत आमंत्रित केले जाते.
 
 
 
कोरोनाचे रुग्ण मार्च २०२० पासून भारतातही आढळू लागले. राज्य सरकारकडून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, याकरिता ‘लॉकडाऊन’ जाहीर करण्यात आला होता. मुंबईकरांची जीवनवाहिनी असलेली रेल्वेची दारे सामान्य नागरिकांकरिता बंद झाली होती. त्यामुळे एखाद्या रुग्णाला काही लक्षणे दिसून आली तरी त्यांना ‘टाटा’सारख्या रुग्णालयापर्यंत पोहोचणे शक्य नव्हते. या काळात काही खासगी डॉक्टरांनी आपली सेवा ‘ऑनलाईन’ सुरू केली होती. कर्करोगावरील केवळ चार ते पाच रुग्णालयांत उपचार मिळत होते. त्यामुळे अनेक रुग्णांना कर्करोगाचे निदान झाले नाही. कोरोनाकाळात रुग्णाला कर्करोगाचे निदान न झाल्याने आणि वेळेत केवळ उपचार न मिळाल्याने, कोरोनाव्यतिरिक्त जगभरात एक लाख मृत्यू केवळ कर्करोगाने झाल्याचे वास्तव डॉ. हेरूर यांनी समोर आणले आहे.
 
 

Herur _2  H x W 
 
 
 
कर्करोगाच्या रुग्णांचा विचार करून केवळ डॉ. हेरूर यांनी आपली रुग्णालयातील सेवा पूर्णपणे सुरू ठेवली होती. ‘कोविड’ची नियमावली पाळून रुग्णालय खुले होते. एवढेच नाही, तर रुग्णांवर कोणताही आर्थिक भार पडणार नाही, याचीही काळजी त्यांनी घेतली. रुग्णाला वेळेत उपचार मिळणे इतकेच ध्येय त्यांच्यासमोर होते. कर्करोग रुग्णांसाठी वेळ ही महत्त्वाची असते. कर्करोग काळात शल्यचिकित्सा सुरू ठेवणे महत्त्वाचे होते. पहिल्या ‘लॉकडाऊन’मध्ये शल्यचिकित्सा सुरू ठेवावी की नाही, याबाबत संभ्रम होता. कारण, शल्यचिकित्सा करताना ‘अ‍ॅरोसॉस’ होते. म्हणजेच रक्ताचे फवारे उडत नसले तरी हवेत कण उडू शकतात.
 
 
 
‘अ‍ॅनेस्थेशिया’चे गॅसेस त्यातून कोरोना जाऊ शकत होता. त्यात ‘पीपीई कीट’ घालून शल्यचिकित्सा करणे कठीण होते. तरीही शल्यचिकित्सा सुरू ठेवल्या होत्या. पण, रुग्णच शल्यचिकित्सा लांबणीवर टाकत होते. गेल्या वर्षात ६०० कर्करोगच्या रुग्णांवर त्यांनी उपचार केले. पण, यावेळी रुग्णांना या उपचाराचा खर्च अधिक येणार नाही, याचीदेखील काळजी घेतली. शस्त्रक्रियेतही शक्य होईल तेवढा खर्च कमी करण्याचा प्रयत्न केला. ‘केमोथेरपी’मध्ये सवलत रुग्णांना दिली होती. ज्या कर्करोगाच्या रुग्णांना ‘कोविड’ झाला आहे, त्यांच्यावर उपचार कसे करायचा, हे तरीही एक मोठे आव्हान कायम होते. रुग्णालय यासंबंधी काळजी घेत असल्याने अशा रुग्णांचे प्रमाण कमी होते. पण, उपचारासाठी जे रुग्ण येत होते, त्यांना ‘आरटीपीसीआर’ चाचणी करणे अनिवार्य होते.
 
 
‘कोविड’ झालेल्या कर्करोगाच्या रुग्णांवर तत्काळ उपचार करावे लागत होते. इतर ‘कोविड’ रुग्णांपासूनही त्यांना विलगीकरणात ठेवावे लागत होते. ‘केमोथेरपी’च्या रुग्णाला ‘कोविड’ झाला असेल, तर त्यांची विशेष काळजी घ्यावी लागत होती. कारण, त्यांची प्रतिकारशक्ती कमी झालेली असते. त्यांची प्रतिकार शक्ती वाढण्यासाठी इंजेक्शन द्यावी लागत होती. ‘कोविड’चे उपचार करणार्‍या डॉक्टरशी संपर्क ठेवावा लागत असे. ‘कोविड’काळात रक्तामध्ये गाठी होण्याचे प्रमाण खूपच वाढले होते. ही प्रक्रिया शस्त्रक्रियेनंतर जास्त वाढत असल्याचे दिसले. हे रुग्णांसाठी धोकादायक असते.
 
