पत्रकारितेचे शिक्षण आणि सद्यस्थिती

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Aug-2021   
Total Views |
journin 1_1  H
 

पत्रकारितेच्या शिक्षणाने गेल्या काही दशकांत फार लांबचा पल्ला गाठलेला दिसतो. आधी हाताच्या बोटावर मोजण्याइतपत असलेल्या संज्ञापन आणि पत्रकारितेचे शिक्षण देणार्‍या महाविद्यालयांची, विद्यापीठांची संख्यासुद्धा अशीच वाढत गेली. या पार्श्वभूमीवर पत्रकारितेचे शिक्षण आणि सद्यःस्थितीचा आढावा घेताना मुख्यत्वे पत्रकारितेच्या शिक्षणाचे स्वरूप, शिक्षकांचा दृष्टिकोन आणि एकूणच विद्यार्थ्यांची मानसिकता या बाबींचा खोलवर जाऊन विचार करावा लागेल.

 
एककाळ असा होता की, पत्रकार होण्यासाठी कुठल्याही विशेष ‘डिग्री’ किंवा ‘डिप्लोमा’ची गरज नसे. संभाषण कौशल्य आणि लेखनशैली उत्तम असेल, तर ती व्यक्ती पत्रकाराच्या निकषांत अगदी सहजपणे बसत होती. म्हणूनच बरेचदा साहित्यिक, विचारवंत, शिक्षक, समाजसेवक यांसारख्या समाजाचे बौद्धिक भरणपोषण करणार्‍या वर्गाचे प्रतिबिंब आपल्याला पत्रकारिता क्षेत्रातही पडलेले दिसते. त्यात भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील पत्रकारितेचे योगदान तर अगदी सर्वश्रुत. पण, जसजसा काळ पुढे सरकत गेला, तसतसे पत्रकारिता आणि एकूणच माध्यमक्षेत्रातील आयामही जलदगतीने बदलत गेले. भारताच्या सामाजिक, आर्थिक आणि राजकीय परिप्रेक्ष्याने पत्रकारितेचे स्वरूपही पालटले. मुद्रितमाध्यमांबरोबरच ९०च्या दशकात वृत्तवाहिन्यांच्या पदार्पणाने तर माध्यमजगतातील सगळी गणितेच बदलून गेली. पूर्वी दुसर्‍या दिवशी वृत्तपत्रात वाचायला मिळणार्‍या आणि तरीही तितक्याच ताज्या वाटणार्‍या बातम्या ‘ब्रेकिंग न्यूज’च्या काळात शिळ्यापाक्या वाटू लागल्या.
 
 
 आता तर त्याहीपलीकडे जाऊन समाजमाध्यमांनी ‘ब्रेकिंग न्यूज’लाही मागे टाकले. ‘रिअल टाईम अपेडट’, सेकंदा-सेकंदाला बदलणार्‍या घडामोडी स्मार्टफोनवर अगदी एका क्लिकवरउपलब्ध होऊ लागल्या. त्यामुळे माध्यमजगतात झालेल्या या जागतिक स्थित्यंतरांचा परिणाम पत्रकारितेच्या शिक्षणावर झाला नसता तरच नवल. त्यामुळे पारंपरिक पत्रकारितेच्या शिक्षणापलीकडे जाऊन नवीन माध्यमांची नवीन समीकरणेही पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांना आज आवर्जून शिकवली जातात. तेव्हा, या विषयाचा ऊहापोह करण्यासाठी सर्वप्रथम संज्ञापन आणि पत्रकारितेच्या शिक्षणाचा थोडक्यात आढावा घेणे क्रमप्राप्त ठरावे.


