नवी मुंबई : रशियन बनावटीची आणि एकच मात्रा पुरेशी असणारी आणि कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी सक्षम असणारी स्पुटनिक-व्ही लस आता नवी मुंबईत उपलब्ध होणार आहे. नेरुळच्या तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल व रिसर्च सेन्टर इथे आज ७५ नागरिकांना ही स्पुटनिक व्ही लस देण्यात आली.
सानपाड्यात राहणाऱ्या फायना फिलिप या तरुणीला ही लस घेऊन या लसीकरणाला सुरुवात झाली. स्पुटनिक व्ही लस घेण्यासाठी आरोग्य सेतूवर नोंद करणे गरजेचे आहे तसेच ९६१९४५४५४५ या तकवर फोन करून नाव नोंदवू शकता तसेच हे सकाळी ८ ते संध्याकाळी ८ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. कोरोनाची तिसरी लाट येऊ शकते, असे भाकीत अनेक आरोग्य संघटना करीत असून स्पुतनिक व्ही या लसीकडे सर्वचजण आशेने पाहत आहेत.
भारतात रशियाची स्पुटनिक व्ही कोरोना लसीचं उत्पादन डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज करीत असून या लशीची किमंत ११४५/- आहे रशियातील शास्त्रज्ञांनी 'द लान्सेट' या जगप्रसिद्ध वैद्यकीय मासिकात लशीच्या संशोधनाबाबतचा पहिला अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालातील दाव्यानुसार, रशियात लशीच्या ज्या सुरुवातीच्या चाचण्या झाल्या, त्यात लशीच्या रोगप्रतिकारक प्रतिक्रियेचे संकेत मिळाले आहेत. चाचणीत सहभागी झालेल्या ज्या ज्या लोकांवर लशीची चाचणी घेण्यात आली, त्यांच्या शरीरात कोरोना विषाणूविरोधात लढण्यासाठी अँटीबॉडीज तयार झाल्या.
विशेष म्हणजे, या चाचणीमुळे कुठलेही गंभीर परीणाम झालेले नाहीत, असाही दावा रशियन शास्त्रज्ञांनी 'द लान्सेट'मधील अहवालात केला आहे. दोन बिलियन डोस हे पुढील पाच महिन्यांमध्ये भारताला उपलब्ध होणार असल्याची माहिती केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने याबाबतची माहिती दिली आहे. ११ ऑगस्ट २०२० रोजी रशियाने या लसीची नोंदणी केली होती म्हणजेच कोरोना विरोधातली जगभरातली ही पहिली लस आहे.