तपपूर्ती आणि पुढचा टप्पा...

    14-Aug-2021   
Total Views |

Mumbai Tarun Bharat_1&nbs
 
दैनिक ‘मुंबई तरुण भारत’चे हे बारावे वर्ष. पुन्हा सुरू होऊन बाराव्या वर्षात हे दैनिक पदार्पण करीत आहे. मराठी दैनिकांच्या प्रवासात १२ वर्षे हा काही मोठा प्रवास नाही. पण, दै. ‘मुंबई तरुण भारत’चे अस्तित्व त्यापूर्वीचेही आहे. मुळात कार्यकर्त्यांनी वैचारिक उद्देशाने चालविलेले हे दैनिक.
 
 
युवक हार जाते हैं लेकीन
यौवन कभी न हारा
एक निमिश की बात नहीं
चिरसंघर्ष हमारा...
अटलजींच्या या कवितेला अनुसरून रा. स्व. संघाची विचारसरणी मानणार्‍या आणि अनुसरणार्‍या स्वयंसेवकांनी चालविलेली अशी अनेक नियतकालिके देशभरात आपापल्या कार्यक्षेत्रात सक्रिय आहेत. अशा नियतकालिकांचे प्रारब्ध काय... तर जोपर्यंत त्याचा वाचक सक्रिय आहे आणि चालविणार्‍या मंडळींचा उत्साह अबाधित आहे, तोपर्यंत वैचारिक चळवळीच्या नियतकालिकांना मरण नाही. अशी नियतकालिके आणि दैनिके सगळ्याच विचारसरणीच्या मंडळींनी चालवून पाहिली. विचारसरणीच्या उदय-अस्ताबरोबर ती वाढली किंवा अस्त पावली. स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास असलेल्या आपल्या देशाला तितक्याच मोठ्या स्वातंत्र्ययोद्ध्यांचीही परंपरा लाभली, यातील जवळपास सर्वच मोठ्या नेत्यांनी आपली दैनिके काढली आणि ती चालविलीदेखील. मात्र, केवळ वैचारिक अधिष्ठान आहे, असे म्हणून दैनिके किंवा नियतकालिके चालत नाहीत. वाचकवर्ग आणि दैनिकाचे अर्थकारण या दोन्ही गोष्टी येथे समान न्यायाने बांधाव्या लागतात. कारण, ही मुळात समाजाची माध्यमे आहेत. वाचक आपला असला तरी तोदेखील अन्य माध्यमे घेणार्‍या माध्यमांपैकीच एक आहे. दै. ‘मुंबई तरुण भारत’ हे धंदेवाईक उद्दिष्ट ठेवून काम करणारे दैनिक नसले, तरीही विस्तारासाठी व्यावसायिक मूल्ये नाकारता येत नाहीत. कोरोनाच्या काळात अन्य व्यवसायांप्रमाणे पहिला फटका बसला तो माध्यमांना. मुद्रित माध्यमांना तर त्याचा चांगलाच फटका बसला. कोरोनाच्या भीतीने लोकांनी दैनिकांना हात लावण्यासही नकार दिला. घराबाहेर न पडता ‘डिजिटल’ माध्यमांच्या आधारावर या वाचकांनी आपली मजकुराची भूक भागवायला सुरुवात केली. यात सर्वच प्रकारचा मजकूर होता. याचा अपेक्षित परिणाम तत्काळ दिसून आला. व्यावसायिक दृष्टिकोनातून वृत्तपत्र चालविणार्‍या मंडळींनी ‘कॉस्टकटिंग’च्या संकल्पनेनुसार कर्मचार्‍यांचे पगार कापायला सुरुवात केली. अनेक ठिकाणी पत्रकारांना घरचा रस्ताही दाखविण्यात आला. या संपूर्ण काळात दै. ‘मुंबई तरुण भारत’ ही माध्यमविश्वातील अशी एकमेव संस्था होती, जिथे अशा प्रकारे आपल्या टिमला वागणूक देण्यात आली नाही. याचे कारण दै. ‘मुंबई तरुण भारत’चा वाचक, हितचिंतक आणि जाहिरातदार; जो दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या मागे ठामपणे उभा राहिला. या संकटातून बाहेर आल्यामुळे माध्यम म्हणून कात टाकून नव्याने उभे राहण्याचा व नव्या संकल्पनांसह आपले अस्तित्व अधोरेखित करण्याचा प्रयत्न करण्याचा आत्मविश्वासही यातून निर्माण झाला.
 
