व्हेईकल स्क्रॅपिंग पॉलिसी’ अर्थव्यवस्थेसाठी ऐतिहासिक ठरणार
नवी दिल्ली : “केंद्र सरकारच्या नव्या ‘व्हेईकल स्क्रॅपिंग पॉलिसी’मुळे मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती होणार आहे. देशाच्या वाहन उत्पादन क्षेत्राचा मोठा विकास होऊन, येत्या पाच वर्षांत भारत ‘ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरिंग हब’ बनेल. त्याचप्रमाणे जल, वायू आणि ध्वनिप्रदूषणामध्ये घट होणार असून, ही योजना भारतीय अर्थव्यवस्थेसाठी ऐतिहासिक ठरणार आहे,” असे प्रतिपादन केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी मंगळवार, दि. 17 ऑगस्ट रोजी पत्रकारपरिषदेत केले.
केंद्र सरकारच्या नव्या ‘व्हेईकल स्क्रॅपिंग पॉलिसी’विषयी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, “या धोरणामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेस मोठ्या प्रमाणावर गती मिळणार आहे. यामुळे ‘व्हेईकल स्क्रॅपिंग पॉलिसी’ अर्थव्यवस्थेसाठी ऐतिहासिक ठरणार’ मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती होणार आहे. यामुळे प्रामुख्याने देशातील वाहननिर्मिती क्षेत्रास मोठा लाभ होणार आहे. सध्या वाहननिर्मिती क्षेत्राची उलाढाल सुमारे साडेसात लाख कोटी रुपयांची आहे. त्यापैकी साडेतीन लाख रुपयांची निर्यात केली जाते. मात्र, या धोरणामुळे येत्या पाच वर्षांमध्ये भारत ‘ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरिंग हब’ बनेल,” असे गडकरी म्हणाले.
“स्क्रॅपिंग धोरणामुळे तांबे, ‘अॅल्युमिनिअम’ आणि स्टिलची आयात कमी होणार असून, त्यामुळे परकीय चलनाची बचत होणार आहे. वाहनांचे सुटे भाग कमी किमतीत उत्पादित झाल्याने वाहनांच्या किमतीही कमी होतील. त्याचप्रमाणे स्क्रॅपिंगमधून ‘लिथियम आयन बॅटरी’ तयार करण्यासाठी घटकही सहजपणे प्राप्त होतील. आगामी काळात प्रत्येक जिल्ह्यात एक आणि औद्योगिकदृष्ट्या पुढारलेल्या जिल्ह्यांमध्ये किमान पाच ‘फिटनेस सेंटर’ आणि ‘स्क्रॅपिंग सेंटर’ उभारण्याची योजना आहे,” असेही गडकरी यांनी यावेळी सांगितले.