युवराज आणि गुलामी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Jul-2021   
Total Views |
 
prince_1  H x W
 
 
 
 
फ्रान्समध्ये सध्या घटना चर्चेत आहे. ती म्हणजे सौदीच्या एका युवराजाची सध्या चौकशी सुरू आहे. या सौदीच्या युवराजाचे नाव मात्र सरकारने उघड केलेले नाही. कारण, अमानवी वर्तन करण्यासंबंधीच्या गुन्ह्याखाली फ्रान्समध्ये त्याची चौकशी सुरू आहे. २०१९ साली सात महिलांनी या युवराजाविरोधात ही तक्रार केली होती. त्यांनी तक्रारीमध्ये म्हटले होते की, २००८, २०१३ आणि २०१५ साली युवराज आपल्या कुटुंबकबिल्यासोबत फ्रान्समध्ये प्रत्येक वेळी एका महिन्यासाठी आला होता. त्यावेळी जेवण बनवणे, घर साफ करण्यासाठी आणि मुलांना सांभाळण्यासाठी युवराजाने सात महिलांना घरकामासाठी नेमले. युवराजाकडे काम करणार तर नक्कीच चांगले अर्थार्जन होणार, असे या महिलांना वाटणे अगदी स्वाभाविक. पण, २४ तास काम करून या महिलांना केवळ ३०० युरो मिळत. तसेच यांना कधी कधी अन्नपाणीही दिले जात नसे. थोडीशी जरी चूक झाली किंवा युवराज आणि त्यांच्या कुटुंबातील कुणाच्याही मनात काही आले, तर या महिलांना त्रास दिला जाई. तसेच फ्रान्समध्ये कडाक्याच्या थंडीत या महिलांना जमिनीवर झोपण्याची सक्ती केली जाई. जर काम केले नाही, तर यांना भरपूर मानसिक शारीरिक त्रास दिला जाई. शेवटी, एकदा युवराज आणि कुटुंब फिरायला गेले असता, या महिलांनी तिथून गुपचुप पळ काढला आणि त्यांनी तक्रार दाखल केली. फ्रान्समध्ये ही अशी घटना सौदीच्या एका युवराजाने करावी, या घटनेने खळबळ उडाली. युवराजाचे वागणे हे गुलामगिरीचे समर्थन करणारे आणि महिला कर्मचार्‍यांना गुलामाची वागणूक देणारे आहे, असे फ्रान्सचे म्हणणे आहे.
 
 
 
असो. सौदीमध्ये जगभरातून त्यातही पाकिस्तान, भारत, श्रीलंका, बांगलादेश, मलेशिया, थायलंड आणि मोरक्कोसह इतर आफ्रिकन देशांतून लोक कामासाठी येतात. त्यातही चतुर्थ श्रेणीचे कामगार जास्त. घरकाम करणार्‍या किंवा तत्सम चतुर्थ श्रेणीचे काम असणार्‍या क्षेत्रात महिला काम करतात. मात्र, बाहेरील देशातून इथे कामासाठी येणार्‍या महिलांची स्थिती कशी आहे, यावर नेहमीच समाजअभ्यासकांकडून शंका आणि चिंता व्यक्त केली जाते. कारण, बाहेरील देशातून येऊन सौदीमध्ये घरकाम किंवा तत्सम काम करणार्‍या काही महिलांनी त्यांच्या त्यांच्या देशाशी कसाबसा संपर्क साधून म्हटले आहे की, त्यांचे शोषण झाले, त्यांना कामाच्या नावाने आणून इथे गुलाम बनवले. काहींनी तर सांगितले की, त्यांची जनावरासारखी विक्रीदेखील केली गेली. यालाच पुष्टी किंवा समर्थन देणारी घटना जगाने पाहिली.
 
 
 
२०१५ साली सौदीच्या एका ‘सोशल साईट’वर एक जाहिरात झळकली होती. ‘फॉर सेल’ असे लिहिलेली ही जाहिरात होती. त्यात काही मोरक्को स्त्रिया विक्रीला म्हणून चक्क जाहिरात केली होती. त्यांचा फोटो, वय, त्यांना कोणते घरकाम किंवा तत्सम काम येते, याचा तपशील दिला होता. जीवंत महिलांची राजरोस खरेदी-विक्री करू पाहणारी ही जाहिरात कोणत्याही कायद्याच्या धाकाशिवाय सौदीमध्ये झळकली. त्यानंतर आफ्रिका आणि इतर गरीब देशातील महिलांना कामासाठी सौदीच नव्हे, तर जगभरात असेच आणले जाते आणि विकले जाते, हे भयंकर चित्र जगासमोर आले.
 
 
 
सौदीमध्ये असलेले महिलांसाठीचे आणि मुस्लिमेतर व्यक्तींसाठीचे कडक नियम तर जगजाहीर. दुसर्‍या देशातून इथे घरकामासाठी किंवा चतुर्थ श्रेणी कामासाठी येणार्‍या व्यक्तीचे शिक्षण जास्त नसते, ना या देशाची भाषा किंवा कायदे त्यांना माहिती असतात. त्यामुळे त्यांच्या हातून सुरुवातीला चुका होतातच होतात. पण, गरिबी आणि दुसर्‍या देशात आपल्याला कोण न्याय देणार, या भीतीने हे कर्मचारी गप्प बसतात. या सगळ्यामुळे सौदी आणि तेथील परदेशी कर्मचारी याबद्दल जगात सदैव चिंता व्यक्त केली जाते. त्यामुळे सौदीच्या त्या युवराजाने त्यांच्या कर्मचार्‍याशी जे गैरवर्तन केले, त्याबद्दल युवराजाला वैयक्तिकरीत्या काही वावगे वाटत असेल, असे वाटत नाही. कारण, संपत्ती आणि सत्तेचा माज गरिबांच्या मजबुरीचे राक्षसी शोषण करताना स्वतःचे निर्लज्ज शोषण करतच असतात. युवराजांचे कृत्य उघड झाले आणि कृत्य करणारी व्यक्ती राजघराण्यातील असल्याने जगाने लक्ष दिले इतकेच! नाही तर जगभरात अशा घटना सातत्याने घडतात. मात्र, हे असेच चालणार म्हणून कुणीही लक्ष देत नाहीत. कधीतरी या शोषणाचाही विचार करायलाच हवा.
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@