 
 
रुग्णांना एका बाजूला कॅन्सर आणि दुसर्‍या बाजूला ‘कोविड’ म्हणजे एकीकडे आड आणि दुसरीकडे विहीर, अशी परिस्थिती होती. या रुग्णांना खूप धीर द्यावा लागत होता. ‘कोविड’ बरा झाला की, कर्करोगाची शस्त्रक्रिया लगेचच करावी, असे रुग्णांना वाटत असे. पण, त्यांना समजावून ‘कोविड’ बरा झाल्यावर आणि शस्त्रक्रियेमध्ये तीन आठवड्यांची गॅप ठेवत होतो. कर्करोगाच्या रुग्णांना बेड मिळत नव्हते. त्यात खूप त्रास होत होता. दुसर्‍या लाटेत प्रत्येक रुग्णालय ‘कोविड’ झाले होते. मात्र, कर्करोगाच्या रुग्णांना बेड उपलब्ध होत नव्हते. त्यांचे या काळात खूप हाल झाले. कर्करोगाच्या रुग्णांना ‘कोविड’ झाल्यास त्यांना इतर ‘कोविड’ रुग्णांपासूनही विलग करावे लागत होते. त्यांना पोषक अन्न मिळाले, तर ‘कोविड’मधून बरे होण्याचे प्रमाण कमी होण्याची शक्यता होती. कर्करोगाच्या रुग्णांवर उपचार सुरू होते तरी त्यांना सतत ‘कोविड’वर उपचार करणार्‍या डॉक्टरांशी बोलून उपचारात बदल करावा लागत होता.
 
 
 
‘ऑक्सिजन’ची कमतरता असल्याने महापालिकेने शस्त्रक्रिया पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे डॉ. हेरूर यांनादेखील शस्त्रक्रिया दोन ते तीन वेळा पुढे ढकलाव्या लागल्या होत्या. शस्त्रक्रिया होईल, पण, त्या पुढे काय, असा प्रश्न होता. ज्या रुग्णांना दोन ते तीन महिने थांबावे लागले, त्यांना खूप त्रास झाल्याचे डॉ. हेरूर यांनी सांगितले. २०१३ मध्ये ‘गोपाळकृष्ण चॅरिटेबल ट्रस्ट’ची डॉ. हेरुर यांनी स्थापना केली. या ट्रस्टच्या माध्यमातून कर्करोग व नेत्रतपासणी केली जाते. तसेच डॉ. हेरुर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रासोबतदेखील काम करतात. प्रशासनाने ट्रस्टला प्रशस्तीपत्रकही दिले आहे.
 
 
 
‘कोविड’काळात गरिबांचे दोन वेळच्या जेवणाचेही हाल झाले. तेव्हा, डॉ. हेरुर यांनी गरजूंसाठी अन्नदान केले. समाजाकडून कायम दुर्लक्षित असलेल्या तृतीयपंथीयांना देखील त्यांनी अन्नधान्याचे वाटप केले. कल्याणच्या दुर्गाडी किल्ल्याच्या बाजूला असलेल्या वसाहतीमध्येही त्यांनी मदतीचा हात दिला. कल्याण आधारवाडी व डोंबिवली पूर्वेला मानपाडा रोड येथे ‘कम्युनिटी किचन’ हा उपक्रम त्यांनी राबविला होता. पहिल्या ‘लॉकडाऊन’मध्ये पूर्ण वेळ हा उपक्रम सुरू होता. तसेच हॉटेलमध्ये काम करणार्‍यांना उपचारासाठी देखील डॉ. हेरुर यांनी मदत केली. त्याचबरोबर सहा महिन्यांत ‘कॅन्सर स्क्रिनिंग’ची २० शिबिरेदेखील त्यांनी आयोजित केली होती.
 
 
२०१८ मध्ये कर्करोग रुग्णांसाठी सपोर्ट ग्रुप असावा, यासाठी ‘मैत्री ग्रुप’ची डॉ. हेरुर यांनी स्थापना केली. काही रुग्ण डॉक्टरांशी आपल्या आजाराबद्दल, भावनांबद्दल मनमोकळेपणाने बोलू शकत नाहीत. असे हे सर्व रुग्ण एकमेकांना भेटतात. त्यांच्याशी संवाद साधतात. ‘कोविड’ नसताना ते एकमेकांसोबत वेगवेगळ्या प्रकारचे क्लास घेत असत. कोरोनाकाळात त्यांना ‘ऑनलाईन’ धडे देण्यात आले आणि ‘कोरोना कट्टा’ नावाने चार कार्यक्रमही घेतले. प्रत्येक सामाजिक कामात डॉ. हेरुर यांना वेगवेगळ्या संस्था, संघाचे कार्यकर्ते यांनी मदत केल्याचे ते सांगतात. कुटुंबातूनही त्यांना ‘कोविड’काळात पूर्णपणे पाठिंबा होता. त्यांची दोन्ही मुले अनिरुद्ध आणि मकरंद हेदेखील आता वैद्यकीय व्यवसायात पदार्पण करीत आहेत. त्यांच्या पत्नी डॉ. अनघा, आई डॉ. उमा आणि वडील अशोक यांचाही पूर्ण पाठिंबा होता. कर्मचारीवर्गाचेही मोठे सहकार्य केल्याचे डॉ. हेरुर आवर्जून नमूद करतात.




@@AUTHORINFO_V1@@