नवदुर्गेचे रूप : वीणा ठाकूर-सामंत

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Aug-2021   
Total Views |
yogita samant _1 &nb


आयुष्यातल्या प्रत्येक समस्येवर मात करत स्वत:चे ध्येय तडिस नेणार्‍यांपैकी एक वीणा सामंत.अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यांच्या यशस्वी कर्तृत्वाचा घेतलेला हा मागोवा...
 
 
 
संकट आली तर येऊ द्या,
त्या संकटांना चिरून पुढे जाईन
समस्या आल्या येऊ द्या,
त्या समस्यांना सोडवून पुढे जाईन!!
 
  
असा आयुष्याचा मंत्रच जपणार्‍या वीणा सामंत. त्या मुंबईतील झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पात काम करणार्‍या एका कंपनीमध्ये विकासक आहेत. ‘संस्कार भारती’च्या मुंबई विभाग प्रमुख आहेत. त्याचबरोबर ‘राजहंस प्रतिष्ठान’, ‘मराठी विचारधारा प्रतिष्ठान’ आणि गोरेगावच्या मसुराश्रमच्या सक्रिय जबाबदार कार्यकर्त्या आहेत. एकाच वेळी संस्कार, साहित्य, धर्म, समाज अशा विविध पातळ्यांवर देशसेवा आणि समाजसेवा करण्यात त्या अग्रेसर आहेत. एक व्यक्ती दिवसाचे २४ तास किती, कुठे कसे सकारात्मक पद्धतीने व्यतित करते, याचे उत्तम सकारात्मक उदाहरण म्हणजे वीणा सामंत.
 
 
काही दिवसांपूर्वी कोकणात पूर आला. त्यावेळी वीणा यांनी पुढाकार घेतला. चिपळूणमध्ये नक्की काय गरज आहे, याचे एक सर्वेक्षण केले आणि त्यानुसार लाखो रूपयांचे अन्नधान्य आणि जीवनावश्यक वस्तू चिपळूणमधील गरजूंना वितरित केले. हे सगळे करताना उत्कृष्ट नियोजन, समन्वय आणि मुख्यत: चिपळूणच्या पुरात सर्वकाही गमावलेल्या बांधवांसाठी प्रेम होते. ‘राजहंस प्रतिष्ठान’च्या माध्यमातून वीणा यांनी हे काम केले. पुढे वीणा यांना जाणवले की, पुराने छोट्या-छोट्या उद्योगधंद्यांचे मुख्यत: घरगुती कुटिरोद्योगांचे कंबरडे मोडले आहे. या सगळ्या छोट्या घरगुती उद्योगांना उभे करण्यासाठी त्यांची उपकरणे, अवजारे त्यांना मिळवून देणे गरजेचे होते. वीणा यांनी या कामासाठी पुन्हा पुढाकार घेतला आणि सध्या ऑगस्टच्या दुसर्‍या आठवड्यात तीन लाख किमतीची ही छोटी छोटी उपकरणे अवजारे सामान घेऊन चिपळूणला दुसरा ट्रक गेला आहे. ‘आहे रे’ गटापर्यंत ‘नाही रे’ गटाच्या समस्या मांडून त्याद्वारे ‘आहे रे’ समाजघटकांनी ‘नाही रे’ गटाचे दु:ख दूर करावा, असा प्रयत्न वीणा यांनी यशस्वीरीत्या केला.
 
