टोकियो : अखेर ९ दिवसांनंतर भारताचा पदकाचा दुष्काळ संपला आहे. मीराबाई चानूच्या रौप्य पदकानंतर आता पी. व्ही. सिंधूने भारताला दुसरे पदक जिंकून दिले आहे. बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूला यावेळी कांस्य पदक मिळवले आहे. तिने चीनच्या बिंग जियाओचा दोन सरळ सेटमध्ये २१-१३, २१-१५ने पराभव केला. पी.व्ही सिंधू लागोपाठ दोन ऑलिम्पिकमध्ये मेडल जिंकणारी पहिली भारतीय महिला, तसेच दुसरी भारतीय खेळाडू ठरली आहे. याआधी सुशील कुमारने बीजिंग ऑलिम्पिकमध्ये २००८ साली कांस्य पदक आणि लंडन ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकले होते. सिंधूने याआधी रियो ऑलिम्पिकमध्ये २०१६ साली रौप्य पदक जिंकले होते.
या सामन्याआधी सिंधूने सुवर्ण पदक गमावले होते. शनिवारी झालेल्या सामन्यामध्ये सिंधूचा चीनच्या ताई झू यिंगने सिंधूचा १८-२१,१२ - २१ असा पराभव केला, त्यामुळे तिचे सुवर्ण पदक जिंकण्याचे स्वप्न भंगले होते. मात्र, या पायाशाला झुगारून तिने आक्रमक खेळ केला. सिंधूने या स्पर्धेतील सुरुवातीच्या ४ सामन्यांमध्ये आक्रमक खेळ केला होता. तिने जपानच्या अकाने यामागूचीचा २१-१३, २२-२० असा सरळ सेटमध्ये पराभव केला होता. त्यानंतर उपांत्य फेरीमध्येही सिंधूकडून याच प्रकारच्या खेळाची अपेक्षा होती. मात्र उपांत्य फेरीमध्ये अनुभवी ताई झूने तिचा पराभव केला.