मनोरंजन; जबाबदारी कुणाची?

    30-Jul-2021
Total Views |

entertainment_1 &nbs
 
 
‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ असा नारा देऊन कोरोनाबद्दल जनजागृती करणार्‍या महाविकास आघाडी सरकारला, मनोरंजनक्षेत्राची जबाबदारी नेमकी कुणाची, याबाबत अद्याप तरी कोणताही निर्णय ठामपणे घेता आलेला नाही. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आणि चित्रपटगृहे, नाट्यगृहे बंद झाली. परंतु, या क्षेत्रावर अवलंबून असणार्‍यांना या काळामध्ये कोणकोणत्या नाहक त्रासाला सामोरे जावे लागले, याची कल्पना राज्यकर्त्यांना बहुतेक नसावी आणि असलीच तरी त्यांनी त्याला फारसे महत्त्व दिले नाही, असेच एकंदरीत म्हणावे लागेल. कला आणि पत्रकारितेचा वारसा सांगणार्‍या शिवसेनेने अद्याप या क्षेत्राला मदतीपासून, न्यायापासून वंचितच ठेवले आहे. मनोरंजन क्षेत्राबाबत कोणतीही ठोस भूमिका न घेता, विविध संस्थांना केवळ आशा आणि आश्वासने देण्याचेच काम या सरकारने आजवर केले. रंगकर्मी, सिनेकलाकार व या क्षेत्रावर सर्वस्वी अवलंबून असणार्‍यांचा सद्यःस्थितीमध्ये होणारा त्रास बघता, नक्की या मनोरंजन क्षेत्राची जबाबदारी कोणाची, असाच प्रश्न उपस्थित होतो. कारण, ‘तुम्ही खबरदारी घ्या, आम्ही जबाबदारी घेतो,’ असा नारा देेणार्‍या ठाकरे सरकारने मनोरंजन क्षेत्रावर पोट असणार्‍यांना मात्र वार्‍यावरच सोडले. राज्य सरकारकडे रंगकर्मींचा आवाज मांडणार्‍या संघटनांनी वेळावेळी निवेदनेही दिली, मागण्या केल्या, पण उपयोग शून्य! कोरोनाकाळामध्ये मनोरंजन क्षेत्रामुळे नागरिकांची मानसिक ताणतणावापासून काहीशी सुटका होण्यास मदत झाली. परंतु, मनोरंजन क्षेत्रावर अवलंबून असणार्‍या प्रत्येकाला टाळेबंदीमध्ये कोणतेही काम हाताशी न मिळाल्याने आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला. ‘असंघटित क्षेत्र’ म्हणवून घेणार्‍या मनोरंजन क्षेत्रातील उलाढाल मागील वर्षभरामध्ये ठप्प झाल्याने, धनिक कलाकारांपेक्षा ज्यांचे पोट रोजच्या कामावर अवलंबून आहे, त्यांच्या जबाबदारीचे काय? की, ही जबाबदारी घेण्यास राज्य सरकार हेतूपुरस्सर टाळाटाळ करत असल्याच्या शंकेला आता सरकारच्या कानाडोळ्यामुळे पुष्टी मिळत आहे. नाट्यक्षेत्र, चित्रपट, मालिका यांच्यावर अवलंबून असणार्‍या कलाकार आणि तंत्रज्ञांना ज्या परिस्थितीला सध्या सामोरे जावे लागत आहे, त्या परिस्थितीबाबत राज्य सरकारला कधी जाग येणार? की याबाबत राज्य सरकार नेहमीप्रमाणे कोणतीही भूमिका न घेता, या क्षेत्राला वार्‍यावरच सोडून देणार? त्यामुळे राज्य सरकारने फक्त आश्वासनांची आतशबाजी न करता, खर्‍या अर्थाने मोठ्या प्रमाणावर मनोरंजन क्षेत्रावर अवलंबून असलेल्यांना नुसता धीर नाही, तर आर्थिक दिलासा देणेही तितकेच गरजेचे आहे.
 
 

बदलत्या माध्यमांचे काय?

 
 
आधुनिक तंत्रज्ञानाच्या प्रसारामुळे त्या-त्या काळातील प्रस्थापित माध्यमांवर, त्यांच्या उपयुक्ततेवर कायम प्रश्नचिन्ह लावण्यात आले. संगणकाच्या उदयानंतर छपाई क्षेत्रामध्ये ज्या पद्धतीने बदल झाले, त्या बदलांमध्ये त्या-त्या काळातील अवलंबून असणार्‍या नागरिकांना त्या बदलांचा मोठ्या प्रमाणात फटका बसला. त्याप्रमाणेच कोरोनाच्या प्रादुर्भावानंतर माध्यमांमध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये बदल झाले व त्यांचा स्वीकार प्रेक्षकांनीही मोठ्या प्रमाणात केला. खासगी मनोरंजन वाहिन्यांवरील नेहमीच्या पठडीतील कार्यक्रमांना कंटाळलेला आणि कोरोनामुळे नवीन कार्यक्रमांच्या थांबलेल्या प्रक्षेपणामुळे बहुतांश वर्ग ‘ओटीटी’ प्लॅटफॉर्मकडे वळला. कोरोनामध्ये नाट्यगृहे, चित्रपटगृहे बंद असल्याने काही कलाकारांनी आणि नागरिकांनी या नव्या माध्यमांचा सहज स्वीकारही केला. या माध्यमांवरील बदलत्या आशयाबाबत प्रेक्षकवर्ग हळूहळू प्रगल्भ होताना दिसत असला, तरी माध्यमांचे बदललेले हे स्वरूप मनोरंजन क्षेत्राच्या आर्थिक बाबींवर कोणत्या प्रकारे प्रभाव टाकत आहे, हा खरा प्रश्न आहे. टाळेबंदीमध्ये चित्रपटामध्ये काम करणार्‍या कलाकारांनाही आता छोट्या पडद्याची निवड केलेली दिसत असून, ते ‘ओटीटी’वर काम करण्यास इच्छुक असल्याचे चित्र आहे. त्यामुळे कोरोनाकाळामध्ये निर्माण झालेली टाळेबंदीची परिस्थिती सध्या माध्यमांमध्ये मोठी स्थित्यंतरे घडवताना दिसते. मोठ्या पडद्यावरील ‘ब्लॉकबस्टर’चा व्यवसाय सद्यःस्थितीत ठप्प झाल्याने आता छोट्या पडद्याच्या ‘कनेक्टिव्हिटी’चा फायदा मोठ्या प्रमाणामध्ये मनोरंजन क्षेत्रालाही एकीकडे होताना दिसतो. परंतु, चित्रपट आणि नाट्यक्षेत्राला पूर्णत: दिलासा कधी मिळणार, याबाबत अद्याप साशंकतेचे वातावरण कायम आहे. त्यामुळे एकूणच या क्षेत्रातील आर्थिक गणिते लक्षात घेता, प्रेक्षकांपर्यंत सहज पोहोचणारे आणि तितकेच रोजगारक्षम माध्यम म्हणून पुन्हा एकदा वाहिन्यांना व ‘ओटीटी माध्यमांकडे कलाकारांपासून ते तंत्रज्ञांपर्यंतचा कल वाढला, तर नवल वाटणार नाही.
 

- स्वप्निल करळे