चीनला गोपनीय माहिती पुरवल्याचा संशयावरून पत्रकाराला अटक
04-Jul-2021
Total Views |

नवी दिल्ली ‘सक्तवसुली संचालनालया’ने (ईडी) दिल्ली येथील मुक्त पत्रकार राजीव शर्मा यास चीनला संवेदनशील माहिती पुरविल्याप्रकरणी ‘पीएमएलए’ कायद्यांतर्गत अटक केली आहे. दिल्ली पोलिसांच्या विशेष शाखेने ६२ वर्षीय राजीव शर्मा यास यापूर्वी शासकीय गोपनीयता कायद्याखाली (ऑफिशियल सिक्रेट्स अॅक्ट) अटक केली होती. ‘ईडी’ने दिल्ली पोलिसांनी दाखल केलेल्या ‘एफआयआर’अंतर्गत तपास सुरू केला होता.
त्यानंतर शर्मा यास ‘ईडी’ने १ जुलै रोजी अटक करून न्यायालयात हजर केले होते. शुक्रवारी न्यायालयाने शर्मा यास सात दिवसांची ‘ईडी’ कोठडी सुनावली आहे. शर्मा याने चिनी गुप्तचर संस्थेला देशाची सुरक्षा आणि संरक्षणसंदर्भातील महत्त्वाची आणि संवेदनशील माहिती पुरविल्याचे पोलीस तपासात पुढे आले होते. त्यासाठी राजीव शर्मा व काही अन्य जण हवालामार्फत पैशाची देवाण-घेवाण करीत होते. त्यासाठी दिल्लीतील महिपालपूर परिसरातील चिनी नागरिकांच्या नावावर असलेल्या बनावट कंपन्यांचा वापर करण्यात आला होता.
राजीव शर्मा याने २०१० ते २०१४ या कालावधीत चिनी सरकारच्या मालकीच्या ‘ग्लोबल टाईम्स’ या वृत्तपत्रात दर आठवड्यात लेख लिहिले होते. भारत-चीन संबंधांसंदर्भात विविध मुद्द्यांवर राजीव शर्मा माहिती पुरवत होता. त्यामध्ये डोकलाम येथे भारताची सैन्यतैनाती, भारत-म्यानमार सैन्यसहकार्य, भारत-चीन सीमावाद या विषयांचा समावेश होता. चिनी गुप्तचराने राजीव शर्मा याच्या चीनदौर्याचाही खर्च केला होता, असेही पोलिसांनी दिलेल्या माहितीमध्ये स्पष्ट करण्यात आले होते.