वंदनीय केळकर मावशी : राष्ट्र समाजनिष्ठेचा नंदादीप

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Jul-2021   
Total Views |

Kelkar_1  H x W
 
आज दि. ६ जुलै. महान विदूषी अणि सेवाव्रती, प्रचंड संघटन कुशलता आणि तितक्याच निःस्वार्थी लक्ष्मीबाई केळकर अर्थात वंदनीय मावशींची जयंती. ‘नर करणी करे तो नारायण हो जाये’ असे म्हणतात. पण, वंदनीय लक्ष्मीबाई केळकर यांनी कार्यकर्तृत्वाने महिला शक्तीला राष्ट्रशक्ती बनवण्याचा मार्ग प्रशस्त केला आहे.
 
 
ऑगस्ट १९४७चा दुसरा आठवडा. त्यावेळी पाकिस्तानातील सिंधमध्ये जाण्यासाठी उत्सूक असणार्‍या तिथल्या मुस्लिमांचा हिंसेचा क्रूर नंगानाच सुरू होता. प्रचंड रक्तपात... अक्षरशः हिंदूंचे शिरकाण सुरू होते. अशावेळी भारतातून नियोजित पाकिस्तानमधील सिंधमध्ये जाण्याची हिंमत कोण करणार? पण, १३ ऑगस्ट रोजी सिंधमधील महिलांना राष्ट्र सेविका समितीच्या सेविकांना धीर देण्यासाठी लक्ष्मीबाई केळकर अर्थात वंदनीय मावशी कराचीला गेल्या. कराची विमानतळावर त्या आणि त्यांच्यासोबत समितीच्या वेणूताई आणि आणखी दोन-तीन हिंदू भारतीय उतरले. विमानतळावरच नियोजित पाकिस्तानी मुस्लिमांचा जत्था होता. ते ‘खून से लिया पाकिस्तान, लढके लेंगे हिंदुस्तान’ अशा घोषणा देत होते. पण, जराही न भिता वंदनीय मावशी कराचीतल्या त्या भीषण परिस्थितीतून मार्गक्रमण करत तिथल्या सेविकांच्या घरी गेल्या. आईच्या मायेने त्यांना धीर दिला. फाळणीच्या वेळी भारतातील मुस्लीमबहुल वस्तीत जाणेही लोकांनी सोडलेले. तिथे वंदनीय मावशी प्रत्यक्ष पाकिस्तानच्या कराचीत, तेही त्यांच्या स्वातंत्र्यदिनी गेल्या. नुसती कल्पना करा, सिंधच्या त्या सेविकांना काय वाटले असेल? नुसता विचार करूनही वंदनीय मावशींचे धैर्य, निडरता आणि राष्ट्र सेविका समितीच्या सेविकांविषयीचे स्नेहमय नाते चटकन डोळ्यासमोर आणि मनातही उभे राहते. अर्थात, मावशी नेहमी म्हणत की, “समितीशी आपले नाते कसे असावे तर? अपत्यवत. अपत्याचे नाते मातेशी कधीही तुटत नाही, तसेच समितीशी सेविकांचे नातेही असेच असावे न तुटणारे, कोणत्याही बंधनात न राहता स्नेहमय आयामात कायमच चिरंजीव राहणारे.” या अशा वेळी वंदनीय मावशी कराचीला गेल्या. कारण, त्यांना सिंधच्या जेठा देवानी या समिती सेविकेचे पत्र आले होते. त्या पत्रात लिहिले होते की, “आता आम्हाला सिंध सोडावाच लागेल, हे बिलकूल स्पष्ट आहे. कारण, आता आमची मातृभूमी मुसलमानांची भोगभूमी बनणार आहे. आपल्या प्राणप्रिय भारतभूचे विभाजन होण्याआधी आपण एकदा तरी आमच्या इथे यावे. पवित्र सिंधूला साक्षी ठेवून आपल्या महान उपस्थितीत या महान भारत देशाच्या प्रति जबाबदारी निभविण्यासाठी प्रतिज्ञाबद्ध व्हायचे आहे. तुमचे इथे येणे यासाठी जरुरी आहे. फाळणीच्या या अतिकठीण समयी आपल्यासारखे प्रेमदायी, धैर्यदायी मातेच्या उपस्थितीमध्ये आमचे दुःख थोडे कमी होईल आणि भविष्यात कर्तव्याच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी आम्हाला प्रेरणा मिळेल. तुम्ही आमची इच्छा पूर्ण कराल काय?”
 
