जाचक नियमावली विरोधात गणेश मंडळे आक्रमक

    06-Jul-2021
Total Views |

Ganesh Mandal_1 &nbs
 
ठाणे : कोरोना प्रादूर्भाव कमी होत असतानाही राज्य शासनाकडून आणि महापालिकेकडूनही केवळ गतवर्षीची नियमावली लागू करण्यात आली आहे. गेल्यावर्षीची परिस्थिती लक्षात घेऊन सगळ्याच गणेशोत्सवांनी उत्सव साजरा न करता शासनाला सहकार्य केले होते. परंतु यंदा लसीकरणाला वेग आल्याने आणि परिस्थिती सुधारत असल्याने निर्बंध शिथिल कराण्याची गरज आहे. अशी भूमीका घेऊन ठाणे शहरातील गणेशोत्सव समन्वय समितीच्यावतीने ठाणे महापालिकेसमोर महाआरती आंदोलन करण्यात आले.
 
 
 
मुंबई-ठाण्यातील सर्व गणेशोत्सव मंडळांची हीच भूमीका असून ठाण्यातील आंदोलनातून या असंतोषाची ठिणगी पडली असल्याचा इशारा यावेळी आंदोलकांकडून देण्यात आला. यंदाच्या गणेशोत्सवासाठी राज्य सरकार व ठाणे महापलिकेने घोषित करण्यात आलेल्या नियमावलीमध्ये शिथिलता आणण्याची आग्रही मागणी ठाणे जिल्हा गणेशोत्सव समितीने केली आहे. याच मागणीसाठी समितीची कार्यकर्ते ठाणे महापालिकेच्या मुख्यालयासमोर एकत्र येऊन महाआरती घेऊन आपल्या मागणी कडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलीसांनी या कार्यकर्त्यांना ताब्या घेतले.
 
 
 
ठाण्यात सुमारे २५० हून अधिक गणेशोत्सव मंडळे आहेत. संपुर्ण निर्बंध हटवा अशी मागणी नसली तरी उत्सवातील नियमांचा पुनर्विचार करण्यात यावा. तसेच गणेशोत्सव मंडळांना विश्वासात घेऊन तसेच त्यांच्याशी चर्चा करून नियमावली बनवण्याची गरज होती. परंतु गतवर्षीच्या नियमावलीचे कॉपी पेस्ट करण्यात आल्याने गणेशोत्सव साजरा करणे अशक्य झाले आहे. यामुळे गणेशभक्तांच्या भावना दुखावल्या जात आहेत. नियमावलीमध्ये गणेशमूर्तीची उंची, देखावा, धार्मिक कार्यक्रम, आगमन व विसर्जन मिरवणूक यासारख्या मुद्यांबाबत सूचना मांडण्यात आल्या आहेत. या नियमांत किमान शिथिलता द्यावी, असा आग्रह ठाणे जिल्हा गणेशोत्सव समन्वय समितीने धरली आहे.
 
 
 
स्थानिक पातळीवर महापालिका आयुक्तांना सरकारी नियमावलीत शिथिलता आणण्याचा अधिकार नसल्याचे महापालिका प्रशासनाकडून यासंदर्भात सांगण्यात आल्याने अखेर आंदोलन करावे लागल्याचे समन्वय समितीचे समीर सावंत यांनी स्पष्ट केले. तसेच गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांचे लसीकरणाला महापालिकेकडून प्रोत्साहन द्यावे आणि परवानगीसाठी एक खिडकी व्यवस्था उभी करण्याची मागणीही आंदोलकांकडून करण्यात आली आहे.