मिशन ऑलिम्पिक : ...पण उम्मीद कायम आहे! बचेंगे तो और भी लडेंगे...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Aug-2021   
Total Views |

PV Sindhu_1  H
टोकियो (संदीप चव्हाण) : ‘जाकुनिकु क्योशोकु’ सिंधूची मॅच संपल्यानंतर जापनिज पत्रकाराची ही प्रतिक्रिया पुरेशी बोलकी होती. जपानी भाषेत याचा अर्थ होतो, ‘दुबळे झालात तर ताकदवानांचे भक्ष्य बनाल.’ भारताच्या पी. व्ही. सिंधूची आज ‘टोकियो ऑलिम्पिक’च्या ‘सेमी फायनल’मध्ये काहीशी अशीच अवस्था झाली होती. द्वितीय मानांकित चायनिज तैपेईच्या ताई झु यिंगने सहाव्या मानांकित पी. व्ही. सिंधूचा फडशा पाडला. लक्षात घ्या जपानमधील सर्वाधिक वेगवान बुलेट ट्रेनचा वेग आहे ३२० किलो मीटर प्रतितास. आज यिंगने ३५८ किलोमीटर प्रतितासाने ‘क्रॉसकोर्ट स्मॅश’ मारलेत. यावरून यिंगच्या ताकदवान खेळाचा अंदाज येऊ शकतो. काल जपानच्या यामागुचीला भक्ष्य करीत सिंधू ‘सेमी फायनल’मध्ये धडकली होती. आज ती तिच्यापेक्षा ताकदवान खेळाडूची भक्ष्य झाली होती. चायनिज तैपेई आणि चायनिज खेळाडूंच्या याच ताकदी खेळावर त्या जपानी पत्रकाराची प्रतिक्रिया म्हणूनच मार्मिक होती. आतापर्यंत स्पर्धेतील महिला एकेरी, पुरुष दुहेरी आणि मिश्र दुहेरीत फक्त चीन आणि आणि चायनिज तैपेईचे खेळाडूच पोहोचले आहेत.
 
 
 
यिंगने आज सरळ दोन गेममध्ये सिंधूचा पराभव केला. पण, सिंधूने पहिल्या गेममध्ये कडवी झुंज दिली खरी. ११-८ अशी तीन गुणांची आघाडी तिने घेतली होती. पण, यिंगने आपल्या कमालीच्या ‘ड्रॉप शॉट’वर आणि ताकदवान स्मॅशने सिंधूला निष्प्रभ केले. या मॅचसहित आजवर दोघी एकूण १९ वेळा आमने-सामने आल्या आहेत. त्यात तब्बल १४ वेळा यिंगने बाजी मारली आहे. अर्थात पी. व्ही. सिंधूला ‘टोकियो ऑलिम्पिक’मध्ये अजूनही मेडलची अपेक्षा आहे. ‘ब्राँझ मेडल’साठी सिंधूची आठवी मानांकित चीनच्या बिंगजिआओशी लढत होईल. येथेही बिंगजिआओचे पारडे थोडेसे जड आहे. आजवर दोघी एकूण १५ वेळा आमने-सामने आल्या आहेत. त्यात नऊ वेळा बिंगजिआओने बाजी मारली आहे. असे असले तरी सिंधूची जमेची बाजू म्हणजे ‘रिओ ऑलिम्पिक’मध्ये तिने ‘रौप्य पदक’ जिंकले आहे. तर बिंगजिआओचे हे पहिलेच ‘ऑलिम्पिक’ आहे. बिंगजिआओ आज दडपणाखालीच तिच्याच देशाच्या अग्रमानांकित चेन यु फेईकडून पराभूत झालीय. त्यामुळे बिंगजिआओवरील दडपणाचा फायदा सिंधू कसा उठवते, यावर भारताच्या ‘ब्राँझ मेडल’चे भवितव्य असेल.
 
