हिंदुत्वाचा ज्वालामुखी!

    12-Aug-2021
Total Views |

P bhave_1  H x
 
समर्थ लेखक, घणाघाती वक्ते, ध्येयवादी ज्वलंत पत्रकार, सत्त्वशील नाटककार, कथासम्राट, कादंबरीकार आणि हिंदू संस्कृतीचे-हिंदुत्वाचे कट्टर पुरस्कर्ते, ललित गद्य, व्यक्तिचित्र चिंतनात्मक लेख, चित्रपटकथाकार, मराठी साहित्यातील अष्टपैलू प्रतिभासंपन्न व्यक्तिमत्त्व अशा अनेक नात्यांनी ओळखल्या जाणार्‍या पुरुषोत्तम भास्कर भावे यांचा आज स्मृतिदिन. त्यानिमित्ताने...
 
 
 
‘कंटकांचे निर्दालन करावे’ हा तुकोबांचा उपदेश आपल्या लेखणीद्वारा आचरणात आणणारे, उच्च नीतीमूल्यांचा आदर्श प्राणपणाने जपणारे, ताठ कण्याचा, प्रेमळ मनाचा माणूस म्हणजे भावे अण्णा. जन्म धुळ्यातला, बालपण व शिक्षण नागपुरात गेले. ‘ओम फस’ नावाची कथा लिहून लेखनाचा त्यांनी श्रीगणेशा केला. अण्णांना वाचनाचे विलक्षण वेड. या वेडातूनच त्यांचा लेखणीचा आविष्कार फुलत गेला. ‘किर्लोस्कर’मध्ये जुलै १९३१ मध्ये ‘फुकट’ नावाची त्यांची कथा प्रकाशित झाली. मात्र, पु. भा यांच्या लेखणीची खरी प्रतिभा व चमक, तसेच शब्दातील सामर्थ्य हे त्यांच्या वृत्तपत्रीय लेखांतून प्रकट झालेले दिसते. नागपुरातून त्याकाळी प्रकाशित होणार्‍या ‘सावधान’ या हिंदुत्वनिष्ठ साप्ताहिकातून त्यांचे लेख प्रसिद्ध होऊ लागले. या लेखांतून व्यक्त होणार्‍या शब्दतेजाने व वाक्य सौंदर्याने वाचकवर्ग मंत्रमुग्ध होत असे. हा या लेखाच्या शब्दवाहीकर्त्याचा स्वानुभव आहे. ‘सोबत’कार ग. वा. बेहेर म्हणतात, “एकदा पुरुषोत्तम भास्करांची लागण झाली, तर वाचकास दुरुस्त करणे कठीण.” पत्रकारितेच्या प्रारंभापासून हिंदुत्वाचे निशाण खांद्यावर घेतलेल्या अण्णांनी अगदी शेवटपर्यंत खांदे फाटले तरी ते निशाण ठेवले नाही. गांधीवधोत्तर हिंदुत्वाला तद्ववतच हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांवर वाईट दिवस आले होते. पण, त्याही दिवसांत ताठ मानेने व हिंदुत्वाचे इमान राखत स्वाभिमानाने जगलेल्या अशा थोड्या माणसांपैकी या भावे अण्णांचे नाव अग्रक्रमानेच घ्यावे लागले. भावेंची लेखणी म्हणजे परत्वाचा स्पर्श झालेली होती, त्यात उत्कटता, भव्यता, सूक्ष्मता, काव्यात्मकता, सामर्थ्य, सखोलता, सौंदर्य हे तर खास होतेच. मात्र, याबरोबर ही साहित्यातील कोणत्याही रसास परमोत्कर्षाला नेण्याची दुर्मीळ अशी किमया त्यांनी साधली होती. मग तो करुणरस, वीररस असो वा हास्यरस असो. भावेंची लेखनशैली म्हणजे शि. म. परांजपे, तसेच अच्युतराव कोल्हटकर या दोन प्रसिद्ध शैलीकार साहित्यिकांच्या लेखनगुणांचे मनोज्ञरसायन भावेंच्या शैलीतून प्रगट झाले. भावे अण्णांचे प्रेरणास्थान व श्रद्धस्थान हिंदू संघटक स्वातंत्र्यवीर सावरकर हे होते, तसेच ते त्यांचे आराध्य दैवतही होते. काही काळ ‘हिंदू महासभा’ या राजकीय पक्षाचे ते सक्रिय कार्यकर्तेही होते. हिंदूहितविरोधी आचार-विचार हे त्यांच्या टीकेचे लक्ष्य होते.
 
