माध्यमांतील समाजभान आणि जबाबदारीची जाणीव

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Aug-2021   
Total Views |
Media 2_1  H x
 
आज माध्यमांचे स्वरूप विकसित आहे. या विकसित स्वरूपात लोकशाहीचा चौथा स्तंभ गणल्या गेलेल्या माध्यमांनी समाजभान आणि त्यांची जबाबदारी जपली आहे का, हा प्रश्न खूपच संवेदनशील. पण, या प्रश्नाचा मागोवा घेताना दिसते की, समाजभान आणि जबाबदारी यांची व्याप्ती माध्यमांनी स्वीकारली आहे. पण, बांधलेल्या चौकटीतून मुक्त होत समाजभान आणि जबाबदारी माध्यमं स्वीकारत आहेत का, याचा मागोवा या लेखातून घेण्याचा केलेला हा प्रयत्न...

दृक-श्राव्य माध्यम आणि इंटरनेटच्या जमान्यातील समाजमाध्यमांनी आज समाजमनावर अक्षरशः मोहिनी घातली आहे. व्यक्त होण्यासाठीचे एक हक्काचे माध्यम म्हणून समाज आज या सर्व माध्यमांकडे पाहतो. दैनिकं, पाक्षिकं, मासिक, अगदी दिवाळी अंक ते इंटरनेटचे ब्लॉग जरी वाचले, तरी आपल्याला दिसेल की, समाजाचे प्रश्न त्यात मांडण्याचा आवर्जून प्रयत्न केलेला दिसतो. ‘माणसं आणि त्यांच्या संदर्भातले सारे काही’ हाच या सर्व माध्यमांचा आत्मा आहे. त्यामुळे माणूस त्याच्या समस्या, यश-अपयश, त्याच्या सांघिक, गटीय, तटीय घटनांबाबतही यात सारे सारे काही असते. पण, याचा आणि समाजभान आणि सामाजिक जबाबदारीचा काही संबंध असतो का? निरपेक्षपणे विचार केला तर तसा तो जाणवत नाही. सर्वच वर्तमानपत्रांत आणि तत्सम अंकांमध्ये माणसासंबंधी, त्याच्या जगण्यासंबंधी काही ना काही अगदी स्वाभाविकपणे असते. पण, कोणत्या माणसासंदर्भात, कोणत्या घटनेसंदर्भात नेमके काय मांडावे, काय छापावे, हे मात्र एका चौकटीत, चाकोरीत बंदिस्त झालेले दिसते.

 ‘हत्ती कसा दिसतो’ ही कथा ज्याप्रमाणे प्रत्येक जण स्वतःच्या अनुभवाप्रमाणे सांगतो, तसे माध्यमे स्वत:च्या आवडीनिवडी आणि स्वीकारलेल्या वैचारिक चौकटीप्रमाणे प्रत्येक गोष्टी मांडताना दिसतात. या सर्वांमुळे त्या घटनेतील, त्या परिक्षेपातले सत्य मात्र मागे पडते. त्यामुळे ठरावीक चौकटींचा दबाव मोडत माध्यमांनी आपले काम करायला हवे, हा नैतिक मुद्दा आज हद्दपार झालेला दिसतो. पारतंत्र्याच्या काळात भयंकर दडपशाही असताना लोकमान्य टिळक संपादक म्हणून इंग्रजांना विचारतात की, ‘सरकारचे डोके ठिकाणावर आहे का?’ पण, आज आपल्या महाराष्ट्रात कोरोनामुळे भयंकर परिस्थिती निर्माण झाली आहे. मंदिरं बंद, तर मदिरालयं चालू आहेत. जनतेच्या भावनांशी आणि जीवाशी खेळणारे निर्णय राज्य सरकार दररोज घेते आणि दररोज चे नियम-निर्णय बदलून भयंकर घोळ घालताना दिसते. कोरोनाकाळात जनता किड्या-मुंग्यांसारखी मेली. पण, राज्यातल्या स्वंयघोषित आघाडीच्या दैनिकांमध्ये ‘सरकारचे डोके ठिकाणावर आहे का?’ असा प्रश्न विचारण्याचे धाडस मात्र होताना दिसले नाही.
 