 
मातृत्व, नेतृत्व आणि कर्तृत्व याचा विशाल संगम म्हणजे वंदनीय मावशी. समिती का, या प्रश्नाचे उत्तर देताना त्या म्हणाल्या की, “व्यक्ती-व्यक्तीवर राजकीय व सामाजिक जीवनाचे संस्कार करून तिला एक अनुशासित सूत्रबद्ध शक्तीचे अंग म्हणून {सद्ध करायचे आहे व अशा सर्व व्यक्तींमध्ये कर्तव्यभावना, परस्पर जिव्हाळा व सहकार्य निर्माण करून एकमताने स्वतःचे व्यक्तित्व विलीन करण्याच्या गुणातून, तसेच स्त्री हीच राष्ट्राची आधारशक्ती आहे, या जाणिवेतून स्त्रीजीवनाच्या स्वतंत्र दृष्टिकोनातून तेजस्वी अशा हिंदुराष्ट्राला पुन्हा जन्म देण्याच्या मातृभावनेतून अखिल देशव्यापी शिस्तबद्ध संघटित सामर्थ्य उभे करावयाचे, ही राष्ट्र सेविका समितीच्या कामाची रूपरेषा आहे.” त्यांनी समितीची ही भूमिका मांडली ती केवळ भाषणबाजी नव्हती, तर त्यांच्या प्रत्यक्ष आयुष्यात आणि सामाजिक आयुष्यातही त्यांनी ती अगदी सचोटीने निभावली. खरंतर ‘{नभावली’ हे म्हणणेही तसे चूकच. कारण, त्यांच्या मते ‘जबाबदारी’ आणि ‘कर्तव्य’ यांची गल्लत करू नये. स्त्री म्हणून कुटुंब, समाज आणि राष्ट्र याबद्दल प्रत्येक स्त्रीने आपले कर्तव्य आनंदाने निभावावे. त्यावेळी सातोळकर महाराजांचे एक वचन त्या सांगत की, “अबला म्हणजे जिच्या बलाची तुलनाच होऊ शकत नाही.”
 
 
वंदनीय मावशी पूर्वाश्रमीच्या कमल भास्कराव दाते. दाते कुटुंब मूळचे सातारचे सुलक्षणी आणि अतिशय संवेदनशील. घरात स्वतंत्र भारताचा विचार रुजलेला, तसाच धर्मभावही रुजलेलाच. त्यामुळेच इंग्रजी शाळेत शिकत असताना येशू देवाचे गोडवे गाणे आणि हिंदू देवतांची निंदा करणे, हे त्यांना अनुभवावे लागले. आपल्या घरी तर देवदेवतांचे पूजन आणि इथे देवतांबद्दल असे विचार. याबद्दल लहानपणीच त्यांनी या शाळेत पुन्हा जायचे नाही, असे ठरवले आणि त्यांनी ते अमलातही आणले. पुढे एतदेशीय शाळेत त्या शिकू लागल्या. त्याकाळी बालवयातच मुलींची लग्न व्हायची. मात्र, काहीना काही कारणामुळे १३वे वर्ष उलटले तरी विवाह झाला नाही. हुंडा हे मुख्य कारण होतेे. तसेच आजूबाजूला विधवा आणि सौभाग्यवतींचे दुःखही त्यांनी अनुभवले. स्वामी विवेकानंद म्हणतात की, “स्त्री आणि पुरुष हे धर्मरूपी गरुडाचे दोन पंख आहेत. त्यामुळे स्त्रियांची उन्नती व्हायलाच हवी.” पंखांची स्थिती असमान असेल तर गरूड कसा झेप घेणार? पण यांनी अनुभवले की, देशातील सर्वधर्मीय स्त्रियांची स्थिती अतिशय खेदजनक होती. तसेच महात्मा गांधींही एकदा म्हणाले होते की, “प्रभू श्रीराम तेव्हाच घरोघरी निर्माण होतील, ज्यावेळी प्रत्येक घरात सीतामाई निर्माण होईल.” सीतामाईमुळेच प्रभू श्रीरामाच्या सर्वगुणसंपन्नतेची फलश्रुती होते. खरेच स्त्री स्वतःची शक्ती ओळखेल, तर ती आयुष्यात कधीच कोणत्याही स्तरावर शोषित होणार नाही. घर, संस्कृती, संस्कार यांच्या भक्कम आधारावर स्त्रीने आपल्या इच्छा-कर्तव्यांची निर्मिती करायला हवी.
 
 
पुढे त्यांचा विवाह पुरुषोत्तमराव केळकर यांच्याशी झाला आणि त्या वर्ध्याला आल्या. पुरुषोत्तमरावांच्या पहिल्या पत्नीचे निधन झाले होते. तिच्यापासून त्यांना अपत्ये. पण, वंदनीय केळकर मावशींनी त्या लहानग्या वयातही सगळे घर सांभाळले. आईविना पोरक्या अपत्यांना आईची उणीव कधीही जाणवू दिली नाही. पती अनेकदा गंभीर आजारी झाले. जमेल त्या प्रयत्नांतून पतीला आजारातून बरे केले. पण, काळाने घाला घातलाच. पतीचे निधन झाले. घराचा पूर्ण डोलारा त्यांना सांभाळावा लागला. जाऊबाई आणि सगळ्या परिवाराला एकत्र बांधत, त्यांनी घराची धुरा सांभाळली. ‘शेतीभातीचे काम एक विधवा काय सांभाळणार’ असे म्हणणार्‍यांना काही न बोलता अतिशय संयत आणि हुषारीने त्यांनी आपले घर, शेतीभाती सांभाळली. मुलांवर चांगले संस्कार केले. त्या काळात विधवांना कोणत्याही मंगलकार्यांत आमंत्रित केले जात नसे. मात्र, वंदनीय मावशी रामायणावर प्रवचन द्यायच्या. विधवांनाही जगण्याचा हक्क आहे, हे समाजासमेार ठासून सांगायच्या आणि तसे वागायच्याही. अस्वच्छ सवर्णापेक्षा स्वच्छ हरिजन केव्हाही घरातल्या किंवा शेतीतल्या कामात कामास ठेवावा, हा निर्णय कुटुंबात पालन करणार्‍या वंदनीय केळकर मावशी. तो काळ १९३०-३५चा बरं का?
 
