मुंबई : देशभरामध्ये कोरोनाचा प्रभाव असताना सर्व सिनेमागृह बंद आहेत. अशामध्ये प्रेक्षकांमध्ये ओटीटीची क्रेझ सुरु झाली. यामध्ये आंतरराष्ट्रीय ओटीटी नेटफ्लिक्स, अॅमेझॉन प्राईम व्हिडियो, डिस्नी प्लस हॉटस्टार यांना मोठी पसंती सुरुवातीला मिळाली होती. मात्र, त्यानंतर सोनी लिव, वुट यांनी काही असा कंटेंट आणला की तिकडेही प्रेक्षकांची मने वळली. मात्र, आता प्रादेशिक ओटीटीलादेखील प्रेक्षक तेवढेच पसंत करत असल्याचे चित्र दिसून येत आहे. तमिळ, तेलगु, मलयालम तसेच आता मराठी भाषेतील ओटीटी प्लॅटफॉर्म प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहेत.
मराठीमध्ये नुकतचे आलेला ओटीटी प्लॅटफॉर्म म्हणजे 'प्लॅनेट मराठी'. यामध्ये प्रेक्षकांच्या पसंतीनुसार कंटेंट पाहण्याची सोय इथे असल्याने मराठी प्रेक्षांकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. एका वृत्तपत्राला मुलाखत देताना 'प्लॅनेट मराठी'चे संस्थापक अक्षय बर्दापुरकर यांनी सांगितले की, "देशामध्ये मराठी भाषेचा तिसरा क्रमाक लागतो. अंदाजे ३० कोटी लोकं मराठी भाषा बोलतात. असा आपण गृहीत धरू की आपण २ कोटी लोकं आहेत ज्यांच्याकडे नेट कनेक्टिविटी आहे. वर्षभरात ३६५ रुपयेचा प्लान आहे असे पकडले तर वर्षभरात ७२० कोटींचा सबस्क्रिप्शन महसूल मिळेल. राधे हा चित्रपट पाहण्यासाठी आपल्याला एका वेळेस २४९ रुपये द्यावे लागले होते. मात्र, आपला मराठी कंटेंट पाहण्यासाठी प्रति व्यू फक्त ५० रुपये मोजावे लागतात. यामुळे मराठी ओटीटी किंवा इतर प्रादेशिक ओटीटी प्लॅटफॉर्म्सला मोठा फायदा होऊ शकतो."
देशामध्ये प्रादेशिक भाषांची चलती पाहता आता मोठमोठे ओटीटी प्लॅटफॉर्म्स प्रादेशिक भाषांमध्ये आपला कंटेंट देऊ लागले आहेत. असे असतानाही बंगाली भाषेतील 'होयचोई', गुजरातीतील 'ओहो गुजराती', तेलुगुमधील 'आहा' असे अनेक ओटीटी प्लॅटफॉर्म्सना गेल्या काही महिन्यांमध्ये चांगला प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे अशावेळी बहुराष्ट्रीय अशा ओटीटीच्या प्रवाहात आता प्रादेशिक ओटीटी प्लॅटफॉर्म्सची चलती पाहायला मिळत आहे. त्यामुळे येत्या काळात प्रादेशिक ओटीटीचे भविष्य काय असेल? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.