यवतमाळमधील महिलेचे संजय राठोडवर लैंगिक छळाचे आरोप
मुंबई : राज्यभर गाजलेल्या पूजा चव्हाण प्रकरणात संशयाची सुई ज्याच्याकडे आहे असे शिवसेनेचे नेते, माजी मंत्री आमदार संजय राठोड याच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. संजय राठोड याच्या विरोधात एका महिलेने गंभीर आरोप केल्यामुळे राज्यात खळबळ माजली आहे. संजय राठोड आपला लैंगिक छळ करत असल्याचे आरोप या महिलेने केले आहेत.
भाजप उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी हा गौप्यस्फोट केला आहे. चित्रा वाघ यांनी या पीडित महिलेच्या तक्रारीच्या पत्राचे फोटो ट्विटरवर टाकले आहेत. यवतमाळ पोलिसांना हे पत्र लिहिण्यात आले आहे. या पत्रात आरोपी म्हणून माजी मंत्री संजय राठोड याचे नाव लिहिले आहे. आपल्या पतीस नोकरीवर पूर्ववत घेण्यासाठी संजय राठोड याने शरीरसुखाची मागणी केली आणि त्यास नकार दिल्यावर आपला लैंगिक आणि मानसिक छळ केला असा आरोप या महिलेने केला आहे. तसेच राठोड हा शारीरिक त्रास देत असल्याचेही या महिलेने म्हटले आहे.
दरम्यान चित्रा वाघ यांनी संजय राठोड प्रकरणावरून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनाही काही प्रश्न केले आहे. त्या म्हणतात, शिवसेनेच्या संजय राठोड वर आणखी एक गंभीर आरोप एका महीलेने केला आहे मुळात ज्याच्यामुळे एका भगिनीनी जीव दिला त्याला ढळढळीत पुरावे असतांनाही अजूनही कुणाच्या सांगण्यावरून बेड्या ठोकल्या गेल्या नाहीत तो अजूनही मोकाट कसा फिरतोय? की आपण आणखी महिलांवर अत्याचार होण्याची वाट पहातोय ?अशी तालीबानी प्रवृत्ती या महाराष्ट्रात महिलांनी कधी अनुभवली नव्हती जिची ठाकरे सरकारच्या काळात अनुभूती मिळतेय.
मला मा. मुख्यमंत्र्यांना एकच प्रश्न विचारायचा आहे की, एखाद्या महिलेला न्याय मिळवण्यासाठी आत्महत्याच करावी लागेल का? तिला जीवचं द्यावा लागणार आहे का ?, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.पुढे त्या म्हणतात, आज मी महाराष्ट्रातील माझ्या सगळ्या भगिनींना आवाहन करते की रक्षाबंधनच्या दिवशी एक ‘रक्षा-बंधना’ चा धागा माननीय मुख्यमंत्र्यांना जरूर पाठवावा जेणेकरून मुख्यमंत्री म्हणून त्यांना महाराष्ट्रातील त्यांच्या भगिनींची व त्यांच्या रक्षणाची जाण होईल, असे आवाहनही चित्रा वाघ यांनी केले.