एखादी बातमी चुकीची असेल आणि त्याबद्दल क्षमा मागणे, तेही आधीची बातमी ज्या पानावर छापली, त्याच पानावर हा लिखित माध्यमक्षेत्रातला एक {नयम. मुळात खोटी किंवा निखालस स्वार्थासाठी बातमी छापणे, हे वर्तमानपत्रीय नैतिकतेतले मरणच! पण, हे असले नैतिकतेचे मरण स्वीकारून पुन्हा खोट्या बातम्या आणि त्यानुसार आपल्याला आवडणारे सिद्धान्त जनतेसमोर मांडणारे तथाकथित विचारवंत, संपादकही महाराष्ट्राने पाहिले. अशा लोकांमुळे माध्यमांचे समाजभान आणि जबाबदारी यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आपापल्या विचारधारा, राजकीय प्यादं उचलण्यासाठी ही माध्यमं काम करतात की काय, असेही समाजाला वाटू लागले आहे.

‘आदर्श घोटाळा’ किंवा नुकताच मंत्रालयात दारूच्या बाटल्यांचा आढळलेला खच, यांसारख्या बातम्या लोकांसमोर आणण्यात माध्यमं यशस्वी झाली. मधल्या काळात सुशांतसिंग राजपूत, दिशा सालियन, पूजा चव्हाण, साधू हत्याकांड, मनसुख हिरन, १०० कोटींचा हप्ता, देशमुखांचा पोबारा या सगळ्या गोष्टी समाजापुढे आणण्यात माध्यमांचे योगदान नक्कीच मोठे आहे. माध्यमांनी आपले समाजभान जपले. पण, माध्यमांनी वैचारिक पिढी घडवावी असे जे गृहितक आहे, यात या योगदानाचे महत्त्व आहे का? कारण, या सगळ्या निषिद्ध राज्याला कलंकच! पण, या घटना मांडताना माध्यमांनी जनतेसमोर काय विचार मांडले? स्वातंत्र्यपूर्व काळात किंवा आणीबाणीतही आपला आवाज बुलंद असणार्‍या माध्यमांनी सध्या आपल्या आवाजाला ‘व्हॉईस चेंजर’ लावला आहे का, असा प्रश्न पडावा, अशा प्रकारे या घटनांचा ऊहापोह माध्यमांतून होत होता.

कुणाही राजकारण्याचे समर्थन किंवा विरोध न करता या घटना आणि त्यांचे परिणाम जनतेसमोर मांडण्यात माध्यमं अपयशी ठरली. कारण, त्यात समाजभान आणि जबाबदारी जपली नव्हती. या सर्व बाबींचा संदर्भ आपण जागतिक स्तरावर घेतला, तर दडपशाही जगासमोर आणली म्हणून चीनमध्ये किंवा दहशतवादाला जगासमोर मांडले म्हणून मध्यपूर्वेतील इस्लामिक राष्ट्रांमध्ये समाजमाध्यमांत काम करणार्‍या व्यक्तीचा खून केला गेला किंवा तुरुंगात डांबले गेले. त्यामुळे या ठिकाणी जाऊन माध्यमांपुढे सत्य मांडणारे खूप कमी आहेत. यानुसार महाराष्ट्रात समाजमाध्यमांत काम करणार्‍या व्यक्तींना काही भीती वगैरे आहे का? की, त्यामुळे ते समाजभान आणि समाजाची जबाबदारी मुक्तपणे मांडत नाहीत? किंवा विशिष्ट व्यक्ती राज्यातील सत्ताकेंद्राच्या बाजूने आपल्या माध्यमातून व्यक्त होताना दिसत आहेत? पत्रकार लेखक शिरीष कणेकर यांनी त्यांच्या आत्मचरित्रामध्ये एक घटना लिहिली आहे. रात्री सिनेमा पाहून परतत असताना एका विवाहित महिलेवर बलात्कार होतो, या घटनेवर ते लिहितात. पण, या घटनेवर बातमी लिहिली म्हणून त्यांना पुढे खूप वेगवेगळे अनुभव येतात.
 
