भारत-इस्रायल गुप्तचर संबंध वृद्धिंगत करण्याची गरज

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    31-Jul-2021   
Total Views |

India Israel_1  
 
 
संरक्षण आणि सामरिक संबंधांशिवाय भारताने इस्रायलबरोबर गुप्तचर संबंध मोठ्या प्रमाणामध्ये वाढवायला पाहिजे. त्यांनी वापरलेल्या यशस्वी पद्धतीचा आपण वापर करून आपल्या देशाच्या आव्हानांना यशस्वीपणे तोंड देऊ शकतो.
 
 
‘पेगॅसस’ या इस्रायलच्या कंपनीने अनेक देशातील राजकीय, सामाजिक, प्रसारमाध्यमे आदी क्षेत्रातील व्यक्तींचे ‘फोन टॅपिंग’ करून हेरगिरी केली असल्याचा अहवाल प्रकाशित करण्यात आला. याआधी २०१९ मध्ये ‘पेगॅसस स्पायवेअर व्हॉट्सअ‍ॅप’च्या माध्यमातून काही महत्त्वाच्या व्यक्तींवर पाळत ठेवत असल्याचे चर्चेत आले होते. या ‘स्पायवेअर’ला इस्रायलमधील कंपनी ‘एनएसओ’ ग्रुपने तयार केले आहे.
 
 
७० देशातील ५१ टक्के वापरकर्ते ‘इंटिलिजन्स एजन्सी’, ३८ टक्के कायदा अंमलबजावणी संस्था आणि ११ टक्के सैन्याशी संबंधित या ‘स्पायवेअर’चा वापर आहे. गुन्हेगारी आणि दहशतवाद रोखण्यासाठी एजन्सी याचा वापर करतात, याद्वारे मोबाईलमधील डेटा गोळा केला जातो, जे गुन्हेगारी किंवा दहशतवादासंबंधी घटनांमध्ये सहभागी आहेत. देशातील सरकार एजन्सीला ‘पेगॅसस’चे लायसन्स देते. ‘पेगॅसस स्पायवेअर’चा वापर करून त्या व्यक्तीचे ‘एसएमएस रेकॉर्ड्स’, ‘कॉन्टॅक्ट डिटेल्स’, ‘कॉल हिस्ट्री’, ‘कॅलेंडर रेकॉर्ड्स’, ‘ईमेल्स’, ‘इन्स्टंट मेसेजिंग’ आणि ‘ब्राऊजर हिस्ट्री’ मिळू शकते. ‘पेगॅसस’ व्हॉट्स अ‍ॅप, व्हायबर, स्काईप आणि ब्लॅकबेरी मेसेंजरचीदेखील हेरगिरी करू शकते, नकळत फोटो काढू शकते, आजूबाजूचा आवाज रेकॉर्ड करू शकते व यूजर्सच्या नकळत स्क्रीनशॉटही घेऊ शकते. हे ‘स्पायवेअर’ काम झाल्यानंतर फोनमधून आपोआप डिलीट होते. हे रिमोटली आणि गुप्तपणे फोनमध्ये ‘इन्स्टॉल’ केले जाते. ७० देशांतील महत्त्वाच्या संस्था, जर हे ‘स्पायवेअर’ गुप्तहेर माहिती करता वापरत असतील, तर हा देश, ही कंपनी आणि हे गुप्तहेर ‘स्पायवेअर’ किती जागतिक दर्जाचे आहे हे लक्षात यावे.
 
 
सध्याच्या गुप्तचर जगात ‘मोसाद’चं स्थान
 
 
सर्व गुप्तचर संघटनांमध्ये अतिशय महत्त्वाचे स्थान मिळवले आहे इस्रायलची गुप्तचर संघटना ‘मोसाद’ने. ट्विन टॉवरवरील हल्ल्यानंतर सगळ्यांत आधी अमेरिकेने बाहेरच्या कोणत्या गुप्तचर संस्थेची मदत घेतली असेल, तर ती ‘मोसाद’ची. अमेरिकेने अनेक दहशतवादविरोधी आराखडे जसेच्या तसे ‘मोसाद’कडून उचलले आहेत.
 
 
‘मोसाद’ने कधी एकटं काम केलं, कधी मित्र बनवले, कधी मित्रदेशांमध्ये घुसूनही काम केले आणि कधी तर हुकूमशहांची साथही दिली. आपल्या देशासाठी जे जे करणं त्यांना योग्य वाटलं, ते ते सगळं त्यांनी केलं.
 
 
आक्रमक, धूर्त, सगळ्यांत मोठे म्हणजे, त्यांची वाटेल तो धोका पत्कारण्याची तयारी, अशी त्यांची प्रतिमा जगभरात आहे. अशी ही धोकादायक मिशन यशस्वी करणरी इस्रायलची गुप्तचर संघटना.
 
