अफगाणिस्तानवर ‘ड्रॅगन’ची वक्रदृष्टी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Jul-2021   
Total Views |

afgh_1  H x W:
 
 
 
सध्या आंतरराष्ट्रीय पातळीवर अफगाणिस्तानमधील अमेरिकेची सैन्यवापसी हा सर्वाधिक चर्चेचा ठरलेला विषय. अमेरिका आणि मित्रदेशाच्या सैन्याने अफगाणिस्तानमधून काढता पाय घेताच तालिबानची सक्रियताही अपेक्षेप्रमाणे भलतीच वाढली. इतकी की अमेरिकेने अफगाणी सैन्यासाठी मागे सोडलेली काही सैनिकी वाहने, शस्त्रसामग्रीवरही तालिबानने अल्पावधीत कब्जा केला. कारण, आजघडीला अफगाणिस्तानचा ५० टक्क्यांपेक्षा अधिक भूभाग हा तालिबानच्या नियंत्रणाखाली आहे आणि भविष्यात हे प्रमाण वाढून अखंड अफगाणिस्तानच तालिबानच्या अधिपत्याखाली जाण्याची भीतीदेखील काही तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. पण, केवळ तालिबानच नव्हे, तर अफगाणिस्तानातील या अंतर्गत दुफळीचा, गृहयुद्धाचा फायदा आंतरराष्ट्रीय शक्तीही घेऊ शकतात आणि यामध्ये चीन सध्या आघाडीवर दिसतो.
 
 
अफगाणिस्तानमध्ये शांतता आणि स्थैर्य नांदावे, ही मुळी चीनची अपेक्षा नाहीच. उलट अशांत अफगाणिस्तानात घुसून आपला स्वार्थ साधण्यासाठी चीन फार पूर्वीपासूनच उत्सुक होता. फक्त तेथील अमेरिकन फौजफाट्यामुळे चीनला अफगाणिस्तानमध्ये प्रवेश करणे शक्य नव्हते. आता मात्र अमेरिकेने अफगाणिस्तानातून अंग काढून घेतल्यानंतर चीनने आपली वक्रदृष्टी अफगाणभूमीकडे वळवलेली दिसते. आधी म्हटल्याप्रमाणे यापूर्वीच चीनने त्यांच्या ‘बेल्ट रोड’ प्रकल्पामध्ये अफगाणिस्तानलाही समाविष्ट करण्याच्या हालचाली सुरू केल्या होत्या. त्याअंतर्गत पाकिस्तानातील ‘सीपेक’सारखा प्रकल्पही अफगाणिस्तानला जोडून व्यापार विस्तारण्याची चीनची मनीषा अजिबात लपून राहिलेली नाही. म्हणूनच आता चीनचा डोळा केवळ अफगाणिस्तानमधील व्यापारी संधींवरच नाही, तर खनिज संपत्तीवरही असल्याचे समजते.
 
 
अफगाणिस्तान खनिज संपत्तीच्या बाबतीत एक संपन्न प्रदेश गणला जातो. अफगाणभूमीत सोने, लिथियम, निओबियम, लोह, तांबे, कोबाल्ट यांसारखी खनिजे मोठ्या प्रमाणात आढळतात. परंतु, दुर्दैवाने देशातील एकूणच अस्थिरता, सुरक्षेमधील कमतरता, भरमसाठ कर, कुशल कामगार आणि तंत्रज्ञानाचा अभाव यामुळे अफगाणिस्तानमधील खाणकाम उद्योग कायम उपेक्षितच राहिला. इतकेच नाही, तर अमेरिकेने अफगाणिस्तानच्या भूमीचा खनिज संपत्तीच्या दृष्टीने अभ्यासही केला आणि भूगर्भीय संशोधनाअंती असे आढळून आले की, लिथियमचे भरपूर मोठे साठे अफगाणिस्तानमध्ये जमिनीखाली दडलेले आहेत. हे तेच लिथियम आहे, ज्याचा वापर मोठ्या प्रमाणात मोबाईल तसेच लॅपटॉमधील बॅटरीसाठी केला जातो. त्यामुळे ज्याप्रमाणे सौदी अरब आपल्या तेलाच्या साठ्यासाठी ओळखला जातो, त्याचप्रमाणे अफगाणिस्तानही लिथियमचा वापर करून आपली ढळमळीत अर्थव्यवस्था मार्गी लावू शकतो, इतका प्रचंड लिथियमचा साठा अफगाणिस्तानात आढळून आला. जीवाश्म इंधनाचा तुटवडा आधीच जगभरात जाणवू लागला आहे. अशा परिस्थितीत भविष्यात इलेक्ट्रॉनिक वस्तूंची चलती लक्षात घेता, लिथियमची मागणीही वाढू शकते. त्यामुळे अफगाणिस्तानने खनिज उत्खननासंबंधी धोरणात आमूलाग्र बदल केल्यास त्याचा आर्थिक फायदा या देशाला राहिल्याशिवाय राहणार नाही. केवळ लिथियमच नाही, तर निओबियम नावाचा ‘सॉफ्ट मेटल’ म्हणून ओळखला जाणारा धातूही अफगाणिस्तानमध्ये मुबलक प्रमाणात आढळून आला आहे. या निओबियमचा वापर सुपरकंडक्टर स्टीलच्या निर्मितीत केला जातो. पण, इतकी विपूल खनिज संपन्नता असूनही केवळ आणि केवळ अंतर्गत कलहामुळे हा देश खाणकामाच्या बाबतीत पिछाडीवरच राहिला. इतका की, आजघडीला अफगाणिस्तानच्या ‘जीडीपी’मध्ये खाणकाम उद्योगाचे प्रमाण हे केवळ सात ते दहा टक्के इतकेच तुटपुंजे आहे.
 
 
 
म्हणूनच अफगाणिस्तानातील हे दुर्लक्षित सोने हडपण्यासाठी जमिनीसाठी भुकेलेला चीन कुठल्याही थरावर जाऊ शकतो, म्हणूनच आपल्या ६२ अरब ‘बेल्ट रोड’ प्रोजेक्टचा विस्तार अफगाणिस्तानात करण्यासाठी चीन प्रयत्नशील दिसतो. त्यामुळे अफगाणिस्तान सरकारनेही पाकिस्तान, श्रीलंकेप्रमाणे चीनच्या कर्जजाळ्यात न अडकता, दूरदृष्टी ठेवून ही बहुमोल खनिज संपत्ती आपल्याच देशाचा कसा उद्धार करू शकेल, यासाठी प्रयत्नशील राहायला हवे. याकामी ज्या भारताने आजवर अफगाणिस्तानला सर्वोपरी मदत केली, तो मित्रदेशही कायम मदतीला सज्ज आहेच. त्यामुळे भविष्यात यासंबंधी चीन नेमकी काय चाल खेळतो आणि अफगाणिस्तानकडून त्याला कसा प्रतिसाद मिळतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@