 
 
थाळीफेकीतील पात्रता फेरीत भारताच्या कमलप्रीत कौरने कमाल केलीय. तिने दुसर्‍या क्रमांकाची नोंद करीत अंतिम १२ खेळाडूत स्थान मिळवलेय. एकूण ३१ खेळाडूंतून जे ६४ मीटर पार थाळी फेक करू शकतात, त्यांना थेट प्रवेश मिळतो आणि त्यानंतर सर्वोत्तम कामगिरीच्या जोरावर एकूण १२ खेळाडू अंतिम फेरीसाठी पात्र ठरतात. कमलप्रीतने आज ६४ मीटरची थाळीफेक केली. अमेरिकेच्या आलमने ६६.४२ मीटर दूर थाळीफेक केली. गंमत पाहा, क्रोएशियाची सँड्रा पेरकोव्हा ही कमलप्रीतची या खेळातील दैवत. पेरकोव्हानं लंडन आणि ‘रिओ ऑलिम्पिक’मध्ये थाळीफेकीत सुवर्ण पदक जिंकलेय. पेरकोव्हाला आज जेमतेम ६३.७५ मीटरची थाळीफेक करता आली. आपल्या दैवतापेक्षा जास्त चांगली कामगिरी करता आली, याचा आनंद तिच्या चेहर्‍यावर सहज वाचता येत होता. वीरेंद्र पुनीया हे कमलप्रीतचे कोच. ‘लंडन ऑलिम्पिक’ गाजवणार्‍या कृष्णा पुनीयाचे ते पती आणि कोच होते. कृष्णाने ‘लंडन ऑलिम्पिक’च्या अंतिम फेरीत ६३.७५ मीटर थाळीफेक करीत सहावे स्थान पटाकावले होते. भारताची ‘ऑलिम्पिक’मधील आजवरची थाळीफेकीतील ही सर्वोत्तम कामगिरी आहे. कमलप्रीतने पात्र फेरीतच हा विक्रम पार केलाय. नुकतेच जूनमध्ये कमलप्रीतने ६६.५९ मीटर दूर थाळीफेक करीत नव्या राष्ट्रीय विक्रमाची नोंद केली होती. वीरेंद्र पुनीयांचा दावा आहे की, या राष्ट्रीय विक्रमाची जरी तिने पुनरावृत्ती केली, तरी ती या ‘ऑलिम्पिक’मध्ये पदकाची दावेदार ठरू शकते.
 
 
भारतीय महिला हॉकी संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध संघर्षपूर्ण विजय मिळवत ‘क्वॉर्टर फायनल’ गाठलीय. भारताला ‘अ’ गटात चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले, त्यामुळे आता ‘क्वॉर्टर फायनल’मध्ये भारतीय महिलांना ‘ब’ गटातील पहिल्या क्रमांकावरील ऑस्ट्रेलियाशी झुंजावे लागेल. बलाढ्य ऑस्ट्रेलियानं ‘ब’ गटातील आपले पाचही सामने जिंकलेत. त्यामुळे भारतीय महिला हॉकीपटूंपुढे कडवे आव्हान असेल.
 
 
तिरंदाजीत पुन्हा एकदा भारतीय तिरंदाजांचा नेम चुकला. अतनु दासलाही ‘क्वॉर्टर फायनल’मध्ये पराभव पत्कारावा लागला. अतुनची पत्नी आणि जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमवारीत असणार्‍या दीपिका कुमारीलाही ‘क्वार्टर फायनल’मध्येच पराभव पत्कारावा लागला. तिरंदाजीतील भारताचे आव्हान आता संपुष्टात आले आहे. त्यामुळे ‘क्वॉर्टर फायनल’पर्यंतची धडक हीच काय ती भारतीय तिरंदाजांची या ‘टोकियो ऑलिम्पिक’मधील कामगिरी ठरली.
 
 
‘बॉक्सिंग’मध्ये पुरुष विभागात अमित पांगल पराभूत झाला, तर महिलांच्या विभागात पूजा राणीला ‘क्वॉर्टर फायनल’मध्ये पराभव पत्कारावा लागला. रिओमधील ‘ब्राँझ मेडल’ जिंकणारी खेळाडू चीनची ली कुआने तिला पराभूत केले. आजची मॅच जर ती जिंकली असती तर लोवलीनाप्रमाणे तिचंही पदक नक्की झाला असतं. आशा-अपेक्षांच्या हिंदोळ्यावर कमलप्रीतचा अपवाद वगळता भारताच्या वाटेस आज फारसं काही हाती लागलं नाही. पण, उम्मीद कायम आहे...
मिर्झा गालिब म्हणतो तेच खरे...
 
 
हजारों ख्वाहिशे ऐसी कि हर ख्वाहिश पे दम निकले
बहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले
@@AUTHORINFO_V1@@