सत्ताधार्‍यांसमोर चिडिचूप फादर

    08-Jul-2021
Total Views |

AGRALEKH_1  H x
 
हिंसाचारी मानसिकतेच्या विद्यार्थ्यांसाठी शब्द खर्च करणार्‍या, फादर स्टेन स्वामीसारख्या शहरी माओवाद्याच्या नैसर्गिक मृत्यूला हत्या ठरवणार्‍या फादर दिब्रिटोंची स्वप्निल लोणकरच्या व्यवस्थेने केलेल्या हत्येवर दातखीळ का बसली आहे? की, फादर स्टेन स्वामीच्या मृत्यूची बातमी समजली तशी त्यांना स्वप्निल लोणकरच्या आत्महत्येची बातमी समजली नाही?
 
“फादर स्टेन स्वामी यांचा मृत्यू लोकशाहीला कलंक लावणारी घटना आहे. त्यांनी आपले जीवन गोरगरिबांच्या हितासाठी वाहिले. कोरेगाव-भीमा प्रकरणात गोवून तुरुंगात डांबत त्यांचा बळी घेतला गेला. अर्थात, फादर स्टेन स्वामी यांचा मृत्यू सरकारपुरस्कृत हत्याच आहे,” अशा शब्दांत ९३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी आपल्या संवेदना व्यक्त केल्या. मात्र, फादर दिब्रिटोंनी फादर स्टेन स्वामीला लावलेली गरिबांचा मसिहाची विशेषणे प्रत्यक्षात तशी नसून, त्याला माओवादाच्याच आरोपाखाली अटक करण्यात आली होती. तसेच त्याच्या मनमर्जीनुसार त्याच्यावर होली फॅमिली रुग्णालयात उपचारही सुरूच होते. फादर स्टेन स्वामीची प्रकृती खालावली व त्याला उपचार नाकारले गेले, अशीही परिस्थिती नव्हती. तरीही फादर फ्रान्सिस दिब्रिटो त्याच्या मृत्यूला हत्या ठरवत असतील, तर त्यांच्या मेंदूवर परिणाम झाल्याचे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. अर्थात, फादर दिब्रिटोंनी असे विधान का केले, तर त्यांचे फादर स्टेन स्वामीशी कसले ना कसले संबंध असतील आणि दुसरा मुद्दा म्हणजे यातून केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारच्या विरोधाचा कंडूही शमवून घेता येतो. पण, फादर स्टेन स्वामीसारख्या शहरी माओवाद्यासाठी, वनवासींच्या भोळ्याभाबडेपणाचा फायदा घेऊन स्वतःचा स्वार्थ साधणार्‍या देशविघातक प्रवृत्तींसाठी कळवळा दाटून आलेले फादर फ्रान्सिस दिब्रिटो स्वप्निल लोणकरच्या व्यवस्थेने केलेल्या हत्येवर मात्र चिडिचूप आहेत. असे का?
 
गेल्या वर्षी याच फादर दिब्रिटोंनी, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून, “आमच्या मुलांच्या डोक्यात काठ्या घातल्या जात असताना आम्ही गप्प कसे बसायचे?” असा सवाल विचारत जवाहरलाल नेहरू विद्यापीठात हिंसाचार करणार्‍या डाव्या विचारधारेच्या विद्यार्थ्यांची कड घेतली होती. तर आता फादर स्टेन स्वामीच्या मृत्यूने त्यांचे हृदय द्रवले. पण, हिंसाचारी मानसिकतेच्या विद्यार्थ्यांसाठी शब्द खर्च करणार्‍या, फादर स्टेन स्वामीसारख्या शहरी माओवाद्याच्या नैसर्गिक मृत्यूला हत्या ठरवणार्‍या फादर दिब्रिटोंची स्वप्निल लोणकरच्या व्यवस्थेने केलेल्या हत्येवर दातखीळ का बसली आहे? की, फादर स्टेन स्वामीच्या मृत्यूची बातमी समजली, तशी त्यांना स्वप्निल लोणकरच्या आत्महत्येची बातमी समजली नाही? की, हिंसाचारी विद्यार्थ्यांचा नि फादर स्टेन स्वामीच्या परिजनांप्रमाणे स्वप्निल लोणकरच्या आई-वडिलांचा टाहो त्यांना ऐकू गेला नाही? की, स्वप्निल लोणकरच्या आत्महत्येने उद्ध्वस्त झालेले कुटुंब, घरदार त्यांना दिसले नाही? तर या प्रश्नांची उत्तरे नक्कीच होकारार्थी आहेत. पण, स्वप्निल लोणकरवर आत्महत्येची वेळ आणणारे महाराष्ट्रातील सरकार मात्र फादर फ्रान्सिस दिब्रिटोंना टीका करण्यासाठी सोयीचे वा मोदींचे वा भाजपचे नाहीये. त्यामुळेच तर फादर दिब्रिटो राज्यातील एका विद्यार्थ्याचा जीव गेल्यानंतरही चिडिचूप आहेत, त्यांच्या भावभावना मेल्यात, त्यांच्या हृदयातला वर्षभरापूर्वीचा हिंसाचारी विद्यार्थ्यांबद्दलचा आणि आताचा फादर स्टेन स्वामीबद्दल दाटून आलेला उमाळादेखील स्वप्निल लोणकरच्या मृत्यूप्रकरणात आटलाय. कारण, ते राज्यातल्या विद्यमान व्यवस्थेचे दास होऊन मौनात गेलेत.
 
