झोकून देत कार्य करणारी कार्यसिद्धी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Aug-2021   
Total Views |

Suvarnna Jagtap  _1 
सुसंस्कारित, शिक्षित आणि समंजस महिला जेव्हा एखाद्या आपत्तीप्रसंगी सामाजिक कार्यात स्वतःला पूर्णपणे झोकून देते, कार्याची परिसीमा गाठते, तेव्हा निश्चितच एक सकारात्मक सामाजिक चित्र उभे राहते. याचीच अनुभूती ठायी ठायी आपल्याला येते ती नाशिक जिल्ह्यातील लासलगाव बाजार समितीच्या सभापती सुवर्णा जगताप यांनी कोरोनाकाळात केलेल्या व्यापक मदतकार्यातून. त्यानिमित्ताने त्यांच्या सेवाकार्याचा हा परिचय...
 
 
सन २०२०च्या कोरोनाच्या काळात नाशिक जिल्ह्यातील पहिला कोरोना रुग्ण सापडला तेच हे लासलगाव. नाशिक जिल्ह्यातील वैद्यकीय, प्रशासकीय आणि सामाजिक यंत्रणेसाठी सापडलेला पहिला रुग्ण हा एक प्रकारे ‘वॉर्निंग कॉल’ होता. कोरोनाशी दोन हात करण्यासाठी सज्ज असलेल्या यंत्रणेची प्रत्यक्ष परीक्षा या एका रूग्णानंतर खर्‍या अर्थाने सुरु होणार होती. त्याच वेळी फारशी माहिती नसलेला आणि आपापल्या परीने कोरोनाचे वर्णन होऊ शकेल, अशा कोरोनाबाबत लासलगावकरांना माहिती देणे, आशिया खंडातील सर्वात मोठी बाजार समिती अशी ओळख असलेल्या लासलगाव बाजार समितीला कोरोनाच्या विळख्यापासून दूर ठेवणे हे आव्हान यावेळी जगताप यांच्या समोर होते. मुळातच साधकबाधक विचार करण्याची असणारी क्षमता आणि समजाप्रति असणारी कणव यामुळे जगताप यांनी हे आव्हान लिलया पेलले.
 

Suvarnna Jagtap 11  _1&nb
 
कोरोनाच्या पहिल्या लाटेला नुकतीच सुरुवात झाली होती. त्यातच एप्रिल-मे महिन्यात कोरोनाचे संकट गंभीर झाले होते. देशभर ‘लॉकडाऊन’ जाहीर करण्यात आला होता. त्यामुळे अन्यप्रांतीय नागरिक हे अडकून पडले होते. हाताला काम नाही. त्यामुळे पोटात अन्न नाही, अशी स्थिती त्यांची झाली होती. अशावेळी जगताप यांनी शिधावाटप करत या नागरिकांना आधार दिला. सुमारे १५०० कुटुंबीयांना पीठ, तांदूळ, गोडेतेल, हरभरा डाळ, बेसन पीठ यांचे वाटप करत जगताप यांनी त्यांची क्षुधातृप्ती केली. तसेच, अनेक नागरिकांनी याकाळात त्यांनी जेवणाचे डबे पुरवत त्यांना शिजविलेले अन्न उपलब्ध करून दिले.
 
 
कोरोनाकाळात जसे समाजात अनेक प्रश्न निर्माण होत होते, तसेच बाजार समितीच्या आवारात शेतमाल विक्रीसाठी येणार्‍या नागरिकांच्या माध्यमातूनदेखील कोरोना फैलावण्याचा धोका होताच. तसेच येथे येणार्‍या नागरिकांचे आरोग्यरक्षण करण्याचीदेखील जबाबदारी जगताप यांच्यावर होती. त्यासाठी त्यांनी बाजार समिती ही कोरोनापासून सुरक्षित राहावी यासाठी तेथे दहा हजार मास्कचे वाटप केले. लासलगाव, विंचूर, निफाड आदी परिसरातून येथे दाखल होणार्‍या शेतकर्‍यांना यामुळे मोठा दिलासा मिळाला.
 
 
पहिल्या लाटेचा सामना केल्यावर नाशिक जिल्ह्यात कोरोनाच्या दुसर्‍या लाटेने अक्षरश: थैमान घातले होते. त्यावेळी लासलगाव तरी कसे मागे असणार? जिल्ह्यातील इतर ठिकाणाप्रमाणे कोरोनाच्या दुसर्‍या लाटेने लासलगावलादेखील आपल्या कवेत घेण्यास या काळात सुरुवात केली होती. लासलगाव बाजार समितीती रोज हजारो वाहने ही शेतमाल घेऊन दाखल होत असतात. त्यात सुमारे चार ते पाच हजार शेतकर्‍यांचा रोज प्रत्यक्ष वावर बाजार समितीत असतो. त्यामुळे मास्क वाटप आणि वापर यावर जगताप यांनी विशेष भर या काळात दिला. तसेच, संपूर्ण बाजार समिती आवार १०० टक्के निर्जंतुक होण्यासाठी सातत्याने फवारणी करणे जगताप यांनी अविरत सुरु ठेवले.
 
