‘कोरोना’ आणि कर्मचार्‍यांची काळजीवाहू कंपन्या

    13-Aug-2021
Total Views |

covid_1  H x W:
 
 
कंपन्यांच्या उच्च व्यवस्थापनाच्या मते कोरोना महामारी हे वैयक्तिक-व्यावसायिकच नव्हे, तर सामाजिक-राष्ट्रीय संकट ठरले. व्यावसायिक म्हणून नव्हे, तर एक समाज म्हणून सर्वांचीच यानिमित्ताने वैयक्तिक व सामूहिक स्वरूपात दीर्घकालीन परीक्षा ठरली. कंपनी आणि कर्मचारी हे व्यवसायातील महत्त्वपूर्ण घटक कठीण व आव्हानपर प्रसंगी परस्परांच्या गरजांपोटी काय करू शकतात व करू शकतात, याचा वस्तुपाठ सर्वांना मिळाला.
कोरोनादरम्यानच्या अखेरच्या टप्प्यात कर्मचार्‍यांमध्ये असणारी अस्थिरता-अस्वस्थता व व्यवसायापासून वैयक्तिक स्तरावरील आव्हानांना तोंड देऊन त्यावर तोडगा काढावा लागला. अशा कठीण परिस्थितीत कर्मचार्‍यांना सहानुभूतीपूर्वक मदतीचा हात देण्यासोबतच कर्मचार्‍यांच्या संदर्भात धोरणात्मक निर्णय आणि त्यांच्या अंमलबजावणीसाठी प्रसंगी चाकोरीबाहेर जाऊन केलेल्या प्रयत्नांचा कानोसा पुढील संदर्भात मार्गदर्शक ठरतो.
 
 
लसीकरणासह कोरोनावर नियंत्रण मिळविण्यात कर्मचार्‍यांच्या पाठीशी उभ्या राहणार्‍या कंपन्यांनी व्यवस्थापन स्तरावर आता विविध प्रकारच्या व्यापक उपाययोजना सुरूच ठेवल्या आहेत. यामध्ये लसीकरणाशिवाय त्यानंतरची रजा, आवश्यक सल्ला-समुपदेशन व त्याद्वारे कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी मानसिक-भावनिक गरजांपोटी आवश्यक असे सहकार्य या सार्‍यांचा समावेश आहे.
 
 
कोरोनादरम्यान कर्मचारी, त्यांचे कुटुंबीय, भिन्न नातेवाईक यांच्यावर प्रत्यक्षाप्रत्यक्ष परिणाम झाले. अनेकांना तातडीने उपचारांची गरज भासली. काहींना जीवघेणी जोखीम स्वीकारावी लागली, तर प्रसंगी काहींच्या जीवावरही बेतले. आर्थिक खर्चाच्या जोडीला मानसिकदृष्ट्याही हे पैलू विविध समाजघटकांप्रमाणे कंपनी कर्मचार्‍यांसाठीसुद्धा आव्हानपर ठरले. त्यावर तेवढीच परिणामकारक उपाययोजना तातडीने व दीर्घकालीन स्वरूपात होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
 
 
‘गोल्डमॅन मॅच’ कंपनीमध्ये कोरोनाकाळात प्रत्येक कर्मचार्‍याने आपली व आपल्या कुटुंबाची कटाक्षाने काळजी घ्यावी, यासाठी प्रत्येक शुक्रवारी विशेष प्रयत्न करण्याचे आवाहन करण्यात येऊन त्यानुरूप प्रयत्न करण्यात आले होते. आपल्या कर्मचार्‍यांनी कोरोनाकाळात आपली व आपल्याशी संबंधित इतरांची काळजी घेऊन कोरोनावर मात करण्यासाठी शुक्रवारी विशेष रजा ‘गोल्डमॅन’ व्यवस्थापनाने दिली.
 
