दिल हैं के मानता नही...

    06-Jul-2021
Total Views |

aamir Khan_1  H
 
नुकतीच आमिर खान आणि त्याची पत्नी किरण राव यांच्या घटस्फोटाची बातमी येऊन धडकली. खरंतर हा आमिरचाही किंवा कुणा बॉलीवूड सिनेकलाकाराचाही काही पहिलावहिला काडीमोड नक्कीच नाही. पण, यानिमित्ताने या सेलिब्रिटींची जीवनशैली आणि त्यांच्या अशा निर्णयामागची मानसिकता जाणून घेण्याचा केलेला हा प्रयत्न....
 
 
सुप्रसिद्ध बॉलीवूड अभिनेता आमिर खान आणि त्याची पत्नी किरण राव यांनी आपण वेगळे होत असल्याची बातमी सार्वजनिकरीत्या उघड केली. त्यानंतर बॉलीवूडसह सामान्यांमध्येही काहीशी खळबळ उडाली. खरंतर आमिर खानचा पत्नीपासून विभक्त होण्याचा हा दुसरा प्रसंग. त्याच्या पहिल्या पत्नीपासूनसुद्धा तो 15 वर्षांनी विभक्त झाला होता. त्यावेळीसुद्धा त्याची मुलं समजूतदार होती. त्याचा प्रथम विवाहही प्रेमविवाह होता आणि नंतर किरणबरोबरचाही प्रेमविवाह. इतर बॉलीवूड स्टारपेक्षा आमिर थोडासा हटके आहे. ‘सत्यमेव जयते’ या मालिकेतून त्याने संवेदनाशील विषयांना वाचा फोडली, तर देशात माझ्या पत्नीला सुरक्षित वाटत नाही, असे वादग्रस्त विधान करुन रोषही ओढवून घेतला. ‘पानी फाऊंडेशन’ या प्रकल्पातून त्याने आणि किरणने अनेक गावांना आणि गावकर्‍यांना प्रेरणा दिली. तो जे काही करतो ते अत्यंत हुशारीने आणि कौशल्याने. ते प्रोजेक्ट तो आपल्या दृष्टिकोनातून पूर्णत्वाकडे नेत असतो. मग तो ‘लगान’ असो, ‘तारे जमीन पर’ वा ‘पानी फाऊंडेशन’ असो, त्याला ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ म्हणून बॉलीवूडमध्ये ओळखले जाते. अशा आमिर खानचे विवाहबंधन एकदा नाही, दोनदा तुटते. तेव्हा आपण सगळे प्रतिक्रिया देणार किंवा आपल्या मनात त्याबद्दल अनेक प्रश्नही उभे राहणार, हे साहजिकच आणि त्यात काही गैरही नाही. यावर चर्चा होतील, टीका होईल किंवा काहीजण आमिरचा हा फैसला कसा बरोबर आहे, हेदेखील समजावून सांगतील. आमिर-किरणच्या उघड, राजरोसपणे व्यक्त केलेल्या निर्णयाची जी पार्श्वभूमी त्यांनी दिली आहे, ती जरा न पटणारी आणि मनोरंजक आहे. यावर एक विनोदी मेसेज समाजमाध्यमांत फिरतो आहे. तो असा की, ‘लग्न म्हणजे १५-१५ वर्षांचे ‘पीपीएफ अकाऊंट आहे का?’
 
 
 
आमिरच्या आणि आजकाल इतर अनेक तार्‍यांच्या घटस्फोटाच्या वेळी त्यांच्या जीवनात सगळे कसे आलबेल आहे, असे ते सांगत सुटतात. त्या जोडीचे मैत्र आणि समजूतदारपणा कौतुकास्पद आहे. ते एकमेकांशी प्रेमळ आणि प्रगल्भ नातं टिकवून ठेवणार आहेत. आपल्या मुलाचा सांभाळसुद्धा ते एकत्रितपणे करणार आहेत. त्यांना मातापित्याच्या प्रेमाची उणीव भासू देणार नाहीत. याशिवाय आमिर आणि किरण त्यांचे सगळे प्रोजेक्टसुद्धा एकत्रितपणे करणार आहेत वगैरे वगैरे. हे सगळं वाचता वाचता आपले सगळ्यांचे डोकेच गरगरायला लागते. हेच सगळं तर सामान्यांच्या लग्नात आपल्याला सापडत नाहीत, पण त्यांच्या लग्नाची ‘सिल्व्हर’, ‘डायमंड’ आणि ‘प्लॅटिनम ज्युबिली’ मात्र थाटात साजरी होते. सगळं मस्त, स्थिरावलेलं, मजेमजेत आणि मैत्रिपूर्ण वातावरणात असताना माशी नक्की कुठे शिंकली? आमिरच्या भव्यदिव्य विचारांकडे, सामाजिक कार्याकडे लोक कौतुकाने पाहतातही. सेलिब्रिटी म्हणून बर्‍याच बाबतीत त्याचे अनुकरणही करतात. ‘पानी फाऊंडेशन’च्या प्रकल्पात गावंच्या गावं हिरिरीने श्रम करु लागली आणि गावागावात जलचमत्कार दिसून आले. ती गावं भारावली होती. काही तरी करुन दाखविण्यासाठी प्रेरितही झाली होती. यामुळे त्याच्या वैयक्तिक आयुष्यातला हा नाजूक विषय त्या सनसनाटी बातमीपलीकडे जाऊन महत्त्वाचा ठरतो. पण, लोक या बातमीने अविचारी प्रभावात वाहून जाऊ नयेत, हे महत्त्वाचे आहे. यासाठी या घटनेचे एक व्यापक विवेचन होणेही गरजेचे ठरते. कारण, आमिरसाठी जे सहज सोपे भासते, तसे ते सामान्यांसाठी शक्य होणार नाही. शेवटी सामान्यांचे जग जमिनीशी जोडलेले आहे, तर तारकांचे जग चमचमणारे आहे.
 
