अमेरिका जात्यात आणि जग सुपात!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Aug-2021   
Total Views |

earth_1  H x W:

अमेरिकेच्या पश्चिम भागात यंदा भयंकर दुष्काळ पडला आहे. राज्यांची पाणी पूर्तता करणार्‍या धरणांनीही तळ गाठला. त्यामुळे शेती व्यवसाय कोलमडून गेला. उद्योगधंदे बंद करावे लागले. सरकारने यंदाचा दुष्काळ इतिहासातील सर्वात मोठा दुष्काळ जाहीर करावा, या दुष्काळग्रस्त भागाला विशेष मदत जाहीर करावी. वेळीच यावर उपाययोजना केली नाही, लक्ष दिले नाही, तर या समस्येमुळे खूप प्रश्न निर्माण होऊ शकतात, अशी मागणी दहा गव्हर्नरांनी अमेरिकेच्या राष्ट्रपतींकडे केली. ही बातमी कुठली असेल?
 

पाण्याची समस्या म्हणजे इतिहासातला मोठा दुष्काळ आहे, त्यामुळे राज्यातील उद्योगधंदे शेतीभाती ठप्प पडली, असे कोणत्या देशातील राष्ट्राध्यक्षांना सांगितले गेले असेल? बातमीवरून कुणीही म्हणेल कुठल्या म्हणजे काय? नक्कीच ही घटना, हे पत्र, या मागण्या, भारतातीलच असतील. पण नाही, ही घटना जगात ‘सुपर पॉवर’ समजल्या जाणार्‍या आणि अत्याधुनिक भौतिक दुनियेचा सम्राट असणार्‍या अमेरिकेतली आहे बरं का? अमेरिकेच्या पश्चिम राज्यांना सध्या मोठ्या दुष्काळाला तोंड द्यावे लागत आहे.

‘युएस ड्रॉट मॉनिटर रिपोर्ट’ने या पाणीप्रश्नाचा अभ्यास केला. त्यानुसार या भागात ६३ टक्के इतक्या मोठ्या प्रमाणात पाण्याची टंचाई आहे. सहा कोटी लोकांना या पाणीबाणीचा सामना करावा लागत आहे. या पाण्याच्या प्रश्नाला आवरण्यासाठी सध्या अमेरिकेत युद्धपातळीवर नियोजन सुरू आहे. पण छे! युद्धपातळीवर तरी त्याला कसे म्हणता येईल? कारण, पाणीप्रश्न थोडा कमी व्हावा, यासाठी अमेरिकेने काही राज्यांतील पाणी वितरण कमी केले आहे. अ‍ॅरिझोनामध्ये १८ टक्के पाणीकपात, नेवाडामध्ये सात टक्के आणि मेक्सिकोमध्ये पाच टक्के पाणीकपातीचे धोरण सध्या इथल्या प्रशासनाने अवलंबिले आहे. मात्र, ही पाणीकपात कितीही केली तरी भविष्यातला पाणीप्रश्न कसा सोडवायचा, हा मोठा प्रश्न अमेरिकेसमोर आहे. एकीकडे महाप्रलय, वादळ आणि दुसरीकडे असा पाण्याचा दुष्काळ. त्यामुळे सध्या या सगळ्यांचा विचार कसा करावा, यासाठी अमेरिकेतले तज्ज्ञ युद्धपातळीवर विचार करत आहेत. मात्र, अमेरिकेतीलच समाज अभ्यासकांचे म्हणणे आहे की, पर्यावरणतज्ज्ञांनी कितीही विचार केला तरी अमेरिकेची ताकद असलेले औद्यागिक क्षेत्र पाणी जास्त वापरते म्हणून ते बंद करता येणार नाही. तसेच अमेरिकेतील जनतेला छोट्या-छोट्या कामासाठी यंत्र वापरायची सवय आहे. या सर्वांसाठी पाण्याचा अतिरिक्त वापर केला जातो. अमेरिकाच नव्हे, तर एकंदर पाश्चात्त्य जीवनशैलीत यंत्राचा वापर मुक्तहस्ते आहे. ही जीवनशैली बदलायला दशकं लागणार आहेत. तोपर्यंत पाण्याचा प्रश्न आणखी भीषण होणार आहे.
 
असो. अमेरिकेच्या पश्चिम भागातील पाणी दुष्काळाचे केंद्रबिंदू आहे अमेरिकेतील लेक मीड धरण. नेवाडा आणि अ‍ॅरिझोना राज्यातील लासवेगास तसेच नेवाडा शहराच्या दक्षिणपूर्व भागात १९३० साली कोलोरॅडो नदीवर हे धरण आहे. या धरणामुळे अ‍ॅरिझोना कॅलिफोर्निया आणि नेवाडा राज्याची जलपूर्तता होते. मात्र, १९८३ साली या राज्यांमध्ये औद्योगिकीकरणामध्ये वृद्धी झाली. विविध औद्योगिक कारखान्यांना आणि व्यवसायांना मोठ्या प्रमाणात पाण्याची गरज भासू लागली. त्यावेळी पहिल्यांदा लेक मीड जलाशयातील पाणी गरजेपेक्षा कमी आहे, असे या राज्यातील गव्हर्नरांना आणि प्रत्यक्ष जनतेला वाटू लागले. मात्र, त्यानंतर सातत्याने लेक मीड जलाशय हे पाणी पूर्तता करण्यास असमर्थ ठरू लागले. गेल्या ४० वर्षांत या धरणातील पाण्याची पातळी किमान स्तरावर आली आहे. अमेरिकेच्या सरकारी सर्वेक्षणानुसार या जलाशयाची पातळी दहा फूट कमी झाली आहे. एका बाजूने पाण्याची मागणी आणि उपभोग्यता वाढत आहे. दुसरीकडे नैसर्गिकरीत्या पाण्याचा जलसाठा पूर्णपणे भरला जात नाही. त्यामुळे अमेरिकेतील पश्चिम भूभागावर दुष्काळाचे सावट आहे.

या पाणीटंचाईबाबत अमेरिकेच्या प्रशासकीय अधिकार्‍यांची बैठक झाली. यामध्ये निष्कर्ष होता की, पर्यावरणातील बदलामुळे मीड लेक जलाशयाची पाण्याची पातळी कमी झाली. या बदलाचा सामना देशाला करावाच लागेल. त्या पद्धतीने भविष्यातील नियोजन करावे लागेल. मात्र, अमेरिकेची पाणी पूर्तता होणारच होणार, अशा खात्रीने बनवलेले मीड लेक. पण, त्यानंतरही अमेरिकेत अनेक छोटी-मोठी धरणे बांधली गेलीच. पण, तरीही साधनसामग्रीबाबत बलाढ्य असलेल्या अमेरिकेमध्ये ऐतिहासिक दुष्काळ सुरू झाला. याबाबत ‘अमेरिका जात्यात आहे आणि जग सुपात’ इतकेच म्हणूया..






 
 
 
 

 
 
 
@@AUTHORINFO_V1@@