केंद्रीय गृहमंत्रालयाकडून ठाण्याच्या महिला पोलीस अधिकार्‍याचा गौरव

    14-Aug-2021
Total Views |

police_1  H x W


ठाणे :
केंद्रीय गृहमंत्रालयाकडून ठाण्याच्या डॅशिंग महिला पोलीस अधिकार्‍याचा गौरव होणार आहे. नवी मुंबईतील कामोठे भागातील चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करणार्‍या नराधमाला २४ तासांत जेरबंद करून त्याला जन्मभर खडी फोडायला पाठवणार्‍या कामोठे पोलीस ठाण्याच्या तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक ममता डिसूझा यांना केंद्रीय गृह मंत्रालयाच्या वतीने दिले जाणारे सर्वोत्कृष्ट तपासाचे विशेष पदक जाहीर झाले आहे. यंदा महाराष्ट्रातील ११ अधिकार्‍यांना गौरवण्यात येणार असून त्यात ठाण्यातील कोपरी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक ममता डिसूझा यांचा समावेश आहे.
 
कोपरी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक ममता डिसूझा या २०१६ मध्ये कामोठे पोलीस ठाण्यात कार्यरत असताना एका पावणेतीन वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचाराचा प्रकार घडला होता. त्यावेळी त्यांची साप्ताहिक सुट्टी असतानाही घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने घटनास्थळी धाव घेऊन सुरुवातीला या मुलीला त्यांनी तत्काळ नवी मुंबईतील ‘एमजीएम’ रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर कामोठे पोलीस ठाण्यात लैंगिक अत्याचारासह ‘बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम २०१२ ’ हा गुन्हा ११ जानेवारी, २०१६ रोजी दाखल केला. याच गुन्ह्याचा तपास करताना परिस्थितिजन्य पुरावा (संशयित आरोपीच्या रक्ताचे नमुने, रक्ताळलेले कपडे) तत्काळ गोळा केले.

तपासामध्ये पीडितेच्या मावशीचा पतीच आरोपी असल्याचे उघड झाल्याने त्याला त्यांनी परराज्यात पळून जाण्याच्या तयारीत असतानाच अटक केली. याच प्रकरणात शास्त्रोक्त, तसेच न्यायसाहाय्यक वैज्ञानिक साधनांचा वापर करून अवघ्या एक महिना चार दिवसांमध्ये दोषारोपपत्रही न्यायालयात दाखल केले. त्यानंतर अलिबाग (जि. रायगड) येथील सत्र न्यायालयाने सर्व पुरावे ग्राह्य धरून आरोपीला जन्मठेपेची, तसेच २५ हजारांच्या दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास एक वर्षाच्या अतिरिक्त कैदेची शिक्षाही न्यायालयाने सुनावली.