नवी दिल्ली : देशात सुरु असलेल्या लसीकरण मोहिमेने ३५ कोटींचा महत्त्वपूर्ण टप्पा गाठला. आतापर्यंत ३५ कोटी, १२ लाख, २१ हजार, ३०६ लसींच्या मात्रा देण्यात आल्या आहेत. गेल्या २४ तासांत लसींच्या ६३ लाख, ८७ हजार, ८४९ मात्रा देण्यात आल्या. गेल्या २४ तासांत भारतात ४३ हजार, ०७१ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. सलग आठवडाभर ५० हजारांपेक्षा कमी दैनंदिन रुग्णसंख्या नोंदवली गेली आहे. केंद्र आणि राज्ये/केंद्रशासित प्रदेशांच्या निरंतर आणि एकत्रित प्रयत्नांचा हा परिणाम आहे. देशात उपचाराधीन रुग्णसंख्येतही सतत घसरण होत आहे. देशातील एकूण उपचाराधीन रुग्णसंख्या सध्या ४ लाख, ८५ हजार, ३५० इतकी आहे. गेल्या २४ तासांत एकूण उपचाराधीन रुग्णसंख्येत १० हजार, १८३ ची घट नोंदली गेली आणि देशातील एकूण बाधित रुग्णांपैकी उपचाराधीन रुग्ण केवळ १.५९ टक्के आहेत.
‘कोविड-१९’ संसर्गातून मोठ्या संख्येने लोक बरे होत आहेत. भारतातील बरे झालेल्यांची दैनंदिन संख्या सलग ५२ दिवस नवीन रुग्णसंख्येपेक्षा अधिक आहे. गेल्या २४ तासांत ५२ हजार, २९९ रुग्ण बरे झाले आहेत. दैनंदिन नवीन रुग्णांच्या तुलनेत गेल्या २४ तासांत ९,२२८ पेक्षा जास्त रुग्ण बरे झाले. महामारीच्या सुरुवातीपासून संसर्ग झालेल्या लोकांपैकी २ कोटी, ९६ लाख, ५८ हजार, ०७८ रुग्ण ‘कोविड-१९’ संसर्गातून बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचा दर ९७.०९ टक्के आहे, जो सतत वाढता कल दर्शवत आहे. संपूर्ण देशभरात चाचणी क्षमतेत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून, गेल्या २४ तासांत देशातील एकूण १८ लाख, ३८ हजार, ४९० चाचण्या घेण्यात आल्या.
एकत्रितरित्या, भारताने आतापर्यंत ४१.८२ कोटींपेक्षा जास्त चाचण्या केल्या आहेत. देशभरात एकीकडे चाचणी क्षमता वाढवण्यात आली आहे, तर साप्ताहिक सकारात्मकतेत निरंतर घट दिसून येत आहे. साप्ताहिक सकारात्मकता दर सध्या २.४४ टक्क्यांवर आहे, तर दैनंदिन सकारात्मकता दर आज २.३४ टक्के आहे. सलग २७व्या दिवशी दैनंदिन सकारात्मकतेचा दर पाच टक्क्यांपेक्षा कमी राहिला आहे.