अफगाणचे निमंत्रण भारताला

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Jul-2021   
Total Views |

Afganistan- India _1 
आंतरराष्ट्रीय स्तरावर आजमितीस प्रत्येक राष्ट्र विविध समस्यांचा सामना करत आहे. नेहमीचे आंतरराष्ट्रीय राजकारण, समस्या आणि प्रश्न यापलीकडे जात अनेक राष्ट्रांना कोरोनामुळे निर्माण झालेल्या सामाजिक आणि आर्थिक समस्यांचादेखील सामना करावा लागत आहे.


अशावेळी आशियामधील एक महत्त्वाचे आणि ‘सार्क’मधील दखलपात्र राष्ट्र असलेल्या अफगाणिस्तानचा प्रवास मात्र वेगळ्याच दिशेने होत आहे. ही दिशा स्वविकासाची, स्वकर्तृत्वाची आणि सकारात्मक पावले उचलण्याची आहे. तालिबानसारख्या संघटनेच्या सावटाखालून अफगाण बाहेर पडत आहे. सावरत आहे. अमेरिकादेखील तेथून सैन्य मागे घेण्याच्या हालचाली गतिमान करत आहे. अशावेळी आपली प्रगती व्हावी, यासाठी अफगाणिस्तान सरकार आणि तेथील नागरिक हे कसोशीने प्रयत्न करताना दिसून येत आहे.


नुकतीच ‘महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अ‍ॅण्ड अ‍ॅग्रीकल्चर’तर्फे ‘आंतरराष्ट्रीय कनेक्ट’ मालिका सुरु करण्यात आली आहे. या मालिकेअंतर्गत अफगाणिस्तान आणि भारत यांच्यात व्यापार आणि गुंतवणुकीच्या संधी या विषयावर नुकतेच मंथन करण्यात आले. ‘इस्लामिक रिपब्लिक ऑफ अफगाणिस्तान’चे वाणिज्य दूतावास मुंबईतील कॉन्सुल जनरल जाकिया वार्डक यांनी महाराष्ट्रातील व्यापारी व व्यावसायिकांना अफगाणिस्तानमध्ये विविध क्षेत्रांत असलेल्या व्यापाराच्या संधींची माहिती यावेळी दिली. तसेच सर्वांना अफगाणिस्तानमध्ये व्यापार व्यवसाय करण्यासाठी आवाहनदेखील केले.



साकल्याने विचार करता अफगाणिस्तान आणि भारत यांचे नाते समृद्ध होणे, हे दोन्ही देशांसाठी अत्यंत आवश्यक आहे. सन 2020 पर्यंत भारत आणि अफगाणिस्तानमध्ये १.६ बिलियन डॉलरची देवाणघेवाण झाली आहे. तसेच, तालिबानच्या हल्ल्यामुळे अफगाणिस्तानमधील अनेक बांधकामेही धुळीस मिळाली आहेत. त्यामुळे भारतातील बांधकाम व्यवसायासदेखील तेथे उत्तम संधी आहेत. त्याचप्रमाणे केशर, सुकामेवा, फळे आदींबाबत अफगाणिस्तान समृद्ध आहे. त्यामुळे या क्षेत्रातील व्यापारासदेखील तेथे भारतीयांना मोठ्या संधी आहेत.


अफगाणिस्तानचा आजवर म्हणावा तसा मूलभूत विकास झालेला नाही. त्यामुळे तेथे अभियांत्रिकी, शिक्षण, वैद्यकीय आदी क्षेत्रांसाठी मोठ्या संधी आहेत. त्याचप्रमाणे अन्नप्रक्रिया उद्योगाबाबतदेखील अफगाणिस्तानमध्ये अनेक संधी असल्याचे यावेळी सांगण्यात आले. मूलत: अफगाणिस्तानला कच्चा माल, तंत्रज्ञान आणि गुंतवणूक यांची निकड भासत आहे. त्यामुळे त्यांनी भारतीयांना आवाहन करताना आपल्या देशात उद्योग सुरू करण्याचे आमंत्रण दिले आहे. आजवर भोगलेली स्थिती पाहता आता तेथील सरकार आणि नागरिक यांनी स्वविकासासाठी घेतलेला हा पुढाकार निश्चितच कौतुकास्पद आहे.


चाबहार बंदरामुळे भारत, रशिया, इराण, युरोप आणि मध्य आशिया यांना आयात-निर्यात करण्यासाठी चालना मिळणार आहे. या बंदराचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. अफगाण समवेत व्यापारहिताचे महत्त्व लक्षात घेत चाबहार बंदराच्या विकासासाठी भारत सरकार ठोस पावले उचलत आहे, याचा फायदा भारतातील व्यापारी उद्योजकांना येणार्‍या काळात नक्कीच दिसून येईल. अफगाणिस्तानची भूमिकाही भारतासाठी नक्कीच महत्त्वाची आहे. कारण, अफगाणचा विचार करताना पाकिस्तानचा बाजूला सारणे शक्य नाही. भारत आणि अफगाण यांचे नाते समृद्ध आणि अतूट झाल्यास पाकिस्तानला एक प्रकारे चपराक बसण्यास नक्कीच मदत होईल.


तसेच, अरब देशातील चलनवलन करणे भारतासाठी नक्कीच फायद्याचे ठरणार आहे. तसेच, आजमितीस ‘सार्क’च्या दृष्टीने विचार केल्यास ‘सार्क’मध्ये भारत हे एक सक्षम राष्ट्र आहे. तर अफगाणिस्तान हे संघर्षमय राष्ट्र आहे. भारत आणि अफगाणिस्तान यांचे संबंध हे निश्चितच आगामी काळात ‘सार्क’च्या दृष्टीनेही महत्त्वाची भूमिका बजाविणारे आहेत. अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांची जर तुलना केली तर दोन्हीही इस्लामिक राष्ट्रे. दोघांच्याही घरात दहशतवाद फोफावला. मात्र, अफगाणिस्तानने काळाची पावले ओळखली आणि स्वत:च्या विकासावर लक्ष केंद्रित करण्यास सुरुवात केली. याउलट पाकिस्तानने केवळ गरळ ओकण्यातच धन्यता मानली. तेव्हा अफगाणिस्तान हा नक्कीच एक आदर्श म्हणून समोर येत आहे. भारताबद्दल असलेला विश्वास आफगाणिस्तानच्या कृतीतून व्यक्त होत आहे. एखादे राष्ट्र नव्याने उभे राहू इच्छित असेल तर आपणही त्याच्या विकासात हातभार लावावा हीच अफगाणची भूमिका आहे. भारत याबाबत नक्कीच सकारात्मक भूमिका घेईन हीच आशा.




@@AUTHORINFO_V1@@