 
सारांश असा असतो की, त्यावेळच्या राजकीय सत्तेत महाराष्ट्र असुरक्षित आहे, असे या बातमीतून सिद्ध होते. राजकीय सत्तेला असुरक्षित वाटणारी बातमी लिहिली आणि छापलीच कशी गेली? असे काहीसे वातावरण तयार होते. या घटनेचा उल्लेख करण्याचे कारण कणेकरांना जे अनुभव आले, तेच अनुभव प्रसारमाध्यमांत समाजभान आणि जबाबदारीची जाणीव ठेवणार्‍या माध्यमकर्मींना येतात का? वर त्याविरोधात न बोलण्याची दहशत त्यांच्यावर आहे का? ‘चाय-बिस्कीट पत्रकारिता’ अशा अतिशय दारुण शब्दात माध्यमांचे चित्रण का केले जात आहे?

तर त्याचेही उत्तर हेच आहे की, माध्यमे ही समाजासाठी असतात. स्वतःच्या स्वार्थ साधण्यासाठी ती नसतात, ही वृत्ती माध्यमांत दिसत नाही. हाथरसमध्ये एका मुलीची हत्या झाली. वाल्मिकी समाजाची म्ाुलगी म्हणून या घटनेला जातीय वळण देत काही राजकारण्यांनी आपला स्वार्थ साधला. त्यावेळी त्या घटनेचे गांभीर्य किंवा समाजमन दुभंगण्याची परिस्थिती लक्षात न घेता माध्यमातील कित्येक घटकांनी या बातमीला ‘राजकीय सत्तास्वार्थ’ म्हणून वापरला की काय, असे दिसले. त्यांच्या बातमीतील पीडितेची वेदना कमी, मृत्यूचे दुःख कमी आणि प्रियांका, राहुल गांधी कसे हाथरसला गेले, याचे रसभरीत वर्णन होते. पुढे या घटनेत असे दिसून आले की, एका नक्षली महिलेने जातीय ध्रुवीकरणासाठी यात सहभाग घेतला होता. हाताच्या बोटावर असलेल्या माध्यमांतील घटकांनी याबाबत जनतेसमोर तथ्य मांडले. पण, त्यानंतर माध्यमांतून हा घटनाक्रम दिसण्याचे थांबले. का? नक्षली महिलेच्या सहभागातून एका निष्पाप मुलीच्या खुनाला जातीय विद्वेषात बदलवले जाते, ही घटना गंभीर नव्हती का? याबाबत माध्यमांनी समाजभान आणि जबाबदारी जपली का?
 
उत्तर प्रदेशमध्ये आमदारकीसाठी एकही मुस्लीम उमेदवार न देता भाजप सत्तेवर आले. त्यावेळी माध्यमांत काही ठिकाणी मांडणी झाली की, असे कसे मुस्लिमांना तिकीट भाजपने दिले नाही. पण, त्याच वेळी माध्यमांतून असे अजिबात मांडताना दिसले नाही की, जातीय किंवा कोणतेही ध्रुवीकरण न करताही भारतात निवडणूक लढताही येते अन् जिंकताही येते. हा जो एकांगी दृष्टिक्षेप आहे ना, तोच मुळात भयंकर आहे. त्यामुळेच माध्यमांतले समाजभान आणि जबाबदारी संपताना दिसते. या बाबींचा विचार करता शोषित-वंचित गटांबाबत, स्त्रियांबाबत माध्यमांची भूमिका काय आहे? तर ‘युनेस्को’चा काही वर्षांपूर्वीचा यासंबंधीचा अहवाल महत्त्वाचा आहे. दृक-श्राव्य माध्यमातून ‘दिसणार्‍या’ स्त्री प्रतिमेबद्दल ‘युनेस्को’चा अहवाल निष्कर्ष मांडतो की, “जागतिक स्तरावर अशा माध्यमांतून ‘स्त्री’ला चार प्रकारांत सादर केले जाते. १) ‘सेक्स किटन’ म्हणजेच मादक खेळणे, २) कुटुंबवत्सल माता, ३) चेटकीण (‘भुरळ पाडणारी मायावी विकृत स्त्री’ या अर्थाने) किंवा ४) करिअरसाठी धडपडणारी स्त्री. या अहवालात शेवटी असं म्हटलंय की, येत्या ७५ वर्षांत तरी माध्यमांमध्ये स्त्री-पुरुष समानता येण्याची शक्यता नाही.