 
आंतरराष्ट्रीय राजकारणातील शह-काटशह यांना पुरून उरणारी ‘मोसाद’ ही मूठभर देशाची चिमूटभर संस्था असली, तरी तिच्या कारवाया जगतव्यापी आहेत. आजूबाजूला असलेली अरब शत्रूराष्ट्रे व इस्लामी दहशतवादी अशा अनंत अडचणी आणि प्रतिकूल परिस्थिती असूनही ‘मोसाद’नेच आतापर्यंत इस्रायलला तारले आहे.
 
 
यावर्षी जानेवारी महिन्यात ‘मोसाद’ने इराणची राजधानी तेहरानमध्ये जाऊन इराणच्या अण्वस्त्र प्रकल्पाची माहिती चोरली. एका अणू शास्त्रज्ञाला ठार करुन त्यांचा अणूकार्यक्रम दहा वर्षांनी मागे ढकलण्यात आला. याआधी जनरल सुलेमानीला इराणमध्ये मारण्यात आले. 1960च्या दशकात तर ‘मोसाद’ने रशियाचं नवकोरं ‘मिग’ विमानही पळवलं होतं.
 
 
‘मोसाद’चे अधिकारी पहिल्या दिवसापासून ते शत्रूच्या हत्या करण्यापासून कधीच कचरले नाहीत. देशहित जपताना आंतरराष्ट्रीय कायदे मोडताना ते मागेपुढे पाहत नाहीत. बाहेरचं जग काय म्हणेल याची त्यांना काळजी नव्हती.
 
 
जे देश विजयी ठरलेत, त्या देशांची राजकीय इच्छाशक्ती अतिशय प्रबळ असते. त्यांचे सैन्य शूर आणि सक्षम असते. नागरिक देशभक्त असतात. त्या देशांनी योग्य पद्धतीने योजना आखल्या आणि त्यांची काटेकोर पद्धतीने अंमलबजावणीही केली. त्यांचे गुप्तहेरखाते सक्षम असते.
 
 
‘मोसाद’ काय करते?
 
 
इस्रायलमध्ये सुरक्षेसंदर्भातील घटनांचा गांभीर्याने विचार केला जातो आणि लगेच कारवाईही केली जाते. वेळोवेळी विचार करून गुप्तचर यंत्रणेचे काम अधिकाधिक उत्तम कसे होईल, याकडे लक्ष पुरवले जाते. एकंदर धोका लक्षात घेऊन गुप्तचर यंत्रणेतील अधिकारी, कर्मचार्‍यांची निवड आणि प्रशिक्षण पार पाडले जाते.
 
 
‘मोसाद’च्या अधिकार्‍यांची निवड इस्रायलच्या लष्करामधून करण्यात येते. त्यांच्याकडे विशेष गुण असतील, तर जनसामान्यांमधूनही खास माणसं शोधून काढली जातात, त्याला गुप्तचर म्हणून वावरण्याचं प्रशिक्षण दिलं जातं. ‘मोसाद’मध्ये दाखल होण्याकरिता भाषेची परीक्षा, मानसिक, शारीरिक अशा अनेक चाचण्यांमधून जावं लागतं.
 
 
प्रशिक्षणाची पद्धत
 
 
इस्रायलमध्ये लष्करी प्रशिक्षण अनिवार्य असल्याने सामान्य नागरिकांमध्ये राष्ट्रप्रेमाची भावना पाहायला मिळते. अशा नागरिकांशी कोणताही गाजावाजा न करता संपर्क साधला जातो. ज्या नागरिकांची आपल्या देशासाठी स्वत:चं आयुष्य वेचण्याची तयारी असते, त्यांना या क्षेत्रामध्ये प्राधान्य दिलं जातं. त्यांचा बुद्ध्यांक सामान्यांपेक्षा जास्त असतो. त्यांना अनेक शारीरिक, वैद्यकीय आणि मानसिक चाचण्यांना तोंड द्यावं लागतं. त्यांची मुलाखत ‘मोसाद’चे सगळ्यात वरिष्ठ अधिकारी घेतात. त्यांना प्रत्येक पातळीवर पारखून घेतलं जातं.
 
 
या प्रशिक्षणासाठी दोन वर्षांहून अधिक कालावधी लागतो. या कालावधीमध्ये त्यांना अहवाल लेखनाबद्दल ज्ञान दिलं जातं. गोपनीय संपर्क साधण्याचं तंत्र, तंत्रज्ञानाचा वापर, संवाद साधण्याची कला, इस्रायलसह विविध देशांच्या लष्कराविषयी सखोल माहिती, शस्त्रास्त्रांविषयी माहिती आदी विषयांबद्दल प्रशिक्षण दिलं जातं. प्रत्येक ‘मोसाद’ अधिकार्‍याला अरबी भाषा उत्कृष्टरीत्या बोलता येणं आवश्यक असतं.
 