 
 
आजकालच्या काळात नावारुपास आलेल्या मंडळींचे लग्न होण्यापेक्षा ‘ते लग्न किती टिकते’ हे अधिक महत्त्वाचे मानले जाते. या नावलौकिक मिळविणार्‍या बर्‍याच लोकांच्या वैवाहिक जीवनात अनेक अडथळे असतात, जे सर्वसामान्य लोकांच्या आयुष्यात दिसत नाहीत. आज घटस्फोट आणि विभक्त होण्याचे प्रमाण स्थूलमानाने सगळीकडेच वाढलेले आहे. त्यासाठी आपण त्यांची लग्नबंधनात पडण्याची प्रक्रिया पाहिली पाहिजे. अमेरिकेत असे म्हणतात की, ही मंडळी आपल्या प्रसिद्धीसाठी लग्नाच्या बंधनात पडतातही आणि त्यातून बाहेरही पडतात. त्यात काही प्रमाणात तथ्य असूही शकेल. पण, या सिनेजगतातील मंडळींचे स्वतःचे असे एक वेगळे चमचमणारे विश्व असते. ते झगमगाटाचे आणि समाज जीवनशैलीचे जग असते. ज्यात प्रत्येकजण आपली एक प्रतिमा बनवून जगत असतो. या जगात या तारकांची स्वतःची अशी जगण्याची एक शैली असते. त्यांची जगण्याची अशी एक वेगळी संस्कृती असते. त्या झगमगाटात सर्वसामान्य माणसाचे आयुष्य जगण्याची कला ही मंडळी विसरून जातात. ही मंडळी त्यांच्या सोनेरी काळात एक संपन्न, पुरेपूर आणि यशस्वी आयुष्य जगत असतात. त्या आयुष्याची रंगत आणि चव वेगळीच असते. याच आयुष्यात त्यांना सुरक्षित वाटत असतं. तीच माणसं, तेच सर्कल आणि पार्ट्या यात हरवून गेलेली ही मंडळी आतून मात्र सर्वस्वी एकटी असतात. शून्यात राहतात. बर्‍यापैकी पोकळपणा त्यांना जाणवत असतो, तो भरून काढताना कधी व्यसनाची जोड, तर कधी वारंवार प्रेमात पडायची सवयच त्यांना लागते. शिवाय त्यांचे कामाचे स्वरूप या मंडळींना एकमेकांच्या खूप जवळ आणते. त्यांचे जग तसे मोहक आहे आणि त्यामुळे त्या एकत्रित सहवासाचा परिणाम म्हणून ‘सुपर’ जलदगतीने ही मंडळी खास मैत्रिबंधनात अडकतात. त्यांचे मैत्रीचे वलयही सिनेजगताशी संबंधित असते. ‘डेटिंग’ जोमात चालते. खरंतर विशिष्ट ‘डेटिंग’मुळे काही ‘स्टार’ प्रसिद्धीच्या झोतात आलेले असतात. ‘सेलिब्रिटी’ हे त्यांच्या जगात इतके गुंंतलेले असतात की, लग्नबंधनात अडकताना लागणारा समजूतदारपणा, प्रगल्भता याचा वापर ते किती करतात, हा प्रश्नच आहे. आपली सांस्कृतिक पार्श्वभूमी, धर्म, जात, वय या सगळ्या गोष्टी ते दुर्लक्षित करतात. आजकाल ‘लिव्ह-इन’ हे खूप प्रचलित आहे. त्यात बर्‍याच जणांचं नातं लग्नापर्यंत पोहोचतच नाही. एकंदरीत अस्थिरतेचे वारे या नात्याच्या अवतीभवती एका प्रकारे वाहत असतात. नात्याची बांधिलकी या बंधनात दिसत नाही. त्यात मोहकता अधिक आहे. अनेक ‘स्क्रिन’ आणि ‘सेट’वरची नाती या मोहापोटी ‘रोमँटिक’ भूमिकेतून वास्तविक विवाहबंधनात अडकलीत, यामध्ये लग्नासारख्या पवित्र बंधनात स्थिरावण्यासाठी लागणारा बंध किती भरीव असेल, याचा अंदाज लागत नाही.
 
 
 
यानंतर झटपट घाईघाईत ही मंडळी लग्न आटोपून मोकळीही होतात. हे विवाह ‘सेलिब्रेटी स्टाईल’मध्येच होतात. यात लग्नाच्या आधी जी मानसिक तयारी व्हायला हवी, ती होत नसावी. तो त्या क्षणाचा निर्णय असतो, त्यात मोह आहे, माया आहे, प्रसिद्धीचे वलय आहे, भपकेबाजपणा आहे. यात नात्यांच्या दीर्घकालीन सुरक्षितेतेचा किती विचार केला जातो, कुणास ठाऊक? सर्वसामान्य जनांसाठी विवाहबंधन हे जन्मबंधन असते. त्यात अनेक उत्तम गोष्टींबरोबर वैयक्तिक विकासही असतो. नात्याची सुरक्षिततता असते. येणार्‍या पिढीचे भविष्य असते. आपल्या प्रियकराच्या किंवा प्रेयसीच्यापाठी धावत जात संकटाशी सामना करत, जगाच्या विरोधाला न जुमानता आपलं प्रेम मिळावायचं, हे सिनेमातलं दृश्य भावूक आहे, पण शेवटी नाटक आहे. कारण, सुदृढ विवाहबंधनात सातत्य लागतं. (क्रमश:)
 
- डॉ. शुभांगी पारकर