 
आपल्याला वाटेल की, सधन संपन्न संस्कार संस्कृतीचा वारसा असलेल्या महिलेने हे सगळे केले. त्यात असेल थोडाफार संघर्ष,पण त्यात काय इतके? तसे नाही. वीणा स्वत:हून कधीही सांगत नाहीत. पण, वीणा यांना ’मायस्थेनिया गॅ्रॅव्हिस’ हा आजार आहे. नावाप्रमाणेच दुर्धर आजार. यात रूग्णाच्या नसा हळूहळू कमजोर होतात. यावर अधिक मात्रेचे ‘स्टिरॉईड’ हेच औषध. त्यात वीणा यांना मधुमेह आणि ब्लडप्रेशर. ‘स्टिरॉईड’ घेतल्यामुळे मधुमेह नेहमीच चढत्या भाजणीत. ‘मायस्थेनिया ग्रॅव्हिस’च्या उपचारात शरीरातील सातत्याने अनावश्यकरीत्या वाढणार्‍या प्रतिकारशक्तीला कमी करणारे ‘स्टिरॉईड’ दिले जाते. कोरोना काळात शरीरातील प्रतिकारशक्ती कमी झाली आणि त्यांना कोरोना झाला. अनेक आजारांशी वीणा यांचे शरीर सामना करत राहिले. त्या कोरोनातून बर्‍या झाल्या. या सगळ्या काळात वीणा यांनी त्यांची आत्मशक्ती बिल्कूल ढळू दिली नाही. स्वातंत्र्यवीर सावरकर अंदमानाच्या काळ्या पाण्याच्या सजेतही त्यांची सर्जनशीलता टिकवून होती, त्यांचा ध्येयवाद आशावाद गगनाला गवसणी घालत होता. यातना आणि मृत्यूची चाहूल त्यांच्या विचारांना कर्तृत्वाला थांबवू शकली नाही. त्यापुढे आपले आजार काय आहेत, असा विचार वीणा करत असत. आपणही कोणत्याही आजाराने किंवा कसल्याही अडथळ्याने आपल्या विचारांपासून दूर जायचे नाही, हे वीणा यांनी ठरवले. त्यामुळेच कोरोनातून बरे झाल्यावर दुर्धर आजाराने ग्रस्त असतानाही वीणा यांनी स्वत:ला कर्तृत्वाच्या आयामात स्वत:ला सिद्ध केले. ते सिद्ध करणे कुणाला दाखवण्यासाठी नव्हते, तर ते स्वत:ला स्वत:शी केलेेले वचन होते. ते वचन की, कोणत्याही परिस्थितीमध्ये हिंमत हरणार नाही. सामाजिक कार्यासाठी कटिबद्ध राहीन.
 
वीणासारख्या व्यक्ती प्रेरणादायी आहेतच. त्यांच्या जीवनाचा मागोवा घेतल्यावर जाणवले की, त्यांचे वडील शामराव ठाकूर हेसुद्धा ध्येयवादी. ते ध्येयवेडे चित्रकार मात्र त्याचबरोबर खासगी कंपनीत नोकरीही करायचे. मूळ कोकणातले ठाकूर कुटुंब विक्रोळीत स्थायिक झालेले. शामराव नोकरी करता करता गरीब कामगारांचे नेतेही झाले. ठाकुरांच्या घरात कामगारांना २४ तास प्रवेश होता. शामरावांचा पगार हा कामगारांसाठीच खर्च व्हायचा, असे म्हटले तरी चालेल. त्यांची पत्नी विमल ठाकूर या शिक्षिका. अत्यंत कडक शिस्त आणि सत्याच्या भोक्त्या. या दोघांना दोन कन्या. त्यापैकी एक वीणा. वीणा लहानपणापासून आईवडिलांच्या संस्कारात वाढलेल्या. खेळ-कलागुणात प्रवीण. कॉमर्स पदवीधर झाल्यानंतर त्यांनी अनेक छोट्या-मोठ्या नोकर्‍या केल्या. संगणकाचा डिप्लोमा केला. शेवटी सारस्वत बँकेत त्यांना नोकरी लागली. कर्मधर्म संयोगाने बँकेचे अध्यक्ष एकनाथ ठाकूर, वीणा यांचे चुलत काका. पुढे वीणा यांचा विवाह उच्चशिक्षित आणि समाजशील प्रसाद सामंत यांच्याशी झाला. आयुष्यात अनेक चढ-उतार सुरूच होते. विवाहाच्या नऊ वर्षांनंतर त्यांना अपत्य झाले. या काळात वीणा यांनी विविध सामाजिक संस्थामध्ये काम करायला सुरुवात केली होती. वाचनाची आणि विविध कलांची आवड होतीच. याच काळात वीणा यांच्या सासूबाई देवाघरी गेल्या. त्यात वीणा यांना नोकरीमुळे घराकडे त्यातही मुलीकडे लक्ष द्यायला वेळ कमी पडू लागला. त्यांनी स्वेच्छेने नोकरी सोडली. आपल्या ज्ञानाचा आणि माहितीचा उपयोग होईल, असे क्षेत्र निवडत विकासक म्हणून कार्यक्षेत्र निवडले. येणार्‍या प्रत्येक प्रसंगाला आपल्या वेळेनुसार जिंकावे, हे कसब वीणा यांच्याकडे आहे. स्वत:सोबतच कुटुंब आणि समाजासाठी जगणार्‍या ध्येयशील वीणा सामंत म्हणजे नवदुर्गेचे रूपच.
 
9594969638
@@AUTHORINFO_V1@@