सुसंस्कृत ’जनसेवक’ : आ. संजय केळकर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Jul-2021   
Total Views |


aamdar2_1  H x

कुशल संसदपटू, आदर्श लोकप्रतिनिधी रामभाऊ म्हाळगी यांचा वारसा समर्थपणे जपणारे ठाण्याचे आ. संजय केळकर यांचा दि. ९ जुलै हा वाढदिवस. आपल्या कार्यकर्तृत्वाचा डंका न वाजवता आयुष्यभर कार्यमग्न असलेल्या आ. संजय केळकर यांचा जन्म १९५६ रोजी झाला. शिक्षकाच्या घरी जन्मलेल्या संजय केळकर यांचा राजकीय प्रवास म्हणजे केवळ नि:स्पृह वृत्तीने इतरांच्या आयुष्यात सुखसमाधानाचे रंग भरण्याचा पट आहे. सुसंस्कृत, सुशिक्षित, साधी राहणी आणि प्रसिद्धीच्या हव्यासापासून कोसो दूर राहणारे आ. केळकर यामुळेच ठाणेकरांचे ’जनसेवक’ म्हणून ख्याती पावले आहेत.


अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, रामभाऊ म्हाळगी, राम कापसे, नितीन गडकरी, गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन आदी मातब्बर नेत्यांसोबत काम केल्याचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. राजकारणात असूनही त्यांचे सर्वांशी असणारे मैत्रीपूर्ण संबंध आणि कार्यकर्त्यांशी थेट व स्पष्ट हितगुज करणे हे त्यांचे वैशिष्ट्य होय.
आणीबाणी विरोधात तरुणांचे नेतृत्व करणारे संजय केळकर जनसंघापासून कार्यरत आहेत. भारतीय जनता पक्षाचे ठाण्याचे पहिले आमदार म्हणून राजकीय इतिहासात त्यांची नोंद आहे. गेली ४१ वर्ष निष्ठेने पक्षाचे काम करीत असताना पक्षाने दिलेली कोणतीही जबाबदारी यशस्वीपणे पार पाडीत आहेत. ठाणे जिल्ह्यातील जव्हार, मोखाडा, तलासरी, वाडा, विक्रमगड, पालघर आदी भागात पक्षवाढीसाठी तसेच वनवासी समाजासाठी अग्रेसर असणारे आ. केळकर नुकत्याच पार पडलेल्या पंढरपूरच्या पोटनिवडणुकीत विजयश्री खेचून आणण्यात पुढे होते.
 
ठाणे शहर चिटणीस, ठाणे शहराध्यक्ष, ठाणे विभाग अध्यक्ष, ठाणे कोकण संपर्क प्रमुख, नंतर २००६ साली कोकण पदवीधर मतदारसंघातील आमदार व आता दुसर्‍यांदा ठाणे विधानसभा मतदारसंघात आमदार म्हणून आ. केळकरांना ठाणेकरांनी निवडून दिल्याने त्यांना ‘ठाण्यातील भाजपचा सुसंस्कृत चेहरा’ असे संबोधले जाते. ‘आमदार आपल्या भेटीला’ हा उपक्रम असो वा ठाण्यात विविध १२ ठिकाणी शेतकरी आठवडा बाजार सुरू करून शेतकर्‍यांना बळ देणारे आ.केळकर कोकणातील आंबा उत्पादकांचे तारणहार आहेत. ठाण्यातील आंबा महोत्सव, रोजगार मेळावे यासह कोरोना काळातदेखील आ. केळकर यांचे समाजासाठी योगदान मोलाचे आहे. औषधोपचार, तपासणी, लसीकरण या मोहिमा त्यांच्या ‘संस्कार’ संस्थेच्या माध्यमातून यशस्वीपणे राबवत आहेत. समाजातील सर्व स्तरातील तसेच, तळागाळातील वंचितांच्या मदतीसाठी आ. केळकर नेहमीच मदतीला धावतात. ठाण्यातील ऐतिहासिक वास्तू जतन करण्यासाठी ते नेहमीच आग्रही असतात.
 
शैक्षणिक क्षेत्रात आ. केळकर यांचे काम मोलाचे आहे. महाराष्ट्र शिक्षक परिषदेचे (प्राथमिक) ते संस्थापक असून या माध्यमातून शिक्षकांसाठी सतत कार्यरत असतात. दरवर्षी गरजू गरीब विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्य तसेच ‘ऑनलाईन’ शिक्षणाकरिता मोफत ‘नेट’ पॅकची व्यवस्था करून दिली. आ. केळकर हे एक उत्कृष्ट अभिनेता असले तरी “राजकारणात मला नाटक करता येत नाही, म्हणून मी नाटकात अभिनय करतो,” असा विचार ते बोलून दाखवतात. ’संन्यस्त ज्वालामुखी’ स्वामी विवेकानंद यांच्यावर आधारित संगीतमय नाटकात त्यांनी रामकृष्ण परमहंस यांची भूमिका केली, तर ‘कोकण कला अकादमी’मार्फत ’शिवबा’ या नाटकाची निर्मिती केली. गड-किल्ले संवर्धनाचा वसा घेऊन खर्‍या अर्थाने छत्रपतींचा आदर्श जपणारे आ. संजय केळकर रयतेचे खरे ’जनसेवक’ आहेत.
 
 
@@AUTHORINFO_V1@@