‘महाराष्ट्र लोकसेवा आयोगा’च्या (एमपीएससी) पूर्व आणि मुख्य परीक्षेत उत्तीर्ण झालेला स्वप्निल लोणकर दोन वर्षांपासून मुलाखतीच्या प्रतीक्षेत होता. मुलाखत देऊन सरकारी नोकरीत रुजू होऊ, असे त्याचे स्वप्न होते. त्याच आधारावर त्याने घर बांधण्यासाठी कर्जही घेतले. पण, वयाची २४ वर्षे संपत आलेली, घरची गरीब परिस्थिती, खासगी नोकरीने कधीही फिटू न शकणारा कर्जाचा डोंगर आणि कुटुंबीयांसह इतरांच्या वाढत्या अपेक्षा व ‘एमपीएससी’च्या मुलाखतीची अनिश्चतता या पार्श्वभूमीवर स्वप्निल लोणकरने आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेतला. त्याला राज्यातील महाविकास आघाडी सरकारव्यतिरिक्त कोणाला जबाबदार म्हणणार? कारण विद्यार्थ्यांनी वर्षानुवर्षे स्पर्धा परीक्षांची जीव तोडून तयारी करायची, त्यात उत्तीर्ण व्हायचे आणि नोकरभरती करणारे राज्यकर्ते मात्र करंटे, अशी महाराष्ट्राची सध्याची परिस्थिती आहे. राज्य सरकारच्या नोकरभरती न करण्याच्या, स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होऊनही विद्यार्थ्यांच्या नियुक्त्या न करण्याच्या व निहीत कर्तव्याव्यतिरिक्त खंडणी, वसुली, सूड, बदला घेण्याच्या धोरणामुळेच आज युवा पिढी नैराश्यात गेली आहे आणि स्वप्निल लोणकरची आत्महत्या त्याचेच उदाहरण.
 