 
 
भावेंचा वैचारिक वारसा स्वा. सावरकरांच्या विचारसरणीवर आधारलेला आढळून येतो. त्यांच्या या स्फूर्तिस्थानावर अत्यंत खालच्या पातळीवर टीका करणार्‍या अत्रेंवर ‘आदेश विरुद्ध अत्रे’ या लेखसंग्रहाच्या प्रस्तावनेत भावे म्हणतात, “हिंदू महासभा व वीर सावरकर प्रामाणिक टीकेचे विषय आवश्य होऊ शकतील. पण, ती टीका तरी प्रमाणिक पाहिजे.”(आदेश वि.अत्रे १३) हा लेख संग्रह १९८९ मध्ये प्रकाशित झाला. व्यक्ती ही कधीही राष्ट्रापेक्षा मोठी नसते. मात्र, व्यक्तीच्या कर्तृत्वाने राष्ट्र मोठे होते, गौरव वाढतो तेथे त्या व्यक्तीला पूजनीय मानायलाच हवे. मात्र, राष्ट्रहानीला कारणीभूत असणारी व्यक्ती ती कितीही मोठी असो, तिचे मोठेपण मातीमोलच.
 
 
 
त्यामुळेच त्यांच्या निबंध-वाङ्मयातून तथाकथित पुरोगामीपणावर वारंवार टीका आढळते. पुरोगाम्यांसाठी अण्णांचे खास शब्द म्हणजे ‘रक्तपिती’, ‘पापास्थान’ ही त्यांची शब्दयोजना. भावे अण्णांना स्वा. सावरकरांची राजकीय मते मान्य होती. मात्र, सामाजिक मतांबाबत थोडी भिन्न मते होती या शब्दप्रभूंची. परखड परंतु तर्कशुद्ध, चिंतनशील; पण भावना उचंबळून आणणारे असे त्यांचे शब्द होते, हे त्यांच्या साहित्याचे वैशिष्ट्य आहे. भावेंनी मैत्रीत तत्त्व आणली नाहीत. ‘गदिमा’ असो वा गोविंदराव तळवलकर असो, मित्र म्हणून ते १०० नंबरी सोने होते. युद्धाच्या जागी युद्ध व प्रेमाच्या जागी प्रेम करीत. या शिवाय दुसरी जागा त्यांनी निर्माण केली नाही.
 
 
 
