सरकारच्या नाकर्तेपणाने घेतला उच्चशिक्षित स्वप्नील लोणकरचा बळी : अभाविप

    05-Jul-2021
Total Views |

abvp_1  H x W:

 पुणे : पुणे येथील स्वप्निल लोणकर या अभियांत्रिकी चे शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची पूर्व व मुख्य परीक्षा पास होऊन देखील मुलाखत होत नाही व नोकरी लागण्यास वेळ लागतोय या कारणास्तव तणावाखाली येऊन आत्महत्या केली. अभाविप सर्व प्रथम या विद्यार्थ्याला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करते.

गेली दीड वर्ष महाराष्ट्र सरकारच्या वेळकाढू धोरणांमुळे अनेक स्पर्धा परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या किंवा झाल्याच नाहीत. तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला सर्व सदस्य नियुक्त नसल्या कारणास्तव विद्यार्थ्यांच्या मुलाखती रखडलेल्या आहेत. काही विद्यार्थ्यांना सर्व परीक्षा पास होऊन देखील नियुक्त्या मिळालेल्या नाहीत. या सर्व कारणास्तव विद्यार्थी फार मोठ्या तणावाच्या वातावरणात वावरत आहेत.

अनेक विद्यार्थ्यांनी आत्महत्ये सारखा मार्ग देखील स्वीकारला आहे. सरकारकडे याबाबत वारंवार निवेदन देऊन आंदोलन करून अवगत करण्यात येत आहे, तरी देखील सरकार याबाबत दुर्लक्ष करीत आहे. अभाविप स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांनाच्या प्रश्नाला अनुसरून शासनाकडे खालील मागण्या केल्या आहेत:
 
१. महाराष्ट्र राज्य सेवा आयोगाच्या सर्व सदस्यांच्या पूर्णवेळ नियुक्त्या कराव्यात.
२. एमपीएससी संयुक्त पूर्व परीक्षेची तारीख जाहीर करावी.
३. एमपीएससीच्या सर्व नवीन जाहिराती व् त्यांचे वेळापत्रक जाहीर करण्यात यावे.
४. विविध परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना नियुक्त्या देण्यात याव्यात.

“एकूणच महाराष्ट्र सरकारच्या निष्क्रियपणाने आणि इच्छाशक्तीच्या अभावाने स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांवर आत्महत्याची वेळ या शासनाने आणली आहे.” असे मत यावेळी कोंकण प्रदेश मंत्री प्रेरणा पवार यांनी व्यक्त केले. तसेच स्वप्नील लोणकर सारखी वेळ अन्य उमेदवारांवर येऊ नये यासाठी शासनाने अभाविपच्या मागण्यांचा विचार करत त्याची अंमलबजावणी करावी असे देखील पवार यावेळी म्हणाल्या.