संज्ञापन आणि पत्रकारितेचे शिक्षण
 
 
मुंबईपुरता विचार करायचा झाल्यास बारावीनंतर ‘बॅचलर ऑफ मास मीडिया’ हा तीन वर्षांचा प्रोफेशनल कोर्स मुंबई विद्यापीठाने सुरू केला. सुरुवातीला फारसा प्रतिसाद न मिळालेल्या या पदवी अभ्यासक्रमाकडे मात्र तरुणपिढीची पावले हळूहळू वळू लागली. त्यामागचे प्रमुख कारण म्हणजे वाहिन्यांवर दिसणारे मीडियाचे ग्लॅमर आणि पत्रकारांना प्राप्त समाजप्रतिष्ठा. त्यामुळे आजही पत्रकारितेत प्रथम वर्षाला प्रवेश घेणार्‍या विद्यार्थ्यांना त्यांनी हा कोर्स का निवडला, असा प्रश्न केल्यास बहुतांश विद्यार्थी गंभीर पत्रकारितेपेक्षा मनोरंजन क्षेत्रात उतरून ‘पेज थ्री’ रिपोर्टिंग करण्यात अधिक उत्सुक असतात, हे मी अगदी छातीठोकपणे सांगू शकतो. कारण, मागील सात-आठ वर्षांपासून पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांना शिकवताना ही बाब अगदी प्रकर्षाने समोर आली. तसेच काहींचा रस हा चित्रपटक्षेत्राकडे, जाहिरातक्षेत्राकडे असल्याचेही दिसून येते. तेव्हा, माध्यमांमधील हे वैविध्य लक्षात घेता, प्रथम आणि द्वितीय वर्षात इतिहास, मानसशास्त्र यांसारख्या समाजशास्त्रीय विषयांबरोबरच संवाद कौशल्य, टेलिव्हिजन, रेडिओ, फोटोग्राफी अशा समग्र विषयांचा अभ्यासक्रमात ऊहापोह केला जातो. या दोन वर्षांनंतर तिसर्‍या वर्षी मात्र विद्यार्थ्यांना पत्रकारिता आणि जाहिरातक्षेत्र असे ‘स्पेशलायझेशन’चे दोन पर्याय दिले जातात. तेव्हा विद्यार्थी त्यांच्या आवडीनुरूप या दोनपैकी एका ‘स्पेशलायझेशन’ची निवड करू शकतात.
 
 
बरेचदा संज्ञापन आणि पत्रकारितेचा अभ्यासक्रम आणि प्रत्यक्ष माध्यमजगतातील काम यांचा परस्परांशी काहीएक संबंध नाही, अशी सरसकट टीका केली जाते. परंतु, यामध्ये पूर्णत: तथ्य आहे, असे अजिबात म्हणता येणार नाही. समस्या ही की, जी ‘थेअरी’ विद्यार्थ्यांना वर्गात शिकवली जाते, त्याचे ‘प्रॅक्टिकल अ‍ॅप्लिकेशन’ मात्र हवे तसे आणि म्हणावे तितके ‘प्रोजेक्ट्स’च्या माध्यमातून प्रतिबिंबित होतेच, असे नाही. त्यातच विद्यापीठाचा आणि एकूणच महाविद्यालयांचा विद्यार्थ्यांमधील पत्रकार घडविण्यापेक्षा ते उत्तीर्ण कसे होतील, यावर काहीसा अधिक भर असल्यामुळे ‘इंटरनल्स’च्या नावाखाली वर्गातच परीक्षा घेऊन सरसकट गुणांची उधळण केली जाते. ही पद्धत कदाचित इतर अभ्यासक्रमांना अनुकूल असेलही; पण यामुळे संज्ञापन आणि पत्रकारितेच्या पदवी अभ्यासक्रमाचा आत्माच निघून गेल्याचे हे विषय शिकवणारा प्राध्यापकवर्गही अगदी मोकळेपणाने कबूल करेल. कारण, पत्रकारिता हा केवळ पुस्तकी विषय नाही. वर्गात विद्यार्थ्यांना आम्ही बातमी कशी लिहावी, हे त्यातील तांत्रिक बाबी मुद्देसूद समजावून सांगूही; पण प्रत्यक्षात जोपर्यंत हे विद्यार्थी ‘फिल्ड’वर उतरत नाहीत, आपल्या आसपासच्या समस्यांकडे डोळसपणे, पत्रकाराच्या, ‘नोस फॉर न्यूज’च्या नजरेतून बघत नाहीत, तोपर्यंत वृत्तसंपादन, वृत्तलेखनाचे कौशल्य ते आत्मसात करतील, ही खरंंतर एक भाबडी आशा ठरावी. त्यामुळे पत्रकारितेचा अभ्यासक्रमच सदोष आहे, या दाव्यात पुरेसे तथ्य नाही. उलट त्या अभ्यासक्रमाच्या अंमलबजावणीत काही त्रुटी आहेत, हे कबूल करून त्यावर तोडगा काढणे महत्त्वाचे ठरेल.
 