 
 
पारंपरिक माध्यमांसमोर आज खर्‍या अर्थाने आव्हान उभे आहे ते मुक्त माध्यमांचे आणि त्याच्या वाचकांना किंवा वापरकर्त्यांना कवेत घेण्याचे. काही माध्यमे चक्क मुक्त माध्यमांचे अनुकरण करून स्वत:चे अस्तित्व टिकविण्याचा प्रयत्न करीत आहेत. जुन्या भारदस्त नावाच्या दबदब्यावर चालणार्‍या दैनिकांनाही स्वत:च्या वाचकाला टिकवून ठेवण्यासाठी नाना प्रकारच्या कसरती कराव्या लागत आहेत. अशा घडामोडींच्या गदारोळात आपल्या वाचकांच्या मजकुराच्या गरजेचा विचार करीत दै. ‘मुंबई तरुण भारत’चा आजवरचा प्रवास समाधानाचा मानावा लागेल. दै. ‘मुंबई तरुण भारत’ हे कृतिशील वाचकांचे कृतिशील दैनिक! आपला वाचक कृतिशील आहे, कारण तो एका विशिष्ट विचारसरणीला जोडलेला आहे. ही विचारसरणीच आज या देशाच्या सामाजिक, राजकीय केंद्रस्थानी स्थिरावलेली आहे. सत्ता असताना, नसतानाही तन-मन-धनपूर्वक संघकामाला जोडलेला आपला वाचक, समाजात घडणार्‍या घटनांकडे फक्त मूकपणे पाहत नाही. तो कृतिशील होऊन कार्यप्रवण होतो. संघाच्या संस्कारातून उभ्या राहिलेल्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आज कितीतरी सेवाकार्य उभी राहिली आहेत. समाजाच्या सगळ्याच क्षेत्रात आज संघ स्वयंसेवकांनी आपला ठसा उमटविला आहे. दै. ‘मुंबई तरुण भारत’ही त्याच परंपरेचा शिलेदार. विचारांचा (वसा) पुढे नेत असतानाच नव्या घटकांना माध्यमाचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे काम दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या माध्यमातून करण्यात आले. नव्या दमाचे लेखक उभे करण्याचे कामही महत्त्वाचे. गेली चार वर्षे चाललेला ‘कालजयी सावरकर’ हा उपक्रम त्यापैकीच एक. नवोदित लेखकांना सहा महिने आधी साहित्य पुरवून त्यांच्याकडून लेख लिहून घेण्याचा आणि त्याचा विशेषांक करून ठिकठिकाणी कार्यक्रम करून त्या विशेषांकाचे प्रकाशन करण्याचा उपक्रम चांगला यशस्वी झाला. नव्या दमाच्या लेखकांना सावरकरांचे विचार मांडण्याचे व्यासपीठ म्हणून दै. ‘मुंबई तरुण भारत’ यशस्वी ठरला. या लेखांची नंतर पुस्तके झाल्याने या लेखकांनाही प्रतिष्ठा मिळाली. ‘अ‍ॅमेझॉन’सारख्या पोर्टलवरूनही या पुस्तकांची उत्तम विक्री झाली. जाहिरातदार व हितचिंतक यांनी साथ दिल्यानेच ही पुस्तके इतक्या आकर्षक पद्धतीने उपलब्ध करता आली. या सार्‍याच उपक्रमांचा उद्देश नव्या दमाचे लेखक उभे करणे हाच होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना वाहिलेला अंक, अण्णाभाऊ साठेंना वाहिलेला अंक यांसारख्या विषयांतही नव्या दमाचे अनेक लेख उभे राहिले. यातील बहुसंख्य मंडळींनी यापूर्वी कुठेच लिहिले नव्हते. सावरकरांच्या अंकात साथ दिली अक्षय जोग यांनी, टिळकांच्या अंकात पार्थ बावस्कर सोबत आला. योगिता साळवींनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे यांच्या अंकात अशाच प्रकारे लेखकांना जोडण्याची जबाबदारी घेतली. लहान-मोठ्या अशा अनेक पुरवण्यांचे गेल्या काही वर्षांत प्रकाशन करण्यातही आपल्याला यश मिळाले. ‘वेल्थ क्रिएटर’ हा उद्योजकांच्या कर्तृत्वाला व्यासपीठ देणारा कार्यक्रमही दै. ‘मुंबई तरुण भारत’ने केला. ‘कोविड’काळात ‘कोविड’च्या संकटावर मात करून आपले उद्योग सुरू ठेवणार्‍या आणि अर्थचक्राला गती देणार्‍या उद्योजकांचाही अशाच प्रकारे सन्मान दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या माध्यमातून करण्यात आला. या सार्‍याच प्रयत्नांतून विविध जाहिरातींसाठी लागणारा एक नव्या प्रकारचा डाटा आपल्यासमोर उभा राहिला. प्रारंभी म्हटल्याप्रमाणेच ‘डिजिटल’ माध्यमांचे वाढते महत्त्व हा दैनिकांच्या दृष्टीने महत्त्वाचा मुद्दा. दै. ‘मुंबई तरुण भारत’ला या आघाडीवर चांगले यश मिळाले. ‘महाएमटीबी’च्या माध्यमातून आपल्याला खूप मोठे यश यातून मिळाले. ‘डिजिटल’ माध्यमांवर ‘महाएमटीबी’च्या माध्यमातून आजघडीला सात हजारांहून अधिक व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. ‘फेसबुक’ व ‘युट्यूब’ या दोन्ही प्लॅटफॉर्मवर यातून निर्माण झालेल्या वाचकांची संख्याच सुमारे साडेतीन लाखांहून अधिक आहे. यात ‘इन्फोग्राफिक्स’ आहेत, ‘लाईव्ह’ आहेत, विविध प्रकारच्या चर्चा आहेत. मजकूर आहेत. लैंगिकता, राष्ट्रविरोधी तत्त्वे, समाजविघातक घटक, गुन्हेगारी यांचे उदात्तीकरण न करता मजूकर निर्माण करता येऊ शकतो आणि त्याला वाचकही निर्माण करता येऊ शकतो, असा एक मोठा आत्मविश्वास यातून निर्माण झाला. हा आत्मविश्वास कोणत्याही पुढील वाटचालीसाठी प्रेरणा देणारा आहे.
 