वरवर पाहता स्वप्निल लोणकरने आत्महत्या केल्याचे दिसत असले, तरी प्रत्यक्षात त्याचा मृत्यू व्यवस्थेने केलेला खूनच आहे आणि तरीही फादर फ्रान्सिस दिब्रिटोंसारख्या हळव्या व्यक्तीला त्यावरून राज्यकर्त्यांना जाब विचारावासा वाटत नाही. मात्र, जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील हिंसाचारी विद्यार्थ्यांवरील कारवाईला फादर दिब्रिटोंनी निर्घृण ठरवले होते. तर आता, शेकडो वनवासींच्या मृत्यूसाठी कारणीभूत ठरणार्‍या माओवाद्यांपैकीच एक असलेल्या फादर स्टेन स्वामीच्या मृत्यूला हत्या ठरवत त्यासाठी ते दोन अश्रू ढाळतानाही दिसतात. पण, मग आताचा स्वप्निल लोणकरचा बळी फादर दिब्रिटोंच्या लेखी निर्घृण घटना नाही का? स्वप्निल लोणकरचा मृत्यू दोन अश्रू ढाळण्याइतका, त्यावरून राज्य सरकारला प्रश्न विचारण्याइतकाही दखलपात्र नाही का? तर नक्कीच आहे. पण, फादर दिब्रिटोंसाठी घटना, प्रसंगांचे अर्थ राज्यकर्त्यांनुसार, व्यक्ती-व्यक्तीनुसार बदलत असतात. स्वतःहून हिंसाचार करणार्‍या विद्यार्थ्यांवरील दिल्लीतील पोलिसांनी केलेली कारवाई निर्घृण असते, स्वतःच्या पसंतीच्या रुग्णालयात उपचार घेता घेताच मरण पावलेल्या फादर स्टेन स्वामीचा मृत्यू हत्या असते. पण, अभ्यास करून, दोन परीक्षा उत्तीर्ण होऊनही मुलाखत न झाल्याने नोकरी न मिळालेल्या स्वप्निल लोणकरची महाविकास आघाडी सरकारच्या नेतृत्वातील व्यवस्थेने केलेली हत्या फादर फ्रान्सिस दिब्रिटोंच्या लेखी निर्घृण नसते. का? कारण, आता राज्यात हिंदुत्ववाद्यांचे नव्हे तर तथाकथित पुरोगामी, धर्मनिरपेक्षतावादी, उदारमतवाद्यांचे सरकार आहे. तेव्हा कोणी आत्महत्या करो, अथवा व्यवस्थेच्या हलगर्जीपणाने कोणाचा बळी जावो, फादर दिब्रिटोंना त्याविरोधात बोलण्यासाठी कंठच फुटू शकत नाही. कारण, त्यांच्या लेखणीबरोबरच तोंडही विद्यमान राज्यकर्त्यांच्या नि त्याच्या आधारवडाच्या सेवेत रुजू झालेले असेल.
 
दरम्यान, फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना ‘सेव्ह आरे’ नावाच्या तमाशालाही पाठिंबा दिला होता. ‘मेट्रो कारशेड’साठी झाडे तोडण्याला फादर दिब्रिटोंनी अमानुष ठरवले होते. पण, मग स्वप्निल लोणकरच्या मृत्यूचे काय? की, त्याचा बळी ‘मानुषपण’ असते आणि म्हणूनच फादर फ्रान्सिस दिब्रिटोंना ते महाविकास आघाडी सरकारचे उदात्त कर्तृत्व वाटते व त्यावरून ते ब्रही काढत नाहीत? स्वप्निल लोणकरच नव्हे, तर गेल्या वर्षभरातील कोरोना महामारीच्या काळात महाविकास आघाडी सरकारच्या गलथानपणामुळे हजारो नागरिकांना प्राणास मुकावे लागले. मृत्यूसंख्येच्या बाबतीत महाराष्ट्र देशात अव्वल स्थानी पोहोचला. पण, त्यावरही फादर दिब्रिटोंनी कधी आवाज केला नाही. यावरूनच फादर फ्रान्सिस दिब्रिटोंची समाजातील दीन-दुबळ्यांचा कैवार घेणारा साहित्यिक नव्हे, तर सत्तास्थानी कोण बसलेत, मरणारी व्यक्ती माओवादी आहे की सर्वसामान्य, हे पाहून विरोधात नि बाजूने बोलणारी ढोंगी व्यक्ती हीच ओळख घट्ट होते. गेल्या कित्येक वर्षांतील हिंसक हल्ल्यांतही तसेच झाले. फादर दिब्रिटोंसारखी मंडळी निवडक घटनांवर बोलली तर इतरवेळी शांतच राहिली. आताही एखादा स्टेन स्वामीसारखा फादर गेला, तर ते कळवळून बोलले नि स्वप्निलसारख्यांच्या मृत्यूवर गप्प बसणे पसंत केले. कारण, स्वतःकडूनच सदा न कदा उच्चारल्या जाणार्‍या आकाशातील बापाच्या करुणेच्या संदेशापेक्षा राजकीय मायबापांशी नि माओवादी, डाव्या विचारधारेतल्या लोकांशी असलेल्या हितसंबंधांचाच विचार करणेच त्यांना महत्त्वाचे वाटते म्हणून.