नवी दिल्ली : “‘राफेल’ लढाऊ विमानांच्या करारावरून काँग्रेस आता पुन्हा एकदा खोटेपणा करीत आहे. मात्र, देशातील जनतेला नेमके सत्य माहीत आहे, त्यामुळे काँग्रेस पक्ष आणि खोटेपणा हे समानार्थी शब्द झाले आहेत,” असा टोला भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते डॉ. संबित पात्रा यांनी शनिवारी पत्रकारपरिषदेत लगाविला.
‘राफेल करारा’वरून काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. त्यावर भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते डॉ. संबित पात्रा यांनी प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले की, “फ्रान्समधील एका ‘एनजीओ’ने ‘राफेल’ लढाऊ विमानांच्या कराराविरोधात तेथे तक्रार केली आहे. त्याचा तपास करण्यासाठी तेथे न्यायदंडाधिकार्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र, त्या संपूर्ण प्रकरणाची माहिती न घेताच राहुल गांधी यांनी सुरू केलेले राजकारण अतिशय दुर्दैवी आहे,” असे पात्रा यांनी सांगितले.
“काँग्रेस पक्ष म्हणजे खोटेपणा आणि अफवा यांचा समानार्थी शब्द आहे,” असा टोला पात्रा यांनी लगाविला. ते म्हणाले की, “‘राफेल’विषयी पुन्हा एकदा जनतेमध्ये भ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न काँग्रेस करीत आहे. ‘राफेल करारा’विषयी देशाचे सर्वोच्च न्यायालय आणि ‘कॅग’ने देशातील जनतेपुढे सत्य मांडले आहे. जनतेनेही ते सर्व काही बघितले आहे.
त्याचप्रमाणे २०१९ सालच्या लोकसभा निवडणुकीपूर्वी राहुल गांधी यांनी अशाचप्रकारे जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्याचा काहीही उपयोग झाला नाही. जनतेच्या न्यायालयात पंतप्रधान मोदी यांना प्रचंड मोठा विजय मिळाला आणि पुन्हा भाजपला सत्ता मिळाली. त्यामुळे काँग्रेसचे दावे आता जनता स्वीकारणार नाही,” असेही पात्रा यांनी यावेळी नमूद केले.