 
‘गोदरेज प्रॉपर्टीज’ने कोरोनाकाळात कर्मचार्‍यांना प्रदीर्घ काळपर्यंत घरून काम करताना जो ताण-तणाव आला, त्याचा वैयक्तिक व कौटुंबिक स्वरूपात अपरिहार्य परिणाम झाला. कर्मचार्‍यांनी अशा आव्हानपर स्थितीतही आपले काम परिणामकारक पद्धतीने जारी ठेवावे, यासाठी ‘गोदरेज प्रॉपर्टीज’ व्यवस्थापनाने कर्मचार्‍यांसाठी कामादरम्यान मानसिक आराम हा अभिनव उपक्रम सुरू केला. या उपक्रमामध्ये कंपनीचे सुमारे दोन हजार कर्मचारी सक्रियपणे सहभागी झाले व त्याचे सकारात्मक परिणाम कर्मचारी-कंपनी या उभयस्तरांवर दिसून आले.
 
 
काही कंपन्यांनी ज्या कर्मचार्‍यांना कोरोनाची लागण झाली आहे, अथवा ज्यांच्यावर प्रदीर्घ काळासाठी उपचार सुरू होते, अशा कर्मचार्‍यांशी संवाद तर त्यांच्या कुटुंबाशी कायमस्वरूपी संपर्क ठेवला. यासाठी कंपनीत काम करणारे सहकारी व गरजेनुसार विशेष समुपदेशकांची मदत घेण्यात आली. याचे विशेष व सकारात्मक परिणामही दिसून आले. विशेषतः कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबाचे मनोबलही त्यामुळे वाढले. एका वेगळ्या नात्याची निर्मिती त्यानिमित्ताने झाली. या कंपन्यांनी त्यांच्या व्यवसायनीतीमध्ये कर्मचारी प्रथम या बाबीचा प्रकर्षाने परिचय करून दिला.
 
 
कंपन्यांच्या उच्च व्यवस्थापनाच्या मते कोरोना महामारी हे वैयक्तिक-व्यावसायिकच नव्हे, तर सामाजिक-राष्ट्रीय संकट ठरले. व्यावसायिक म्हणून नव्हे, तर एक समाज म्हणून सर्वांचीच यानिमित्ताने वैयक्तिक व सामूहिक स्वरूपात दीर्घकालीन परीक्षा ठरली. कंपनी आणि कर्मचारी हे व्यवसायातील महत्त्वपूर्ण घटक कठीण व आव्हानपर प्रसंगी परस्परांच्या गरजांपोटी काय करू शकतात व करू शकतात, याचा वस्तुपाठ सर्वांना मिळाला.
 
 
कोरोनाकाळात इतर समाज घटकांप्रमाणे कर्मचार्‍यांचेही मोठे आर्थिक नुकसान झाले. यामध्ये पगारकपातीपासून उशिरा पगार होण्यापर्यंतच्या अडचणींचा समावेश होता. कंपनी-कर्मचारी या उभयतांनी अधिकाधिक सामंजस्य-संयम व सहकार्यासह आपली भूमिका पार पाडल्याचे अनुभवास आले. प्रसंगी काही कंपन्यांनी तर गरजू कर्मचार्‍यांना तातडीने आर्थिक मदत केल्याचेही दिसून आले.
 
 
यासंदर्भात उदाहरणादाखल सांगायचे झाल्यास ‘सेल्स फोर्स इंडिया’ कंपनीने कंपनीतील कर्मचारी अथवा त्यांच्या कुटुंबातील कुणाला ‘कोविड’-बाधा झाल्यास एकरकमी १५ हजार रुपयांचे अर्थसाहाय्य स्वतःच्या पुढाकाराने दिले. याशिवाय कंपनीने कर्मचार्‍यांना कोरोना उपचारांसाठी सहा आठवड्यांची विशेष रजा दिली. कंपनीचा हा पुढाकार तेथील कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबासाठी मोठाच आधार ठरला.
 
 
‘बजाज अलायन्स लाईफ इन्शुरन्स’ कंपनीने कोरोना झालेल्या कर्मचार्‍यांना त्यांच्या घरगुती उपचारापोटी त्यांच्या वैद्यक सेवा धोरणांतर्गत तातडीने २० हजार रुपयांची विशेष राशी देऊ केली. याशिवाय रुग्णालयात दाखल झालेल्या कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांचे दावे कंपनीने प्राधान्य तत्त्वावर निकाली काढले. या छोट्या फायद्यांचा मोठा लाभ यानिमित्ताने गरजूंना मिळाला हे विशेष.
 