राहता राहिला प्रश्न अभ्यासक्रमाचा आणि वर्तमानातील माध्यमक्षेत्राचा, तर अलीकडेच या पदवी अभ्यासक्रमाचे ‘बॅचलर्स ऑफ आर्ट्स इन मल्टिमीडिया अ‍ॅण्ड मास कम्युनिकेशन’ असे नामकरण करण्यात आले. त्यामुळे या पदवी अभ्यासक्रमाला एकप्रकारे कालसुसंगततेची झळाळी देण्याचा विद्यापीठाने केलेला हा एक स्तुत्य प्रयत्नच म्हणावा लागेल. पूर्वीच्या अभ्यासक्रमात माध्यमक्षेत्रातील बर्‍याचशा विषयांबाबत पुरेशी स्पष्टता नव्हती किंवा त्यांचा फारसा संदर्भही उपलब्ध नव्हता. परंतु, या नवीन अभ्यासक्रमात नाट्यसृष्टीपासून ते ग्राफिक्स आणि शोधपत्रकारिता, क्रीडापत्रकारिता यांसारख्या विषयांचाही अगदी खोलवर जाऊन विचार केलेला दिसतो. तसेच आजच्या ‘डिजिटल’ पत्रकारितेच्या अनुषंगाने ‘मोबाईल जर्नालिझम’, ‘फेक न्यूज अ‍ॅण्ड फॅक्ट चेकिंग’ आदी विषयांचाही नव्याने अभ्यासक्रमात केलेला समावेश हा सर्वस्वी या पदवी अभ्यासक्रमाच्या दर्जात भर घालणाराच ठरला आहे. त्यामुळे किमान या पदवीच्या नवीन अभ्यासक्रमाचे स्वागत करायलाच हवे. राहिला विषय संज्ञापन आणि पत्रकारितेतील पदव्युत्तर अभ्यासक्रमाचा तर काठिण्य पातळी अधिक असली तरी पदवी अभ्यासक्रमातील बरेचसे विषय पदव्युत्तर अभ्यासक्रमात टाळून अधिक संशोधनपूर्ण आणि प्रॅक्टिकल अशी संपूर्ण अभ्यासक्रमाची संरचना होऊ शकते, असे वाटते. एकूणात काय तर पदवी अभ्यासक्रम उत्तीर्ण केल्यानंतर विद्यार्थ्याला माध्यमक्षेत्राचे प्राथमिक ज्ञान साहजिकच प्राप्त होते. तसेच माध्यमक्षेत्राचा सर्व कोनांतून परिचय झाल्याने आपल्याला पुढे नेमक्या कोणत्या क्षेत्रात करिअर करायचे आहे, याचाही आवाका विद्यार्थ्यांना या तीन वर्षांच्या पदवी अभ्यासक्रमादरम्यान प्राप्त होऊ शकतो.
 
पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांची मानसिकता
 
 
आपण केवळ पत्रकारितेची पदवी, पदव्युत्तर अथवा डिप्लोमा पूर्ण केला म्हणजे आपल्याला सहज माध्यमक्षेत्रांत कुठेही चांगल्या पगाराची नोकरी मिळेल, हा बहुतांश विद्यार्थ्यांचा गैरसमज. परंतु, आमच्यासारखे प्रत्यक्ष एक दशकाहून अधिक काळ पत्रकारितेचे शिक्षण देणारे आणि प्रत्यक्ष पत्रकारिता करणारे अशा दोन्ही क्षेत्रात सक्रिय माध्यमकर्मी मात्र विद्यार्थ्यांचा हा भ्रम अगदी सुरुवातीलाच दूर करतात. याचे कारण अगदी स्पष्ट आहे. फक्त हातात डिग्य्रा असल्या की नोकरी मिळेल, असे पत्रकारितेत होतेच असे नाही. कारण, या पेशाच्या काही मूलभूत गरजा आहेत आणि त्यांची पूर्तता करणार्‍या उमेदवारांनाच साहजिकच प्राधान्य दिले जाते. यामध्ये प्रामुख्याने वाचन (दैनंदिन वृत्तपत्रे आणि अवांतर), लेखनशैली, संवाद कौशल्य, चालू घडामोडींचे ज्ञान, सामाजिक-राजकीय समज यांसारख्या कित्येक बाबींचा समावेश होतो. परंतु, खेदाने म्हणावे लागेल की, हल्ली पत्रकारितेच्या बहुतांश विद्यार्थ्यांचे वाचन मर्यादित असल्यामुळे आपसूकच त्यांच्या लिखाणालाही मर्यादा प्राप्त झालेल्या दिसतात. तसेच छापील काही विकत घेऊन वाचण्याची मानसिकताही लोप पावत चालली असून, ‘आम्ही सगळे ‘ऑनलाईन’ वाचतो’ या अविर्भावात गंभीर स्वरूपाचे वाचन अभावानेच होताना दिसते. तेव्हा, पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांना आमचे एकच सांगणे असते की, “बाबांनो, वाचा. वाचाल तर वाचाल!”
 
त्याचबरोबर दुसरा महत्त्वपूर्ण मुद्दा भाषेचा. पत्रकाराला तो ज्या भाषेत पत्रकारिता करू इच्छितो, ती भाषाच नुसती अवगत असूनच भागत नाही, तर त्या भाषेतील बारकावे, ती भाषा फुलवण्याचे कौशल्य, साहित्यिक अंगही असावे लागते. पण, प्रत्यक्षात या विद्यार्थ्यांना धड ना मातृभाषेत लिहिता येते आणि परीक्षेच्या पेपरांमध्ये इंग्रजीची तर सारीच बोंब. तेव्हा मराठीत पत्रकारिता जरी करायची असेल तर इंग्रजी, हिंदी या भाषांचे किमान भाषांतरापुरते तरी प्राथमिक ज्ञान असणे अत्यावश्यक. कारण, मुद्रित असो अथवा इलेक्ट्रॉनिक, एखादा विषय संशोधनपूर्ण नजरेतून समजून घेण्यासाठी, अहवालांतील बारकावे जाणून घेण्यासाठी इंग्रजीचे मूलभूत ज्ञान हाताशी हवेच. त्यामुळे विद्यार्थ्यांनी पत्रकारितेच्या अभ्यासक्रमातील तांत्रिक ज्ञान संपादनाबरोबरच भाषा सुधारणा, वाचनाची सवय, संवाद कौशल्य, वक्तशीरपणा अशा विविध बाबींवरही अधिक लक्ष केंद्रित करणे तितकेच गरजेचे आहे. त्याचबरोबर पदवी किंवा पदव्युत्तर अभ्यासक्रमादरम्यान इंटर्नशीप करून प्रत्यक्षात माध्यमक्षेत्रात कामकाज कसे चालते, याचाही विद्यार्थ्यांनी आवर्जून अनुभव घ्यावा, जेणेकरून शिक्षणानंतर कुठल्या माध्यमांत, कुठल्या पदावर आपल्याला काम करायची इच्छा आहे, याविषयी पुरेशी स्पष्टता प्राप्त होते.


तसेच काही लहानसहान; पण तितक्याच महत्त्वपूर्ण बाबीही विद्यार्थ्यांनी जरूर ध्यानात घ्याव्यात. यामध्ये संगणकाचे किमान ज्ञान तर आवश्यक आहे. पण, मराठी टायपिंगचाही विद्यार्थ्यांनी दैनंदिन सराव करावा. आपल्या मोबाईलवर व्यवस्थित, सुस्पष्ट फोटो-व्हिडिओ काढण्याचे प्राथमिक कौशल्यही विद्यार्थ्यांनी आत्मसात केले पाहिजे. या सगळ्या गोष्टी वरकरणी दुय्यम वाटत असल्या तरी या क्षेत्रात दीर्घकालीन करिअर करू इच्छिणार्‍या विद्यार्थ्यांसाठी तितक्याच गरजेच्या आहेत. म्हणूनच, पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांनी आपले शिक्षण हे केवळ पुस्तकी ज्ञानापुरते मर्यादित नसून किंबहुना, अभ्यासक्रमाच्या पलीकडे डोळस वृत्तीने पाहणेही तितकेच महत्त्वाचे आहे. शिवाय, माध्यमांकडे बघण्याचा, नवमाध्यमे समजून घेण्याचा सर्वसामान्यांचा दृष्टिकोन आणि पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांचा दृष्टिकोन यात जमीन-आसमानाचा फरक हवा. कारण, ज्या क्षेत्रात भविष्यात आपण काम करू इच्छितो, त्या क्षेत्राचे स्वरूप, संबंधित घडामोडी याची इत्थंभूत खबरबात पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांनाही असलीच पाहिजे. वरील सर्व बाबींचा एकत्रित विचार केल्यास निश्चितच पत्रकारिता करू इच्छिणार्‍या आणि सध्या पत्रकारितेचे शिक्षण घेणार्‍यांनाही त्याचा निश्चितच लाभ होऊ शकेल.


