अलौकिक ‘दिव्या’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Jul-2021   
Total Views |

Divya Mohite_1  
 
 
आयुष्यात शॉर्टकट तुम्हाला पोहोचवतो; पण लाँगकटला भरपूर त्रास आणि वेळही लागतो. मात्र, यामुळे जे समाधान लाभते ते अवर्णनीय असते, असे मानणार्‍या दिव्या मोहिते या होतकरू कलाकाराच्या वाटचालीविषयी...
तब्बल ३० वर्षांनंतर ‘व्हेनिस फिल्म फेस्टिव्हल’मध्ये मराठी सिनेमाचा गौरव झाला. ‘कोर्ट’फेम चैतन्य ताम्हाणे दिग्दर्शित ‘द डिसिपल’ असे या मराठी चित्रपटाचे नाव. दुर्दैवाने कोरोनामुळे या चित्रपटाची आणि त्याच्या घोडदौडीची अपेक्षित चर्चा झाली नाही. या चित्रपटाने ठाण्यातील दिव्या मोहिते या एका होतकरू नाट्यकर्मीला संधी देऊन तिच्या आयुष्यातल्या स्वप्निल प्रवासाला गती दिली. कुटुंबात सिनेमा, नाटकाची कोणतीही पार्श्वभूमी नसताना चंदेरी विश्वात आयुष्य पणाला लावण्यासाठी अंगी आत्मविश्वास असावा लागतो. तेव्हा कलाविश्वाचा भाग बनू पाहणार्‍यांसाठी दिव्याचा प्रवास प्रेरणादायी आहे.
 
 
 
ठाण्यातील लोकमान्यनगरमध्ये राहणार्‍या दिव्याची आई मासेविक्रीचा व्यवसाय करते, तर वडील एसी-फ्रिज मेकॅनिक आहेत. कुटुंबात आई-वडील, आजी आणि या तिघी बहिणी आहेत. शालेय शिक्षण नजीकच्या शाळेत पूर्ण झाल्यावर महाविद्यालयीन शिक्षण ठाण्याच्या जोशी-बेडेकर महाविद्यालयात झाले. महाविद्यालयात ‘नाट्यमय’ या एकांकिका संघासोबत कलेच्या प्रारंभी प्रवासाबद्दल दिव्या सांगते, “सुरुवातीला घरून नाटकात काम करण्याबाबत तसा पाठिंबा नव्हता. पण, माझ्या हट्टी स्वभावामुळे घरच्यांनी कधी नकारही दिला नाही.” त्यातूनच ‘जुम्मेबाज’, ‘कोंडी’, ‘अनेस्थेसिया’, ‘ओश्तोरीज’ आणि ‘मोजलेम’ या एकांकिकांमध्ये ‘मॉब’ आणि ’बॅकस्टेज’, तर ‘पुनर्जन्म’, ‘ती आणि आपण’, ‘मुस्काट’ या एकांकिकांमध्ये विविध भूमिका साकारून, ‘असणं-नसणं’ या एकांकिकेत आईची भूमिका साकारल्यानंतर तिने प्रायोगिक नाटकामध्ये पदार्पण केलं.
 
 
 
अभ्यासात कधीच मन रमलं नाही, तरी ‘बीएमएम’ केल्यानंतर सन २०१६-१७मध्ये ‘दोजख’ या अभिजित झुंझारराव दिग्दर्शित आणि इरफान मुजावर लिखित प्रायोगिक कलाकृतीमध्ये ‘नादिया मुराद’ हे पात्र तिने साकारलं. प्रत्येक कलाकृती वास्तविक जगणे शिकवत असते. आपण जेव्हा खूप दुःखी असतो, तेव्हा अशा ठिकाणी जा, जिथे आपल्या दुःखापेक्षा जास्त दुःख आहे. दुसर्‍यांची दुःख पाहताना स्वतःच्या दुःखाची तीव्रता कमी होते. नादिया साकारताना तिला आलेला अनुभव ती व्यक्त करते. ‘झी नाट्य गौरव सर्वोत्कृष्ट प्रायोगिक अभिनेत्री’ नामांकन, कामगार कल्याण उत्तेजनार्थ अभिनेत्री पुरस्कार, मराठी प्रायोगिक राज्य नाट्य सर्वोत्कृष्ट अभिनेत्री प्रथम, हिंदी प्रायोगिक राज्यनाट्य सर्वोत्कृष्ट अभिनेत्री उत्तेजनार्थ आणि मराठी साहित्य संमेलनातर्फे ‘गो. ब. देवल पुरस्कार’ अशा कित्येक पुरस्कारांनी तिला गौरविण्यात आले.
 