 येथील दृक-श्राव्य माध्यमांनी पहिल्या तीन प्रतिमांच्या साचात अडकवलेली सर्वसामान्य भारतीय स्त्री ही ‘सेक्स डॉल’ नाही आणि कुटुंबासाठी २४ तास राबणारी ‘महान त्यागमूर्ती’ही नाही. ती या दोन टोकाच्या प्रतिमांच्या मध्ये कुठेतरी स्वत:साठीदेखील जगू पाहणारी एक ‘हाडा मासाची’ व्यक्ती आहे, हा विचार मांडणे महत्त्वाचे आहे.” अर्थात, या अहवालात ७५ वर्षे हा कालावधी जरा जास्तच वाटतो. कारण, गोरा रंग हा सर्वश्रेष्ठ ठरवणार्‍या, त्यातून रंगभेद दर्शवणार्‍या ‘फेअर अ‍ॅण्ड लव्हली’ या उत्पादनाच्या कंपनीला आपल्या उत्पादनाचे नाव ‘ग्लो अ‍ॅण्ड लव्हली’ करावे लागले, हा बदल महत्त्वाचा आहे.

माध्यमांमध्ये सध्या ‘समाजभान’ म्हणून स्त्री-पुरुष संबंधांवर, लैंगिकेतवर बराच ऊहापोह केला जातो. मात्र, हे मांडताना मानवी मूल्यांपेक्षा त्यातील वासना मांडण्यात माध्यमांना अधिक रस असल्याचे खेदाने म्हणावे लागेल. आजकाल तर मासिक पाळी हाच मुली-महिलांचा जणू एकमेव प्रश्न जगात उरला आहे, अशा अविर्भावात माध्यमं व्यक्त होताना दिसतात. या दिवसातले प्रश्न महिला अनादी काळापासून सोडवतच आहेत. मात्र, हा प्रश्न माध्यमांवर मांडून त्याद्वारे तिच्या शरीराचे, लैंगिकतेचे चित्रण करत त्या अनुषंगाने भारतीय समाजमनावर टीका करण्याचा सूर काही लोकांनी पकडला आहे. विशेष म्हणजे, ते या सगळ्या गोष्टींना ‘मानवतावाद’, ‘पुरोगामित्वा’चे लेबल लावतात. तसे पाहिले तर मासिक पाळीविषयी प्रत्येक महिलेचे अनुभव तिच्या तिच्या शारीरिक, मानसिक आणि भौतिक स्तरावरचे असतात. पण, त्याचा फारसा {वचार माध्यमांतून मात्र होताना दिसत नाहीअसो. माध्यमांमुळे जग एकत्र आलेले आहे हे मात्र नक्की.

त्यामुळे जगभरातल्या कोणत्याही घटनेचे प्रतिबिंब वादविवाद, चर्चा या माध्यमांनी स्थानिक पातळीवर आणले आहे. आता हेच बघा ना, अमेरिकेतील अश्वेतवर्णीय व्यक्तीला तिथल्या पोलिसांनी अमानुषपणे मारले. ही घटना सर्वस्वी निंदनीयच! पण, आपल्या इथे माध्यमांतून काही ‘अतिमानवतावादी’ व्यक्त होताना, त्या अश्वेतवर्णीयांची तुलना भारतीय सामाजिकदृष्ट्या मागास गटाशी करू लागले. त्याच चौकटीत भारतीय मागासवर्गीय समाजाला व्यक्त करण्याचा प्रयत्न करू लागले. अर्थात, संस्कृतीशी घट्ट नाते असलेल्या आणि याच मातीत जन्मलेल्या या समाजपुरुषाने माध्यमांवर अशा प्रकारे व्यक्त होणार्‍यांना जराही भीक घातली नाही. आता यावर विचार करताना जाणवते की, समाजमाध्यमांत अश्वेतवर्णीयांचे दुःख तसेच भारतीय समाजातील मागास गटांचे दुःख मांडले. पण, अमेरिकेतील अश्वेतवर्णीय अमेरिकेपेक्षा स्वतःचे अस्तित्व वेगळे मानतात, तसे भारतीय समाजातील कोणताही गट स्वत:ला मातृभूमीपासून वेगळे समजत नाही, हे मांडण्यात ही माध्यमं कमी पडतात, हे नक्की. आताही नीरज चोप्रा या खेळाडूला ‘ऑलिम्पिक’मध्ये सुवर्णपदक मिळाले. सर्वच माध्यमांत असे सांगितले गेले की, लोक त्यांची जात शोधत आहेत. पण, नीरज चोप्राच्या यशाचे जातीपातीपलीकडे जाऊन सगळ्या देशाने स्वागत केले, याबाबत माध्यमांनी वेगळे काही मत मांडले का? किंवा नीरज चोप्रा हा स्वत: जातपात न मानता, केवळ भारतीय म्हणून खेळले, ही भूमिका माध्यमांत मांडताना क्वचित दिसली गेली.
 