 
त्यांना विविध माध्यमांचा वापर करून एखाद्यावर नजर ठेवणं, पाठलाग करणं, याचं प्रशिक्षण दिलं जातं. हे सगळं प्रशिक्षण त्यांना विविध पातळ्यांवर, विविध ऑपरेशन्समध्ये मदत करतं. कठोर प्रशिक्षणानंतर या व्यक्ती खास गुप्तचर बनतात.
 
 
भारताला खूप काही शिकण्यासारखे...
 
 
अर्थात, इस्रायलची ही गुप्तचर यंत्रणा किती श्रेष्ठ आहे, याबद्दल फक्त कौतुक करणं हा या लेखाचा उद्देश नाही. इस्रायलच्या कामगिरींमधून भारताला खूप काही शिकण्यासारखे आहे. त्यामधून जर आपल्या गुप्तचर यंत्रणांना, काही शिकता आलं तर आपल्या देशाचं भविष्य अधिक सुरक्षित होऊ शकतं.
 
 
आज आपण देशा समोरच्या धोक्यांना उत्तरं द्यायला किती तयार आहोत?
 
 
देशाच्या धोक्यांसंदर्भात माहिती मिळवणं, त्याचं योग्य विश्लेषण करणं हे काम इतकं अशक्यप्राय आहे का? त्यासाठी आपल्याला काही प्रश्नांची उत्तरं मिळवणं आवश्यक आहे. राष्ट्रीय सुरक्षेसंदर्भात आपले राजकीय पक्ष कधी गांभीर्याने विचार करणार आहेत? एखादी घटना घडून गेल्यानंतर आपण त्याविषयी भरपूर माहिती मिळवू शकतो, विश्लेषण करतो. पण, एखादी दुर्घटना, विघातक कृत्य घडू नये म्हणून आधीपासून आपण तयार का नसतो? त्याची गुप्तचर माहिती योग्य ठिकाणी व्यवस्थितपणे का पोहोचत नाही? गुप्तचर यंत्रणेमध्ये भरती करता अजूनही जुन्या पद्धती वापरत आहोत का? गुप्तचर यंत्रणेला मदत म्हणून विविध क्षेत्रांतल्या तज्ज्ञ व्यक्तींचा उपयोग कितपत केला जातो? अपयश झाकण्याकरिता या विभागांबद्दलची माहिती बाहेर का येत नाही?
 
 
 
इस्रायलबरोबर गुप्तचर संबंध मोठ्या प्रमाणामध्ये वाढवा-
 
 
 
या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण सजगपणे शोधायला हवी, तरच या संपूर्ण यंत्रणेचे डोळे उघडायला मदत होऊ शकते आणि आपल्या देशाला असलेला धोका कमी व्हायलाही!
 
 
थेट युद्धभूमीवर शस्त्रं चालवायला सुरुवात करणं म्हणजे युद्ध नव्हे. प्रत्यक्ष हल्ला करण्यापूर्वी प्रतिस्पर्धी राष्ट्राची युद्धतयारी, त्यांचं बळ याबरोबरच त्या राष्ट्रातील जनतेची मानसिकता, युद्धाला पाठिंबा देण्याची अथवा न देण्याची तयारी, त्या राष्ट्राच्या नेतृत्वाची मानसिकता, युद्धात कठोर व जलद निर्णय घेण्याची क्षमता आणि धैर्य, आर्थिक ताकद, तसेच या युद्धाप्रति अन्य राष्ट्रांचा कल नेमका कोणत्या बाजूला झुकेल आणि या सगळ्या बरोबरच आपल्या देशातील जनतेची मानसिकता, आपली युद्धक्षमता, आर्थिक ताकद या सगळ्याचा अचूक अंदाज घेणे अत्यावश्यक ठरते. या सगळ्यामध्ये महत्त्वाची भूमिका असते ती त्या देशाच्या हेरखात्यांची!
 
 
संरक्षण आणि सामरिक संबंधांशिवाय भारताने इस्रायलबरोबर गुप्तचर संबंध मोठ्या प्रमाणामध्ये वाढवायला पाहिजे. त्यांनी वापरलेल्या यशस्वी पद्धतीचा आपण वापर करून आपल्या देशाच्या आव्हानांना यशस्वीपणे तोंड देऊ शकतो. आपल्याला गरज आहे ती ‘अ‍ॅक्युरेट’ किंवा ‘अ‍ॅक्शनेबल इंटेलिजन्स’ची. आशा करू की, आपल्या गुप्तहेर संस्थांचा येणार्‍या काळात दर्जा वाढेल आणि देशावर होणारे अनेक धोके, हल्ले रोखण्यात आपल्याला नक्कीच यश मिळेल.
 
 
@@AUTHORINFO_V1@@