मुंबई हल्ल्यावरील 'मुंबई डायरीज २६/११'चा टीझर प्रदर्शित

    19-Aug-2021
Total Views |

Mumbai Diaries_1 &nb
 
मुंबई : आत्ताच्या काळात आपण डॉक्टर्स व वैद्यकीय कर्मचार्यांना रात्रंदिवस नि:स्वार्थीपणे काम करून लोकांचे जीव वाचवताना पाहिले आहे. विशेषत: अशा कठीण काळात या खऱ्याखुऱ्या हिरोंशिवाय आपण आपल्या आयुष्याची कल्पनाच करू शकत नाही. निखिल अडवाणी दिग्दर्शित आणि एमी एंटरटेंमेंटच्या मोनिशा अडवानी आणि मधु भोजवानी यांनी निर्मिती केलेली 'मुंबई डायरीज २६/११' ही मालिका मुंबई मध्ये २६/११ रोजी झालेल्या आतंकवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर शहीद झालेल्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्यांच्या शूरतेची व धाडसाची कथा सांगते.
 
 
निखिल अडवानी आणि निखिल गोंसाल्वीस यांनी दिग्दर्शन केलेला हा शो या आतंकवादी हल्ल्याच्या दरम्यान निस्वार्थीपणे कार्यरत असलेल्या आणि २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईकरांचे प्राण वाचवणाऱ्या डॉक्टर्स, परिचारिका, इतर वैद्यकीय कर्मचारी व रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची आतापर्यंत प्रकाशात न आलेली कहाणी अधोरेखित करतो.
 
 
कोंकणा सेन शर्मा, मोहित रैना, टीना देसाई, श्रेया धन्वंतरी, सत्यजित दुबे, नताशा भारद्वाज, मृण्मयी देशपांडे आणि प्रकाश बेलवडी या गुणी कलाकारांच्या भूमिका असलेला हा शो ९ सप्टेंबर २०२१ रोजी अमेझॉन प्राईम व्हिडिओज वर २४० हुन अधिक देशांमध्ये व प्रदेशांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
 
 
'मुंबई डायरीज २६/११' ही काल्पनिक कथा २६/११ रोजी झालेल्या त्या आतंकवादी हल्ल्यातील मुंबईकरांमधली एकजूट दाखवणारी ती रात्र उभी करते. या मालिकेमध्ये शासकीय रुग्णालयातील अतिदक्षता विभागात कम करणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या समोर तसेच संपूर्ण मुंबई शहरात कार्यरत असलेल्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांच्या समोर उभी ठाकलेली आव्हाने आणि त्यावर कर्मचाऱ्यांनी केलेली मात याविषयी भाष्य केले आहे.