‘क्वाड’चे संभाव्य विरोधक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Aug-2021   
Total Views |
quad_1  H x W:



कोरोना संसर्गाच्या प्रकोपानंतर अमेरिका, भारत, जपान आणि ऑस्ट्रेलिया यांच्या ‘क्वाड’ या व्यासपीठास पुन्हा एकदा महत्त्व प्राप्त झाले आहे. चीनप्रणित कोरोना विषाणूच्या संसर्गानंतर चीनच्या विस्तारवादाचा धोका जगातील सर्वच देशांना जाणवू लागला आहे. त्यातही हिंद-प्रशांत महासागर क्षेत्रामध्ये आपले प्रभुत्व निर्माण करण्याची चीनची घाई आता या क्षेत्रातील लहान आणि मोठ्या देशांसाठी धोक्याची घंटा आहे. त्यामुळे या प्रदेशात चीनला वेळीच रोखण्यासाठी ‘क्वाड’ला पुन्हा बळ देण्यात आले आहे. ‘क्वाड’ हा लष्करी गट नाही, असे यातील सर्वच देशांनी वेळोवेळी स्पष्ट केले आहे.
 
 
 
मात्र, गरज पडल्यास ‘क्वाड’ला तेही करावे लागेल अशी चिन्हे आहेत. कारण, एकीकडे अफगाणिस्तान पूर्णपणे तालिबानच्या ताब्यात गेले आहे. तेथे आता चीन महत्त्वाची भूमिका निभावण्यास उत्सुक आहे. भारताने अद्याप आपली भूमिका जाहीर केलेली नाही. अशा परिस्थितीमध्ये ‘क्वाड’ देशांना आपली एक भूमिका ठरविणे गरजेचे होणार आहे. त्याचवेळी आपल्या संभाव्य विरोधकांच्या युतीकडेही लक्ष द्यावे लागणार आहे. इंडो-पॅसिफिक प्रदेश आणि आजूबाजूच्या प्रदेशात ‘क्वाड’चे महत्त्व वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर पाच महत्त्वाच्या व्यवस्थांची चर्चा केली जात आहे. गेल्या वर्षी पाकिस्तानला इराणी राजदूतांकडून प्रादेशिक सुरक्षा व्यवस्थेसाठी चीन, रशिया, पाकिस्तान, इराण आणि तुर्की यांच्यातील संभाव्य युतीबाबत प्रस्ताव ठेवण्यात आला. ‘क्वाड’च्या वाढत्या प्रभावाला आळा घालण्याच्या दृष्टीने अशा प्रकारे देशांचे संगठन केले जात आहे, असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही.
 
 
‘क्वाड’मध्ये समाविष्ट असलेल्या कमीत कमी एका देशाप्रति असलेली तक्रार आणि विरोधी सामरिक हितसंबंधामुळे वर उल्लेखलेले पाच देश एकत्र आले आहेत. अलिप्त आणि एकटे पडण्याच्या भीतीमुळे ‘क्वाड’ला चीन आणि रशियाचा विरोध आहे. या दोन्ही देशांनी ‘क्वाड’विरुद्ध समतोल साधण्यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत. यावर्षीच्या ’क्वाड’च्या पहिल्या शिखर परिषदेबाबत प्रतिक्रिया देताना चीनने ‘वेगवेगळ्या विचारधारा असलेल्या देशांचा गट म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यवस्थेचा नाश करणे आहे’ या शब्दांत फटकारले आहे. अशाप्रकारची प्रतिक्रिया रशियानेही दिली आहे. इंडो-पॅसिफिक धोरण आणि ‘क्वाड’ या नावाखाली पाश्चिमात्य देश चीन विरुद्ध कुरघोडी करत आहेत, असे रशियाने म्हटले आहे. २०१४ मध्ये युक्रेनमधील परिस्थितीमुळे पाश्चिमात्य नेत्यांनी रशियावर निर्बंध घातले आहेत त्याच पार्श्वभूमीवर रशिया चीनची बाजू घेत आहे.
 
 
भारताचा प्रभाव रोखण्यासाठी आणि भारताविरुद्ध जाण्यासाठी पाकिस्तान कोणत्याही थराला जाऊ शकतो, हे स्पष्ट आहे. भारताच्या हिताविरुद्ध असलेल्या कोणत्याही बाबतीत उडी घेण्यात इस्लामाबादला विशेष रस आहे. भारताविरुद्ध समतोल साधण्यासाठी पाकिस्तानच्या प्रयत्नांमध्ये चीन हा मूलभूत आधारस्तंभ आहे. इस्लामिक जगताचे नेतृत्व करण्याच्या तुर्कीच्या महत्त्वाकांक्षेला पाकिस्तान सातत्याने पाठिंबा देत आहे. याच आधारावर टर्कीने काश्मीर प्रश्नावरून पाकिस्तानला उघड समर्थन दिले आहे. भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंध सुधारत असतानाच पाकिस्तान रशिया आणि इराण यांच्याशी सामरिक संबंध सुधारून मोर्चेबांधणी करत आहे.
 
 
अर्थात, मजबूत प्रादेशिक सुरक्षा व्यवस्था तयार करण्यासाठी हे घटक पुरेसे नाहीत म्हणूनच ‘क्वाड’विरुद्ध या व्यवस्थेचा टिकाव लागणे एकंदरीत कठीण आहे. या पाच राष्ट्रांत एकमेकांमध्ये काही उद्दिष्टे समान आहेत. परंतु, पाचही राष्ट्रांचा विचार करता या राष्ट्रांमध्ये एकही समान मूल्य किंवा तत्त्व नाही. तसेच या राष्ट्रांमधील प्रशासन हे हुकूमशाही आणि ईश्वरशासित स्वरूपाचे असल्यामुळे दीर्घकालीन लवचिकतेसाठी या व्यवस्थेत जागा नाही. याशिवाय यातील प्रत्येक देशांमध्ये एकमेकांविरुद्ध अविश्वासाची भावना आहे. या पाच राष्ट्रांमधील अविश्वास, संकुचित व आत्मकेंद्री धोरणात्मक उद्दिष्टांमुळे ‘क्वाड’ला विरोध करणारी एक सक्षम पर्यायी व्यवस्था निर्माण होणे कठीण आहे. याविरुद्ध ’क्वाड’ हे संपूर्ण स्थिरता, पारदर्शक विकास आणि विविध क्षेत्रातील सुव्यवस्था यांवर आधारित आहे. यात पाच राष्ट्रांच्या महत्त्वाकांक्षा एकमेकांमध्ये गुंतल्यास उर्वरित जगावर त्याचे विपरित परिणाम होऊ शकतील. अर्थात, यामुळे जागतिक शांतता आणि समतोल यांना अडथळा निर्माण होईल.
 
 
@@AUTHORINFO_V1@@