‘ब्लॅक लाईव्हज मॅटर’चे थोतांड भारतातही?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Aug-2021   
Total Views |

Bangalore_1  H
 
जोएल शिंदानी मालू याचा व्हिसा २०१५ साली संपला होता. अनधिकृतरीत्या तो परदेशात राहत होता. तो अमली पदार्थांच्या धंद्यात आहे, असे पोलिसांना कळाले. त्यांनी १ ऑगस्ट रोजी रात्री २.३० वाजता जोएल याला रंगेहाथ पकडले. त्याच्याकडे पाच ग्रॅम ‘एमडीएम’ मिळाले. पोलिसांनी पकडल्यावर त्याच्या छातीत दुखू लागले. त्याला दवाखान्यात नेण्यात आले. तिथे त्याचा मृत्यू झाला. त्याचा मृत्यू झाला म्हणून त्याच्या देशातले त्याचे बांधव (जे आता परदेशात त्याच्या सोबत आहेत) असे २० जण एकत्र आले. त्यांनी पोलीस स्टेशनसमोर पदपथावर ठिय्या मांडला. आपल्या गाड्या पोलीस स्टेशनच्या आवारात आणल्या, तिथे कर्कश आवाजात तिरस्कार दर्शवणारे संगीत वाजवले. ‘ब्लॅक लाईव्हज मॅटर’ अशा घोषणा दिल्या. आम्ही ‘ब्लॅक’ आहोत म्हणून आमच्यावर अत्याचार होतोय, असे म्हणत रडणे-ओरडणे, गोंगाट कायम ठेवला. तीन-चार तास चालणार्‍या त्यांच्या या दंग्याला रोखण्यासाठी मग पोलिसांनी कारवाई सुरू केली. त्यांनी लाठीचार्ज सुरू केला. तर त्या २० जणांपैकी पाच जण आक्रमक होत प्रतिहल्ला करू लागले. त्यांना पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना कुठे घडली आहे? अमेरिका? लंडन? फ्रान्स? ऑस्ट्रेलिया? नाही, ही घटना घडली आहे भारतातल्या बंगळुरूमध्ये. तिथे २०१५पासून अनधिकृतरीत्या राहणार्‍या व्हिसा संपलेल्या आफ्रिकेतील कांगो देशाच्या नागरिकाला भारतीय पोलिसांनी पकडले. व्हिसा संपलेला असूनही भारतात हक्काने राहणे हा गुन्हा त्याच्याविरोधात होता. मात्र, कारवाई करताना त्याच्याकडे अमली पदार्थही मिळाले. त्यावर कांगोच्या या २० लोकांनी भारताच्या पोलीस चौकीसमोर ‘ब्लॅक लाईव्हज मॅटर’च्या घोषणा दिल्या. आता प्रश्न असा आहे की, जोएल अनधिकृतरीत्या भारतात राहिला होता, वर अमली पदार्थ विकत होता, हे सगळे गुन्हे जोएल केवळ ‘ब्लॅक’ आहे म्हणून माफ करायचे का? भारतात गंभीर गुन्हा करून त्यावर पांघरूण घालण्यासाठी देशाच्या कायदा सुव्यवस्थेवर खोटे प्रश्न उठवायचे, हे बरोबर आहे का? नाहीच.
 
 
 
अकाली मृत्यू वाईटच. पण, २६ वर्षीय जोएलचा काही खून झाला नव्हता किंवा अमेरिकेत ज्याप्रमाणे अश्वेतवर्णीयाचा गळा दाबून पोलीस स्टेशनमध्ये मारले, तसे जोएलला अश्वेतवर्णीय म्हणून कुणी मारले नव्हते. आता जोएल ज्या कांगो देशाचा आहे, तिथे भारतीयांवर हल्ले केले जात आहेत. भारतीयांची घरं, दुकानं आणि वाहनं यांची तोडफोड केली जात आहे. पण, दुसरीकडे काही वर्षांपूर्वी भारत म्हणजे रोहिंग्या, आफ्रिकी गुन्हेगारांना ‘आवो-जावो घर तुम्हारा’ होते. सध्या भारतात तसे नाही. भाजपच्या केंद्र सरकारने सुरक्षाप्रश्नाला प्राथमिकता दिली आहे. परदेशी नागरिकांच्या अवैध निवासाच्या कारवाईमध्येच बंगळुरूच्या या कांगो नागरिकांचे पितळ उघडे पडले. मात्र, आपली गुन्हेगारी लपून जावी, आपल्याला जागतिक स्तरावर पाठराखण मिळावी, यासाठी गुन्हेगारीच्या विळख्यात अडकलेल्या या कांगोच्या नागरिकांनी ‘ब्लॅक लाईव्हज मॅटर’चा आश्रय घेतला. आपण ‘ब्लॅक लाईव्हज मॅटर’ म्हटले की, भारतातील तथाकथित पुरोगामी-मानवतावादी थोडक्यात डावे, त्यांची डफली गँग आपल्यासोबत उभी राहील, असे यांना वाटले की काय कोण जाणे?
 
 
 
असो. भारतात असे काही लोक आहेतच की, जे भारतात राहतात, खातात, नावही कमावतात. मात्र, स्वप्न केवळ भारताला तोडण्याचे बघतात. ज्यावेळी अमेरिकेत ‘ब्लॅक लाईव्हज मॅटर’ सुरू होते. त्यावेळी भारतात हे समाजविघातक लोक भारतातील सामाजिकदृष्ट्या मागास समाजाला बळेच ‘ब्लॅक’ ठरवण्याचा प्रयत्न करत होते. इतकेच काय? या तुकडे तुकडे गँगचे अविचारवंत अशीही त्यांची स्वतःची स्वतःच ठरवलेली थेअरी मांडतात की, ‘दक्षिण भारत इतर भारतापेक्षा वेगळा आहे, कारण दक्षिण भारतीयांचा वर्ण हा जास्तच सावळा आहे.’ सावळ्या वर्णाला इतर भारतीयांपेक्षा वेगळा ठरवून क्वचित वर्णावर होणार्‍या टीका टिप्पणीला हे लोक ‘ब्लॅक लाईव्हज मॅटर’चा भाग बनवायचाही प्रयत्न करतात. मात्र, धार्मिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या एक असलेल्या भारतीयांना गोरे आणि काळ्याच्या भेदात कुणी लढवू शकत नाही. कारण, आमच्याकडे भगवान शंकर गोरा किंवा काळा नाही, तर प्रसंगी निळकंठही असतो. द्वारकेचा श्रीकृष्ण शामल सावळा आहे. भारतात काळा रामही अत्यंत भक्तिभावाने पूजतात, तशाच प्रकारे तिरुपती बालाजीही पूजतात. वर्णापेक्षा देशात श्रद्धा, स्नेहभाव महत्त्वाचा आहे. त्यामुळे ‘ब्लॅक लाईव्हज मॅटर’चे थोतांड या भारतात चालणार नाही, हे नक्की!
 
 
@@AUTHORINFO_V1@@