 
काही सामाजिक संस्थांच्या मदतीने अद्ययावत आणि यांत्रिक हेल्मेटच्या माध्यमातून चार ते पाच हजार नागरिकांचे स्कॅनिंग करत कोरोनाची लक्षणे असणारे रुग्ण हेरण्याचे दिव्य जगताप यांनी याकाळात पार पडले. तसेच, ‘रॅपिड टेस्ट’वर भर देत लागण असणारे रुग्ण जगताप यांनी समोर येण्यासाठी महत्त्वाची भूमिका याकाळात बजावली.
 
 
दुसर्‍या लाटेत ऑक्सिजन बेड, ‘व्हेंटिलेटर बेड’ उपलब्ध होण्यात मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. अशावेळी आपल्या स्वमालकीच्या कंपनीच्या माध्यमातून जगताप यांनी पाच ‘ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर’ मशीन्स विकत घेतली. त्याचा फायदा २०० ते २५० रुग्णांना या काळात झाला. तसेच, बाजार समितीच्या माध्यमातून ५० ‘ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर’ मशीन विकत घेण्याचा प्रस्ताव त्यांनी दिला आहे. औषधांचा तुटवडादेखील या काळात अनेक रुग्णांना जाणवला. तेव्हा त्यांना औषधे उपलब्ध करून देण्याचे कार्यदेखील जगताप यांनी यावेळी केले. फेब्रुवारी २०२० पासून सुरू असलेले हे मदतकार्य अजूनही जगताप अविरतपणे करत आहेत, हे विशेष. भाजप मंडलच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या योजनांची माहिती गरजू नागरिकांनी व्हावी, यासाठी अभियानदेखील जगताप यांनी कार्यान्वित केले आहे. यासाठी लासलगाव मित्रमंडळ, चोथानी परिवार यांचे मोलाचे सहकार्य जगताप यांना लाभले.

 
 
पहिल्या लाटेत नेमके गरजू नागरिक शोधणे आणि दुसर्‍या लाटेत औषधे, रुग्णवाहिका यांची असणारी वानवा या आव्हानांचा सामना जगताप यांना करावा लागला. नागरिकांनी औषधे उपलब्ध व्हावीत, यासाठी केंद्रीय कुटुंब कल्याण व आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्याशी सातत्याने संवाद साधत या समस्येतून जगताप यांनी मार्ग काढला. रात्री ११.३० वाजता एका रुग्णाला ‘ऑक्सिजन बेड’ची नितांत गरज होती. मात्र, बेड उपलब्ध होत नव्हता. अशावेळी जगताप यांच्या अथक प्रयत्नातून रात्री १.३० वाजता येवला येथे बेड उपलब्ध झाला व त्या रुग्णाचे प्राण वाचले. त्याचे कुटुंब अजूनही देत असलेले धन्यवाद हा अत्यंत भावूक क्षण असल्याचे जगताप सांगतात.
 
 
लोकप्रतिनिधी म्हणून असलेल्या जबाबदारीचे भान आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कार्य यातूनच जगताप यांना प्रेरणा मिळाली. जि.प. सदस्य असलेले पती डी. के. जगताप, डॉ. भारती पवार यांच्यासह समाजातील अनेक नागरिकांचे सहकार्य याकामी जगताप यांना लाभले. आरोग्यरक्षकांच्या आरोग्याचे रक्षण व्हावे, यासाठी जगताप यांनी पहिल्या व दुसर्‍या लाटेत तालुक्यातील ग्रामीण रुग्णालय येथील सर्व डॉक्टर्स, परिचारिका, सेवक यांना ‘पीपीई किट’, मास्क, ‘फेसशिल्ड’ यांचे वाटप केले. तसेच अंगणवाडी सेविका आणि आशा सेविका यांना मास्क व फेसशिल्ड यांचे वाटप करण्यात आले. महिला ही सबल असून अबला नाही, हेच जगताप यांच्या कार्यातून दिसून येते.समस्या सर्वत्र असतात. मात्र, काम करत राहणे आवश्यक असते. कोरोना अजूनही कमी झालेला नसून लोकांनी सजगता बाळगणे आवश्यक आहे. - सुवर्णा ज्ञानेश्वर जगताप



@@AUTHORINFO_V1@@