प्रकल्पग्रस्तांच्या मागणीचा सरकार सकारात्मक विचार करेल:ज्योतिरादित्य शिंदे

    14-Aug-2021
Total Views |

shinde_1  H x W

केंद्रीय नागरी उड्डाणमंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांचे कृती समितीस आश्वासन

नवी दिल्ली : केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्यासोबत केंद्रीय नागरी उड्डाणमंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांची दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय नामकरण सर्वपक्षीय कृती समितीच्या शिष्टमंडळाने शुक्रवार, दि. १३ ऑगस्ट रोजी भेट घेतली. या भेटीदरम्यान, विमानतळाचे काम अद्याप पूर्ण होण्यास अवकाश असल्याने ‘सिडको’ नामकरणाची घाई का करत आहे, असा सवाल ज्योतिरादित्य शिंदे यांनी बैठकीमध्ये उपस्थित केला.
दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय नामकरण सर्वपक्षीय कृती समितीच्या शिष्टमंडळाने दिल्लीत नवनियुक्त केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांची भेट घेतली. समितीने त्यांचे अभिनंदन करून पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार व्यक्त केले. सदर भेटीमध्ये विमानतळाच्या नामकरणाबाबत चर्चा करण्यात आली.
यावेळी शिंदे यांनी शिष्टमंडळाकडून देण्यात आलेले निवेदन स्वीकारून अध्यक्ष दशरथ पाटील व समितीचे म्हणणे ऐकून घेतले. याबाबत बोलताना जोतिरादित्य शिंदे यांनी केंद्र सरकार नेहमी भूमिपुत्रांच्या सोबत असल्याचे सांगून अद्याप विमानतळाचे काम पूर्ण झाले नसल्याचे सांगितले. तसेच ‘सिडको’ नामकरणाची घाई का करीत आहे, असा सवालदेखील उपस्थित करुन भूमिपुत्रांच्या मागणीचा सकारात्मक विचार केला जाईल, असे आश्वासनसुद्धा त्यांनी शिष्टमंडळाला दिले.
याप्रसंगी केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील, कृती समितीचे अध्यक्ष दशरथदादा पाटील, माजी खासदार रामशेठ ठाकूर, कार्याध्यक्ष आ. प्रशांत ठाकूर, आ. महेश बालदी, उपमहापौर जगदिश गायकवाड, जे. डी. तांडेल, संतोष केणे, गुलाब वझे, राजेश गायकर, दीपक पाटील, संतोष घरत, विनोद म्हात्रे, नंदेश ठाकूर, गोपीनाथ म्हात्रे आदी उपस्थित होते.
शिंदेंचा मराठीमध्ये संवाद
केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी शिष्टमंडळाशी चर्चा करतना संपूर्ण वेळ मराठी भाषेमध्ये संवाद साधला. अत्यंत आपुलकीच्या नात्याने संवाद साधत शिष्टमंडळाला सकारात्मक प्रतिसाद देऊन आश्वस्त केले.