 
 
यानंतरचा प्रश्न येतो तो म्हणजे, मग आता पुढे काय? अर्थात, पुढचा प्रवास आत्मविश्वासाने भारलेलाच असेल! ‘क्रॉसकन्व्हर्जन्स’ हे माध्यमविश्वासाचे भविष्य आहे. सोशल मीडियावर मिळणारी पोहोच आणि मुद्रित माध्यमांची विश्वासार्हता याला उपक्रमशीलतेची जोड दिली की, माध्यमातल्या कुठल्याही प्रयोगाला यश मिळण्याची शक्यता मोठी आहे. असे अनेक प्रयोग आपण केले आहेत आणि यापुढेही केले जातील. ‘राष्ट्रप्रथम’ ही भूमिका, तर ‘टिमवर्क’ हे तत्त्व मानून दै. ‘मुंबई तरुण भारत’चे आजवरचे प्रयोग यशस्वी होत आले आहेत आणि या यापुढेही होतील, असे मानायला हरकत नाही.
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

किरण शेलार

एम सी जे पर्यंत शिक्षण. सध्या मुंबई तरुण भारतचे संपादक. मूळ मुंबईकर आणि बालपणापासून रा. स्व. संघाशी संबंधित. सा. विवेक व तरुण भारत समूहात विपुल लिखाण. वन्यजीव बचावाच्या कामात सक्रिय. महाराष्ट्र राज्य वन्यजीव मंडळाचे सदस्य. राष्ट्रीय प्रश्न, राजकीय, सामाजिक व धोरणविषयक अभ्यास व लिखाण.