४५ ज्येष्ठ नागरिकांना ‘आनंदी संध्याकाळ’ सन्मानपत्र देऊन गौरव
कल्याण : “ज्येष्ठ नागरिक कल्याण शहर समन्वय समितीचे काम पाहून मला कार्य करण्याची ऊर्जा मिळते,” असे प्रतिपादन कल्याणचे भाजप माजी आमदार नरेंद्र पवार यांनी सोमवार, दि. १६ ऑगस्ट रोजी केले. ज्येष्ठ नागरिक कल्याण शहर समन्वय समितीने कल्याण शहरातील राणी लक्ष्मीबाई ज्येष्ठ सेवा मंडळाच्या सभागृहामध्ये ‘आनंदी संध्याकाळ’ सन्मानपत्र वितरण करण्यात आले. या सोहळ्यामध्ये पवार बोलत होते.
कल्याणमध्ये 28 ज्येष्ठ नागरिक मंडळ असून ज्येष्ठ नागरिकांच्या विविध कलागुणांना व्यासपीठ मिळावे, यासाठी मागील महिन्यात ‘ऑनलाईन’ कला गुण दर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये कल्याणमधील अनेक ज्येष्ठांनी सहभाग नोंदवून कला सादर करताना काव्यवाचन, कथाकथन, गाणी तसेच स्वरचित कवितांचे ज्येष्ठ नागरिकांनी सादरीकरण केले.
यामध्ये कला सादर करणार्या ज्येष्ठ नागरिकांना ‘आनंदी संध्याकाळ’ सन्मानपत्र देऊन माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या हस्ते गौरविण्यात आले. या कार्यक्रमाला समन्वय समितीचे अध्यक्ष अरविंद देशमुख, सचिव प्रभाकर बाविस्कर, महिला प्रमुख वर्षा बाविस्कर, राणी लक्ष्मीबाई ज्येष्ठ नागरिक मंडळाचे अध्यक्ष कृष्णा केळशीकर, सचिव पुरुषोत्तम जोशी, अन्य पदाधिकारी व मोठ्या संख्येने ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते. या सन्मान सोहळ्याचे सूत्रसंचालन प्रभाकर बाविस्कर यांनी, तर आभार प्रदर्शन पुरुषोत्तम जोशी यांनी केले.