काॅंग्रेसमध्ये म्हातारे राहिले, तरणे पळाले!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Aug-2021   
Total Views |
congress_1  H x



काॅंग्रेस पक्षाला गेल्या काही वर्षांत लागलेली नेते-कार्यकर्त्यांची गळती थांबायची चिन्हं नाहीत. बंगालमधील काँग्रेसच्या माजी खासदार आणि महिला काँग्रेसच्या प्रमुख सुष्मिता देव यांनी नुकताच आपल्या पक्षसदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन तृणमूल काँग्रेसची कास धरली. खरंतर देव या काँग्रेसच्या निष्ठावंतांपैकी एक मानल्या जायच्या. पण, ४८ वर्षीय देव यांनी दिलेल्या राजीनाम्यामुळे काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा सगळे आलबेल नसल्यावरच शिक्कामोर्तब झाले आहे. त्याचे झाले असे की, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभेतील खासदार कपिल सिब्बल यांनी यासंदर्भात ट्विट करत काँग्रेसला घरचा आहेर दिला. सिब्बल आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, “सुष्मिता देव यांनी आपल्या पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. एकीकडे तरुण नेते पक्षाला सोडचिठ्ठी देत असले तरी पक्षातील ज्येष्ठ नेत्यांवर ‘आम्हाला काँग्रेसला बळकटी देता येत नाही,’ म्हणून दोषारोपण केले जाते. पण, तरीही पक्ष मात्र असाच पुढे चालत राहतो, डोळे बंद करून!” सिब्बल यांचे हे ट्विट त्यांचा पक्षावरील रोष प्रकट करण्यासाठी पुरेसे आहे. सिब्बल यांचा अंगुलीनिर्देश ‘हायकमांड’कडेच आहे. पक्षाच्या वाईट कामगिरीसाठी जुन्याजाणत्या नेत्यांना दोषी ठरवणे आणि तरुण नेते सोडून गेले की, त्याला किंमतही न देणे, याच काँग्रेसच्या दुटप्पीपणावर सिब्बल यांनी प्रहार केलेला दिसतो. म्हणजे, एकीकडे काँग्रेसच्या ‘जी-23’ गटाने दिलेले सल्ले ऐकायचे नाहीत, त्यांना पक्षात महत्त्वाचे स्थान न देता तरुणांना संधी द्यायची, पण पक्षाचा पराभव झाला की, त्याचा दोष मात्र ज्येष्ठ नेत्यांवर टाकून ‘हायकमांड’ मात्र हातावेगळे होते. पण, यासंदर्भात सिब्बल यांनी ट्विट केले काय अथवा पत्र लिहिले किंवा गांधी घराण्याशी चर्चा केली तर त्यांची कार्यपद्धती, विचार हे अजिबात बदलणारे नाहीत. कारण, मुळातच ‘आम्ही म्हणू ती पूर्व दिशा’ हीच कॉँग्रेसची पूर्वापार चालत आलेली परंपरा! तेव्हा, सिब्बल यांची पक्षांतर्गत घुसमट त्यांच्या एकट्यापुरती मर्यादित नाही, तर इतर ज्येष्ठ काँग्रेसींच्या भावनेलाच सिब्बल यांनी यानिमित्ताने वाट मोकळी करुन दिल्याचे दिसते. तसेच सुष्मिता देव यांनी भाजपमध्ये नव्हे, तर तृणमूलमध्ये प्रवेश केल्याने काँग्रेसचा झालेला जळफळाटही जणू जखमेवर मीठ चोळणाराच!
 
 
त्यांनी केले संधीचे सोने...
 
 
काॅंग्रेस पक्षाला राम राम करणार्‍या नेत्यांचे भाजपच नाही, तर इतरही पक्षांत गेलेल्यांचे भलेच झाले, असे किमान म्हणायला वाव आहे. या तरुण नेत्यांना ज्या पक्षांत संधी मिळाली, तिथे लगेच हे नेते पक्षांतर करून मोकळे झाले. यावरून एकच गोष्ट अधोरेखित होते की, तरुण राजकीय नेत्यांची फळी निर्माण करण्याबरोबरच त्यांना राजकारणात मात्र पुरेशी संधी काँग्रेसने न दिल्यानेच शेवटी या नेत्यांनी बाहेरचाच मार्ग निवडला. सुष्मिता देव हे त्याचे ताजे उदाहरण असले, तरी, गेल्या काही काळात काँग्रेसचा निरोप घेतलेल्या नेत्यांच्या यादीवर एक नजर टाकली असता, तरुणांना या पक्षात फारसे स्थान नसल्याचेच लक्षात येते. जितीन प्रसाद, ज्योतिरादित्य सिंधिया, पी. सी. चाको, सुमित्रादेवी कासदेकर, प्रद्युमनसिंह लोढी ही त्यापैकी काही प्रातिनिधिक अन् महत्त्वाची नावे सांगता येतील. पण, अशा डझनभर नेत्यांच्या गच्छंतीनंतरही काँग्रेस नेतृत्वाचे डोळे खाडकन उघडलेले नाही. ज्योतिरादित्य सिंधियांसारख्या मध्य प्रदेशातील एका महत्त्वाच्या आणि लोकप्रिय नेत्याने काँग्रेसमधून फारकत घेणे हा खरं म्हणजे पक्षासाठी किती मोठा आघात; परंतु त्यानंतरही काँग्रेसमध्ये जणू काही घडलेच नाही, या अविर्भावातच सोनियांपासून ते राहुल गांधींपर्यंत सगळेच वावरत राहिले. नाही म्हणायला ’जी-23’ काँग्रेस नेत्यांच्या गटाने पत्र लिहून, चर्चा करुन पक्षनेतृत्वाला जागे करण्याचा आटोकाट प्रयत्न केला, पण परिणाम मात्र शून्यच! आता कुणी म्हणेल की, राजकारण म्हटले की पक्षांतरं ही ओघाने आलीच की. भारतात तर आयाराम-गयारामांची राजकीय परंपरा. मग काँग्रेसमधून काही नेते सोडून गेले, तर त्याचे शल्य ते काय? हे जरी वरकरणी सत्य असले तरी राजकारणात एका नेत्यामागेही हजारो कार्यकर्त्यांचा, समर्थकांचा आणि मतदारांचाही मोठा पाठिंबा असतो. त्यामुळे एक मोठा नेता जरी पक्षाला सोडून गेला तरी त्याचे तळागाळातील परिणाम स्थानिक समीकरणे पूर्णत: बदलू शकतात, हे यापूर्वीही विखे-पाटलांपासून ते सिंधियांपर्यंत कित्येक उदाहरणांतून प्रकर्षाने सिद्ध झाले आहे. तेव्हा, काँग्रेस पक्षाने या पक्षांतराच्या परंपरेची वेळीच गांभीर्याने दखल घेतली नाही, तर हा पक्ष आपला उरलासुरला जनाधार गमावून बसेल, हे सांगण्यासाठी कोणा भविष्यवेत्त्याची गरज नक्कीच नाही!
 
 
@@AUTHORINFO_V1@@