 
आर्थिक सेवा-व्यवस्थापन व मानांकन संदर्भात विशेष व महत्त्वाची कामगिरी बजावणार्‍या ‘क्रिसिल’ या कंपनीने कोरोनाकाळात आपल्या कर्मचार्‍यांसाठी विशेष आर्थिक तरतूद म्हणून आगामी वार्षिक बोनसपैकी अर्धी रक्कम व त्याशिवाय सहा महिने पगाराएवढी अग्रीम रक्कम देऊन कोरोनापीडित कर्मचारी आणि त्यांच्या गरजू कुटुंबीयांना मोठा हातभार लावला. याशिवाय ज्या ‘क्रिसिल’ कर्मचार्‍यांना कोरोनाविषयक उपचार घ्यावे लागले. त्यांच्या वैद्यकीय उपचारांचा खर्चही व्यवस्थापनाने केला होता.
 
 
अन्य काही उल्लेखनीय बाबी म्हणजे, ‘सनलाईफ’ कंपनीने आपल्या सर्व कर्मचार्‍यांना त्यांच्या कोरोनाकाळातील महत्त्वाच्या गरजांपोटी प्रत्येकी दहा हजार रुपये उपलब्ध करून दिले. ‘टार्गेट इंडिया’ कंपनीने कोरोना झालेल्या कर्मचार्‍यांना विशेष उपचार रजा, घरच्यांच्या उपचारासाठी विशेष रजा व सल्ला-मार्गदर्शन पुरविले.
 
 
‘आयबीएम’ने आपले कोरोनाग्रस्त कर्मचारी व त्यांच्या कुटुंबासाठी उपचार आणि इतर खर्चापोटी पाच लाख रुपयांच्या अतिरिक्त विमाराशीची तरतूद केली आहे, तर ‘अ‍ॅक्सेंच्युअर’तर्फे कोरोना उपचारादरम्यान गरजेनुरूप ‘प्लाझ्मा’दात्यांची वेळेत व गरजेनुरूप उपलब्धता करून देण्याचे महनीय काम केले आहे. या उपक्रमाचा मोठा फायदा कंपनीच्या गरजू कर्मचार्‍यांना अर्थातच झाला आहे.
 
 
व्यवस्थापक आणि व्यवस्थापन स्तरावर प्रत्यक्षाप्रत्यक्ष संदर्भात व आर्थिक-प्रशासकीय स्वरूपात कोरोनाग्रस्त कर्मचार्‍यांची साथ देणार्‍या कंपन्यांप्रमाणेच त्यातील मुख्याधिकारी वा तत्सम उच्चपदस्थांनीही आपली जबाबदारी विशेष कर्तव्यासह पार पाडल्याची उदाहरणेही कोरोनादरम्यान दिसून आली.
 
 
यामध्ये व्यवस्थापन प्रतिनिधींनी कोरोनापीडित कर्मचार्‍यांशी संपर्क-संवाद साधून त्यांचे मनोधैर्य कायम राखणे, त्यांच्या कुटुंबीयांना गरजेनुरूप मदत करणे. यासारखी कामे तर अनेक कंपनी अधिकार्‍यांनी केली. मात्र, त्यातही विशेष म्हणजे काही कंपन्यांच्या मुख्याधिकार्‍यांनी कोरोनाचा प्रकोप तीव्र स्वरूपात असताना आपल्या कर्मचार्‍यांना कोरोना रुग्णालयात प्रवेश मिळण्यापासून त्यांच्यावरील उपचार, आवश्यक ती औषधे वेळेत उपलब्ध करून देण्यासाठी रुग्णालय अधिकार्‍यांपासून शासकीय अधिकारी व प्रसंगी पुढारी-मंत्र्यांपर्यंत संपर्क साधला. यातून कोरोनाग्रस्त कर्मचार्‍यांची निकड तर भागलीच. पण, कंपनी-कर्मचारी व्यवस्थापनादरम्यानच्या संबंधांनाही नवा आयाम त्याद्वारे मिळाला.
 
 
- दत्तात्रय आंबुलकर
(लेखक एचआर व्यवस्थापक आणि सल्लागार आहेत.)