प्राध्यापकांची भूमिका आणि जबाबदारी
 
 
पदवी असो वा पदव्युत्तर अभ्यासक्रम, महाविद्यालयांकडून, विद्यापीठांकडून माध्यमक्षेत्रात कार्यरत मंडळींना ‘अतिथी प्राध्यापक’ म्हणून मागणीही असते आणि त्यांना तसे प्राधान्यही दिले जातेच. कारण, माध्यमकर्मींपेक्षा माध्यमजगताचे वास्तव आणखीन कोण जवळून सांगू शकते म्हणा! परंतु, तरीही बरेचदा या अभ्यासक्रमांमध्ये माध्यमजगताशी संबंधित नसलेल्या; पण त्या क्षेत्रातील शैक्षणिक पात्रता असलेल्या प्राध्यापकांचाही वर्ग मोठा आहे. त्याला आक्षेप घेण्याचे मुळात कारणही नाही. पण, तरीही पत्रकारिता किंवा जाहिरात यांसारख्या ‘स्पेशलायझेशन’च्या विषयांसाठी महाविद्यालयांनी माध्यमकर्मींनाच शिकवण्यासाठी गळ घालावी. तसेच माध्यमक्षेत्राचा दांडगा अनुभव असलेल्या, निवृत्त पत्रकारांनीदेखील अगदी दैनंदिन शक्य नसले तरी पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांना वेळ काढून मार्गदर्शनपर लेक्चर्स कशी देता येतील, याचाही आवर्जून विचार करण्याची नितांत गरज आहे. कारण, पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांनाही ‘थेअरी’पेक्षा प्रत्यक्ष पत्रकारितेच्या अनुभवांतील ‘थ्रील’च्या कहाण्या, प्रसंग ऐकण्यात अधिक स्वारस्य असते, हे इथे मी मुद्दाम अधोरेखित करू इच्छितो. त्याचबरोबर प्राध्यापकांनीही परीक्षांपेक्षा ‘प्रॅक्टिकल प्रोजेक्ट्स’, ‘फिल्ड वर्क’ या आधारावर विद्यार्थ्यांचे मूल्यांकन केल्यास, त्यांना मुळात विषय खरंच समजला आहे किंवा नाही, याचीही चाचपणी करता येईल. पुस्तके, नोट्स याबरोबरीनेच अधिकाधिक प्रोजेक्ट्सची जोड दिल्यास निश्चितच संज्ञापन आणि पत्रकारितेचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यास मोठा हातभार लागेल, याची खात्री वाटते.
 
तात्पर्य हेच की, पत्रकारितेचा अभ्यासक्रम ठरवणारी तज्ज्ञ मंडळी, विद्यार्थीवर्ग आणि प्राध्यापक यांनी एकमेकांकडे बोटं न दाखवता, दोषारोपण न करता, भविष्यात समाजाभिमुख आणि नीतीमूल्यांचे पालन करणारे पत्रकार कसे घडविता येतील, याचा विचार केल्यास निश्चितच माध्यमक्षेत्राची, पत्रकारांची दिवसेंदिवस खालावत चाललेली प्रतिमा सुधारण्यास हातभार लागेल, हीच किमान अपेक्षा!











 
 
@@AUTHORINFO_V1@@