 
अल्पशिक्षित आणि त्याकाळच्या संस्कृतीनुसार माजघर, स्वयंपाक सांभाळताना वंदनीय केळकर मावशी नेहमीच समाजशील होत्या. डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली. देशभर एक नवी चेतना निर्माण केली. त्या काळात स्त्रियांसाठी धर्म आणि कर्मभावाने काम करणारी कोणतेही निःस्पृह संघटन नव्हते. वंदनीय केळकर मावशींचे सुपुत्र संघाच्या शाखेत जायचे. मुलांची संघशिक्षा पाहून वंदनीय मावशींना वाटले की, मुलीबाळींसाठीही असे प्रशिक्षण असावे. हा विचार मनात न ठेवता त्यांनी तो विचार प्रत्यक्ष पूजनीय हेडगेवार यांना बोलून दाखवला. त्यावेळी डॉ. हेडगेवार म्हणाले की, “सध्या तरी तरुणांसाठी संघशिक्षेचा विचार आहे. महिलांसाठी तसा विचार केला नाही.” यावर वंदनीय केळकर मावशी म्हणाल्या, “म्हणजे स्त्रियांनी स्वतः हा विचार करावा का?” हेडगेवार म्हणाले, “हो!” त्यानंतर १९३६ साली वंदनीय केळकर मावशींनी ‘राष्ट्र सेविका समिती’ची स्थापना केली. त्यासाठी घरचे-दारचे सांभाळून अक्षरशः पायाला भिंगरी लावली. वंदनीय मावशींचे विचार अणि कर्तृत्व पाहून अनेक महिला संघटना त्यांच्याशी जोडल्या गेल्या. जेव्हा बाळासाहेब देवरस सहकार्यवाह झाले, ते वंदनीय मावशींना सर्व क्षेत्र प्रचारकांसह भेटले. म्हणाले, “आपल्या समोर सर्व हिंदुस्थान आहे. कुठे कुठे समितीच्या शाखा काढायच्या ते सांगा. जिथे संघाची शाखा लागेल, तिथे आपण समितीची शाखा निर्माण करू. हे राष्ट्रनिर्माणाचे काम आहे.” यावर वंदनीय मावशी म्हणाल्या, “नाही. तुम्ही एक करा की, जिथे शाखा आहे, तिथल्या सुसंस्कृत आणि सुरक्षित घरांचा संपर्क द्या. आपल्या सेविका तिथे जातील आणि संपर्क करून समितीच्या शाखा निर्माण करतील.” किती मोठी घटना! कारण, दुर्दैव आणि कटू आहे. पण, सत्य आहे की, आजही महिला संघटना पुरुष संघटनांच्या प्रभावळीतून बाहेर आली नाही. पुरुष संघटनेचा एक गट म्हणून त्या काम करतात. पण, वंदनीय मावशींनी संघटन संपर्क आणि सेवेचा हा मंत्र दिला. पुढे माता जिजाऊ, राजमाता अहिल्या होळकर आणि राणी लक्ष्मीबाई यांच्या नावाने प्रचंड सेवाभावी वास्तू वंदनीय मावशींनी उभ्या केल्या. त्यासाठी सेविकांची साथ होतीच. काही वास्तू तर अक्षरशः वैयक्तिक कर्ज काढूनही त्यांनी उभ्या केल्या. वंदनीय मावशींच्या नावावर आज देशभरात कितीतरी सेवाभावी उपक्रम, वास्तू आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघानंतर अत्यंत सेवाभावी आणि राष्ट्रनिर्माणाच्या कार्यात अग्रेसर असलेले, महिलांचे एकमेव संघटन म्हणजे ‘राष्ट्र सेविका समिती.’ वंदनीय मावशी म्हणत की, “मला उच्चशिक्षण घेता आले नाही. मात्र, जीवनशास्त्रात मी पारंगत आहे. तसेच समितीत येणार्‍या भगिनीच आपल्या सेविका नाहीत, तर ज्या समितीत येत नाहीत, त्याही आपल्या सेविका आहेत.” वंदनीय मावशींचे हे उद्गार आज ‘राष्ट्र सेविका समिती’ची प्रत्येक सेविका प्रत्यक्ष जगत आहे. वंदनीय मावशींची स्मृती अशी वास्तवात जीवंत आहे. वंदनीय मावशींच्या कर्तृत्वास प्रणाम!
 
 
@@AUTHORINFO_V1@@