 ‘एक देश, एक समाज’ ही भावना माध्यमांतून व्यक्त व्हायला हवी, हेच आजच्या काळातले माध्यमांचे समाजभान आहे. देशाच्या भल्यासाठी, समाजाच्या उत्थानासाठी जे जे काही चांगले आहे, त्याचे अतिरंजित समर्थन नव्हे, पण अतार्किक विरोध करणे अशा गोष्टी माध्यमांतून होताना दिसतात. त्यावर अर्थात माध्यमांचे धरबंध नाहीत. पण, ‘तिहेरी तलाक’, ‘शेतकरी कायदा’, ‘सीएए’ हे सगळे कायदे देशाच्या आणि समाजाच्या हिताचे होते आणि आहेत. या सगळ्याबाबत माध्यमांवर काय प्रतिबिंब मांडले गेले? शाहीनबागेला कोणी अतोनात प्रसिद्ध दिली? शेतकरी आंदोलनातले सत्य कुणी दडवले? भीमा-कोरेगाव आणि त्यात पकडल्या गेलेल्या नक्षली समर्थकांची तळी कुणी उचलली? या सगळ्या गोष्टी पाहिल्या की वाटते, खरंच माध्यमांनी समाजभान आणि आपली जबाबदारी नीट सांभाळली आहे का?
 
याबाबत फेसबुकच्या मार्क झुकरबर्ग यांचे एक विधान आठवते. २०१८ साली फेसबुकचे मुख्य कार्यकारी अधिकारी झुकरबर्ग यांनी ब्रुसेल्स येथे युरोपियन युनियनच्या मुख्यालयात भाषण केले. त्या भाषणात ते म्हणाले, “फेसबुकच्या चुकीच्या वापरासंदर्भात मला पश्चाताप होत आहे. फेसबुकचा वापर दुसर्‍याची निंदानालस्ती, खोट्या बातम्या पेरण्यासाठी केला जाईल, असे आम्हाला वाटले नव्हते.” झुकरबर्ग यांचे विधान फेसबुकपुरतेच मर्यादित आहे, असे वाटत नाही, तर ट्विटर, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअ‍ॅपसाठीसुद्धा हा {वचार करण्यासारखे आहे. अर्थात, माध्यमांचे अतिव्यापक स्वरूप पाहिले की वाटते, माध्यमांचे मायाजाल मोठे आहे. त्याची मोहिनी कोणी टाळूच शकत नाही. जग होत्याचे नव्हते करणारे सामर्थ्य या ‘माध्यम’ नावाच्या तक्षकामध्ये आहे. माध्यमांनी समाजभान आणि आपली जबाबदारी ओळखायलाच हवी. आज त्याबाबत माध्यमं कमी पडत आहेत, हे कबूल करावेच लागेल. तरीही आशा बाळगण्यास हरकत नाही की, समाजभानाचे पदपथ जरा बाजूला झाले असले तरी ते आहेतच. त्यामुळे पुढच्या वळणावर, पुढच्या काळात माध्यमं हे समाजभान आणि जबाबदारी सुयोग्यरीतीने निभावतील.





 
 
@@AUTHORINFO_V1@@