भावे यांना विलक्षण कल्पनाशक्तीवर भाषेची असामान्य देणगी मिळाली. ‘चोर बाजार’सारखी विनोदी कादंबरी, ‘आईस्क्रीम’सारखे विनोदी कथालेखन, ‘वर्षाव’, ‘अकुलिना’, ‘अंतराळ’ व ‘पिंजरा’ यांसारख्या उत्तमोत्तम कादंबर्‍यांचे लिखाण, ‘विषकन्या’, ‘स्वामिनी’, ‘महाराणी पद्मावती’ व ‘सौभाग्यवती’ यांसारखी नाटके त्यांनी लिहिली. ‘उत्तर दिग्विजय’ व ‘चितोडयात्रा’ यांसारखी रसाळ प्रवासवर्णने लिहिलीत, तसेच ‘साडी’, ‘आमच्या माँसाहेब’, ‘सतरावे वर्ष’, ‘माझी होशील का’ यांसारख्या कथा लिहिल्या, तर ‘ओजस्वी’ व ‘तर्कप्रखर’ असे निबंध लिहिले. त्यात ‘परमेश्वरा आम्ही तुला विसरलो’, ‘सहदेवा थोडा अग्नी आण’, ‘आम्ही आता द्वेष करू’, ‘हिंदुस्थान शांत आहे’, असे घणाघाती लेख लिहिणारे भावे यांचा ‘रक्त आणि अश्रू’ हा लेखसंग्रह विशेष गाजला. स्वा. सावरकर म्हणत, “पाषाणालाही पाझर फुटेल असे लेखन करणारा हा साहित्य पुरुषोत्तम.” त्यांच्या लेखणीचे एक टोक होते भवानी तलवारीचे, तर दुसरे टोक होते हळुवार तरलस्पर्शी मोरपिसाचे, यानुसार त्यांनी ‘वाघनखे’ या आपल्या गाजलेल्या लेखसंग्रहात नेहरूंवर दोन लेख लिहिलेत, ‘नेहरू-चाचा यक्षप्रश्न?’ व ‘चाचा नेहरूंचे च्याऊ म्याऊ’ व ‘नेहरूंनंतर कोण? मी’ असे निबंध लिहिले. जिज्ञासूंनी आवश्य वाचावे. भारतीय अस्मिता व राष्ट्रहितास जी विचारसरणी मारक त्या विचारसणीचा प्रखर विरोध झालाच पाहिजे, असे त्यांचे मत होते. हिंदूंनी हिंदुत्ववादी असावे, असे त्यांना वाटत असे. म्हणून महात्मा गांधीजींच्या विचारांचा त्यांना विलक्षण तिटकारा होता. ‘गांधीवादाने व गांधीग्रस्त संस्थेने आमच्या देशाचे जीवन गढूळ केले,’ असे त्यांचे स्पष्ट मत होते. साम्यवादी व पुरोगामी हिंदू नेते मंडळींवरही त्यांनी टीका केली. ‘हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व’ हेच त्यांचे स्पष्ट मत होते. हिंदूंमधील प्रतिकार अक्षमतेचा, विसंघटितपणाचा, धर्मग्लानीचा आणि हिंदू समाजाला क्षीणत्व आणणार्‍या सर्व दुर्गुणांचा नाश होवो. (रक्त आणि अश्रू) या लेख संग्रहात ते म्हणतात. ‘वाघनखे’, ‘सर्वनाश’, ‘रांगोळी’, ‘हिंदुत्वाचा जयजयकार’ या लेखसंग्रहाद्वारे त्यांनी त्यांची हिंदुत्वादी मते प्रखरतेने मांडली. भावे म्हणजे वादळी व्यक्तिमत्त्व होते. रागाचे-लोभाचे मोजमाप नव्हते. फुले देतील तेही ओंजळी भरून, मित्राच्या कपड्यास एवढे अत्तर लावतील की बाटलीच संपणार, असे वाटते. बालगंधर्व, सेहेगल हे त्यांचे आवडते गायक. सेहेगलच्या ‘देवदास’ने त्यांना इतके वेड लावले की, पाऊणशेपेक्षा जास्त वेळा चित्रपट पाहिला होता. ते मैत्रीचे पक्के व भोक्ते होते. ‘इतिहास पुराणे व साहित्यिक’ या लेखात त्यांनी अनंत महाराज आठवले यांच्या ‘महाभारताचे वास्तव दर्शन’ या ग्रंथाबद्दल अनुकूल मत व्यक्त केले आहे. सामान्यतः साहित्यिक हा सरस्वतीचा उपासक असतो. पण, सरस्वतीलाच दुर्गावतार करण्याची प्रतिभा ही विष्णुशास्त्री चिपळूणकर, शिवरामपंत परांजपे, स्वा. सावरकर आणि भावे यांंनी ही किमया करून दाखवली आणि ‘लेखण्यांच्या बंदुकी करा’ हा स्वातंत्र्यवीरांचा संदेशमंत्र भावे अण्णांनी प्रत्यक्षात आणला.
 
 
अशा प्रतिभावंत हिंदुत्ववादी लेखकास व पत्रकारास, साहित्यिकास नाटककारास स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन करून लेखास विराम देतो.
 
 

- योगेश काटे