तालिबान आणि सावध चीन!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Aug-2021   
Total Views |

China_1  H x W:
 
 
अफगाणिस्तानमधून अमेरिकी सैन्य आता बाहेर निघत आहे. दीर्घकाळपासून सैनिकी शक्तीच्या जोरावर अफगाणिस्तानमध्ये परिवर्तन घडविण्याचा अमेरिकेचा प्रयोग पूर्णपणे फसला आहे. ज्या तालिबानविरोधात अमेरिकेने अफगाणिस्तानमध्ये सैन्य उतरविले होते, अखेरीस त्यांच्याच हाती अफगाणिस्तान सोपवविण्याची वेळ अमेरिकेवर येताना दिसते. आशिया खंडामध्ये भूराजकीयदृष्ट्या अतिशय महत्त्वाचे स्थान असलेल्या अफगाणिस्तानमध्ये आता पुन्हा तालिबानी अराजकाने वेग घेतला आहे. त्यामुळे अफगाणिस्तानला तालिबानच्या कब्जात जाण्यापासून रोखणे, ही सध्या जगापुढील सर्वात मोठी डोकेदुखी ठरली आहे. या सर्व प्रक्रियेमध्ये अमेरिका, रशिया, भारत आणि अर्थातच चीन या सर्वांची भूमिका अतिशय महत्त्वाची ठरणार आहे.
 
 
चीनने अद्याप अफगाणिस्तान आणि तालिबानविषयी आपले नेमके धोरण जाहीर केलेले नाही. मात्र, आशियात चीनच्या विस्तारवादी धोरणाला अतिशय पोषक वातावरण अस्वस्थ अफगाणिस्तानच्या रूपाने लाभू शकते. त्यामुळे अफगाणिस्तानविषयी चीन अतिशय सावकाशपणे आपले पत्ते उघड करणार यात शंका नाही. त्यामुळे भारतालादेखील अफगाणिस्तानविषयी आपले धोरण ठरविताना चीनचा विचार प्राधान्याने करावा लागणार आहे.
 
 
तालिबानी शिष्टमंडळ नुकतेच मुल्ला अब्दुल गनी बरादर याच्या नेतृत्वाखाली चीनच्या दौर्‍यावर आले होते. तिआनजिन या शहरात चीनचे परराष्ट्रमंत्री वँग यी यांनी त्यांच्याशी चर्चा केली. ही चर्चा सकारात्मक झाल्याचे दोन्ही बाजूंकडून सांगण्यातही आले. अमेरिका अफगाणिस्तानातून काढता पाय घेत असताना, चीनने तालिबानी शिष्टमंडळाशी चर्चा करणे म्हणजे अफगाणिस्तानात असलेली संधी आणि तेथे असलेला धोका, या दोन्हींबाबतीत संतुलन साधण्याचा प्रयत्न चीन करत असल्याचा संदेश त्यातून देण्याचा प्रयत्न आहे. यापूर्वीही तालिबानी नेत्यांनी चीनला भेट दिली होती आणि चीननेही तालिबानच्या दोहा येथील कार्यालयाशी नियमितपणे संवाद आणि संपर्क साधण्यास सुरुवात केली आहे. तरीही आताच्या परिस्थितीत तालिबानी नेत्यांनी चीनचा केलेला दौरा अधिक महत्त्वाचा ठरतो.
 
 
चीनने साधारणपणे २०१८-१९ पासून दोहामार्फतच तालिबानशी व्यवहार करण्याला, प्राधान्य दिल्याचे सांगितले जाते. परंतु, पाकिस्तानातील दुसा प्रांतात झालेल्या दहशतवादी हल्ल्यात चिनी कर्मचारी ठार झाल्यानंतर चीनने आपला पवित्रा बदलला. पाकिस्तानात झालेल्या हल्ल्यासाठी चिनी प्रसारमाध्यमांनी ‘तहरिक-ई-तालिबान पाकिस्तान’ (टीटीपी) आणि ‘ईस्ट तुर्कस्तान इस्लामिक मूव्हमेंट’ (ईटीआयएम) या दहशतवादी संघटनांना जबाबदार धरले होते. दहशतवादी हल्ल्याच्या घटनेनंतर पाकिस्तानने तातडीने आपले परराष्ट्रमंत्री आणि ‘आयएसआय’ या गुप्तचर संस्थेचे प्रमुख यांना बीजिंगला पाठवले होते. पाकिस्तानातील घटनेमुळे नाराज झालेल्या चिनी नेतृत्वाची विनवणी पाकिस्तानला करावी लागली. पाक परराष्ट्रमंत्री आणि ‘आयएसआय’ प्रमुख यांच्या या चीनभेटीनंतर लगेचच तालिबानी नेत्यांनी चीनच्या दौर्‍यावर जाणे हा निव्वळ योगायोग नाहीच. ‘ईटीआयएम’ या दहशतवादी संघटनेला पाकिस्तानातच नव्हे, तर अफगाणिस्तानातही हातपाय पसरवण्यासाठी वाव मिळू नये, यासाठी चीनचे प्रयत्न सुरू आहेत.
 
 
 
अफगाणिस्तानात महत्त्वाची भूमिका पार पाडण्याच्या विचारात चिनी नेतृत्व आहे. अमेरिकेच्या अनुपस्थितीमुळे या क्षेत्रात निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी चीन उत्सुक असून, त्यासाठी पाकिस्तानला मोहरा म्हणून वापरले जाण्याची शक्यता सर्वाधिक आहे. विशेष म्हणजे, असे चीनकडून अशाप्रकारे वापरले जाण्यात पाकचीही हरकत असणार नाही. कारण, काहीही करून भारताला अफगाणिस्तानमध्ये महत्त्वाचे स्थान प्राप्त करण्यापासून रोखणे हा पाकचा एकमेव अजेंडा आहे. त्यामुळे चीन हा पाकिस्तानचा वापर करून अफगाणिस्तानात महत्त्वाची भूमिका बजाविण्याचा विचार करू शकतो.
 
 
 
अफगाणिस्तानात नेमके काय, कसे आणि केव्हा करायचे, याचा पूर्ण आराखडा चीनकडे तयार असला तरी अजूनही चीन आपले पत्ते उघड करण्यास राजी नाही. कारण, अफगाणिस्तानात आतापर्यंत अमेरिका आणि रशिया या दोन्ही आजी-माजी महासत्तांनी स्वत:चे वर्चस्व स्थापित करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्यास म्हणावे तसे यश आले नाही. अफगाणिस्तानचा टोळीयुद्धाचा हिंस्र इतिहास, तेथील अवघड भूगोल आणि इतर देशांशी असलेले अफगाणिस्तानचे संबंध या सर्व परिप्रेक्ष्यातूनच चीनला अतिशय सावधतेने धोरण आखावे लागणार आहे. कारण, त्यात अल्पशीही चूक झाल्यास ती गळ्याशी येऊ शकते.
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@