दिल्ली - केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार बुधवारी संध्याकाळी होणार आहे. या पार्श्वभूमीवर नवी दिल्लीमध्ये राजकीय हालचालींना वेग आला आहे. पंतप्रधान मोदी अनेक नेत्यांच्या मुलाखत घेत आहेत. अशा परिस्थितीमध्ये आता काही केंद्रीय मंत्र्यांनी राजीनामा देण्याची सुरुवात केली आहे. त्यामुळे रिकाम्या झालेल्या मंत्रीपदी कोणत्या नव्या चेहऱ्यांची वर्णी लागणार हे संध्याकाळपर्यंत स्पष्ट होईल.
या मंत्र्यांचा राजीनामा
मोदी मंत्रिमंडळाचा विस्ताराच्या पार्श्वभूमीवर आता केंद्रीय कॅबिनेट मंत्र्यांच्या राजीनाम्याचे सत्र सुरू झाले आहेे. केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी आपला राजीनामा लोकसभा अध्यक्षांकडे सुपूर्द केला आहे. त्यांच्या पाठोपाठ कामगार मंत्री संतोष गंगवार यांनीही देखील राजीनाामा दिला आहे. आरोग्यमंत्री डाॅ. हर्षवर्धन, रावसाहेब दानवे, संजय धोत्रे, बाबुल सुप्रियो, प्रताप सारंगी, प्रकाश जावडेकर, रविशंकर प्रसाद, रतनलाल कटारिया, अश्विनी चौबे यांनीही राजीनामा दिल्याचे सूत्रांकडून समजले आहे. तसेच थावरचंद्र गहलोत, सदानंद गौडा, देबोश्री चौधरी यांनीही राजीनामा दिला आहे. एकूण १० मंत्र्यांनी राजीनामा दिला आहे. त्यामुळे त्यांच्या जागी कोणत्या नव्या चेेहऱ्याला संधी मिळणार हे पाहावे लागेल.
अतिरिक्त कार्यभार
सध्या मोदींच्या मंत्रिमंडळात एकूण ५२ मंत्री आहे. त्यामध्ये २२ कॅबिनेट मंत्री आहेत. यामधील ९ मंत्र्याकडे एकापेक्षा अधिक खाती आहेत. त्यात नरेंद्र सिंह तोवर आणि जितेंद्र सिंह यांच्याकडे चार खात्यांचा अतिरिक्त पदभार आहे. तर रविशंकर प्रसाद, डाॅ. हर्षवर्धन, प्रकाश जावडेकर, पियुष गोयल, प्रल्हाद जोशी आणि संजय धोत्रे यांच्याकडे प्रत्येकी ३ खात्यांचा अतिरिक्त कार्यभार आहे. त्यामुळे हे अतिरिक्त कार्यभार मंत्र्यांकडून काढून घेऊन त्याठिकाणी नवीन नेत्यांना संधी देण्यात येणार आहे.
पंतप्रधानांच्या घरी बैठक
भाजपचे अध्यक्ष जे.पी.नड्डी हे पंतप्रधान मोदी यांच्या घरी पोहोचले आहेत. त्यांच्यासोबत मंत्रिमंडळ विस्तारात संधी मिळणारे नेते उपस्थित आहेत. यामध्ये ग्वाल्हेर राजघराण्यातील ज्योतिरादित्य सिंधिया, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे, कपिल पाटील, भागवत कराड, रणजितसिंह निंबाळकर, अनुराग ठाकूर, मिनाक्षी लेखी, अनुप्रिया, पटेल, आसामचे माजी मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल, अजय भट्टा, पुरुषोत्तम रुपाला,लोजपाचे पशुपती कुमार पारस हे नेते उपस्थित आहेत.
संध्याकाळी मंत्रिमंडळ विस्तार
बुधवारी संध्याकाळी मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. संध्याकाळी ६ वाजता नवनियुक्त मंत्र्यांचा राष्ट्रपती भवन येथे शपथविधी होईल. ज्योतिरादित्य सिंधिया, कैलास विजयवर्गीय, सर्वानंद सोनोवाल, नारायण राणे, प्रीतम मुंडे, मीनाक्षी लेखी, पशुपति कुमार पारस, रामचंद्र प्रसाद सिंह, राजीव सिंह लल्लन, सुशील कुमार मोदी, वरुण गांधी , अनुप्रिया पटेल, स्वतंत्र देव सिंह, भूपेंद्र यादव आणि दिनेश त्रिवेदी यांना मंत्रिमंडळात संधी मिळण्याची शक्यता आहे.