 
सलग आठ वर्षे रंगभूमी गाजवल्यानंतर तिला ‘द डिसिपल’ या मराठी चित्रपटात पहिला ब्रेक मिळाला. या चित्रपटात तिने एका अधिकार्‍याची भूमिका साकारली आहे. चित्रपटात काम करण्याचा तिचा पहिलाच अनुभव. त्यात तांत्रिक अजाणतेपणा असताना कमी वयात फारच कौशल्यपूर्ण पद्धतीने काम करवून घेणार्‍या हुशार दिग्दर्शकामुळे कधीच अडचणी भासल्या नसल्याचे दिव्या सांगते. या चित्रपटातली तिची भूमिका काही मिनिटांची जरी असली तरी त्यातून तिला मिळालेला अनुभव तिच्यातल्या कलाकारासाठी उभारी देणारा होता.
 
 
दरम्यानच्या काळात ‘पद्मश्री’ रतन थियम यांच्या मार्गदर्शनाखाली नाट्य शिबिरात सहभागी होण्यासोबतच काही लघुपटांमध्ये काम करण्याची संधीही तिला मिळाली. नाटक, लघुपट, चित्रपटांप्रमाणे वास्तविक जीवनातही कित्येक चढ-उतार तिला चुकले नाहीत. स्वावलंबी होत स्वेच्छेने घरातूनच नव्हे, तर स्वतःच्या कोषातून बाहेर पडून ‘एकला चलो’चा निर्णय तिने घेतला. दुष्काळात तेरावा महिना म्हणतात, तशी कोरोनासारख्या जागतिक महामारीने निर्बंध लादले. काही कामं मिळाली. पण, काही गमावलीदेखील. पण, माघार घ्यायची नाही, ही खूणगाठ तिने मनाशी पक्की बांधली होती. यासाठी कधी लिखाण. कधी ग्राफिक डिझायनिंग, अशी कामेही तिने केली. यश आणि अपयशातही संघर्ष आहे. जो धीराने, संयमाने आणि जिद्दीने परिस्थितीला सामोरे जातो, तोच तग धरतो. दिव्याची जिद्द अफाट आहे आणि तिचा स्वतःवर असणारा आत्मविश्वास अद्वितीयच. ‘छळून घ्या संकटांनो, पुन्हा संधी मिळणार नाही’ या जिद्दीने ती संकटाशी सामना करते. या ‘कोविड’काळात सामाजिक जाणीव जपताना दिव्या, तिची मैत्रीण आरजे हरिता पुराणिक आणि ‘हेल्पिंग हॅण्ड’ या फेसबुक ग्रुपच्या साहाय्याने सामाजिक संस्थांच्या माध्यमातून अनेकांसाठी मदतीचा दुवा ठरली. तिचा स्वभाव माणसं जोडणारा असल्यामुळे अनेक जीवाभावाची माणसं तिची मैतर होतात, तिच्याशी विश्वासाने जोडली जातात. अभिनेत्री-निवेदिका पल्लवी वाघ-केळकर यांची ‘थिएटर कोलाज’ ही बालनाट्य संस्था म्हणजे दिव्याचे माहेरघरच. पल्लवीताईमुळे माझ्यातल्या तांत्रिक बाबीची समज, लिखाण आणि कलाकुसर इ. गुणांना वाव मिळालाच; पण याशिवाय कामाच्या दगदगीतदेखील मन प्रसन्न करणारे कित्येक क्षणही लाभले. छोट्या पडद्यावर ‘श्रीमंता घरची सून’ या मालिकेत अभिनयाची संधी मिळाल्यानंतर पुढच्या प्रवासाबद्दल ती भाकित करीत नाही. मात्र, निवडलेल्या या क्षेत्रात प्रकाशमान होण्याचे ध्येय असल्याचे दिव्या सांगते. कलाविश्वात वावरताना दिव्या कविताही लिहिते. स्वतःला कवितेतून व्यक्त करताना जगण्याची व्यथा मांडते. तिच्या अभिनय, लिखाणाला अलौकिक ‘दिव्य’त्व मिळो. यासाठी दिव्याला दै. ‘मुंबई तरुण भारत’तर्फे सदिच्छा!
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@