वनवासी समाजातील उद्योजक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    29-Jul-2021   
Total Views |

dhodi_1  H x W:
 
 
जास्त शिक्षण न झालेला. मात्र, उद्योजकतेचे वारे त्याच्या अंगात असे काही भिनले की, पहिल्या प्रयत्नात कर्जबाजारी होऊनसुद्धा तो पुन्हा उभा राहिला आणि हिंमतीने पुन्हा व्यवसाय उभा केला. अवघ्या दहा हजारांनी सुरू झालेला हा व्यवसाय कोटींची उलाढाल करतो, ही सुखद बाब आहे. हा मुलगा म्हणजे ‘लुविरा फूड्स प्रायव्हेट लिमिटेड’चे अध्यक्ष राजेश धोडी होय.
 
 
तलासरी, पालघर जिल्ह्यातील एक वनवासीबहुल भाग. एकेकाळी या भागातील वनवासी समाजाची परिस्थिती चिंताजनक होती. वनवासींच्या निरक्षरपणाचा फायदा घेऊन धनाढ्य लोक त्यांना आपल्या शेतात राबवून घेत. अनुताई वाघ, गिरीश प्रभुणे यांसारख्या सामाजिक कार्यकर्ते, साहित्यिकांनी या वनवासी समाजाच्या व्यथा आपल्या पुस्तकांतून मांडलेल्या आहेत. नव्वदीनंतर मात्र परिस्थितीत काहीअंशी बदल झाला. भारताने जागतिक उदारीकरणाची धोरणे स्वीकारली. त्याच्या फायद्याचे काही अंश वनवासी समाजालासुद्धा मिळाले. अशाच वनवासी समाजातील शेतकरी कुटुंबातील तो मुलगा. जास्त शिक्षण न झालेला. मात्र, उद्योजकतेचे वारे त्याच्या अंगात असे काही भिनले की, पहिल्या प्रयत्नात कर्जबाजारी होऊनसुद्धा तो पुन्हा उभा राहिला आणि हिंमतीने पुन्हा व्यवसाय उभा केला. अवघ्या दहा हजारांनी सुरू झालेला हा व्यवसाय कोटींची उलाढाल करतो, ही सुखद बाब आहे. हा मुलगा म्हणजे ‘लुविरा फूड्स प्रायव्हेट लिमिटेड’चे अध्यक्ष राजेश धोडी होय.
 
 
तलासरीच्या त्या वनवासी भागात शंकर केदार धोडी शेती करत होते. पदरात होती तीन मुले आणि दोन मुली. सोबतीला खंबीर साथ देत होती अर्धांगिनी काशिबाई. सात जणांच्या कुटुंबांची त्या शेतीवर कशीबशी गुजराण होत होती. या भावंडांमध्ये चौथ्या क्रमांकाचा मुलगा होते राजेश. कष्टाळू, जिद्दी आणि काहीसे लाजाळू स्वभावाचे असे राजेश. पहिली ते चौथी ते जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकले. त्यानंतर दहावीपर्यंत ते तलासरी वनवासी कल्याण केंद्राच्या ठक्कर बाप्पा हायस्कूलमध्ये शिकले. पुढे अकरावी, बारावी तलासरीच्या शासकीय आश्रमशाळेत पूर्ण केली. बारावीनंतर मात्र शिक्षण सोडून त्यांना पोटापाण्यासाठी कामावर जावे लागले.
 
 
तलासरीच्याच एका डेअरीमध्ये त्यांना नोकरी मिळाली. १९९५ साली ते तिथे ‘सुपरवायझर’ म्हणून नोकरी करु लागला. सुरुवातीला अवघे ८०० रुपये पगार मिळत होता. प्रामाणिकपणे तिथे ते नोकरी करू लागले. एक-दोन नव्हे, तर तब्बल आठ वर्षे त्यांनी त्या डेअरीमध्ये नोकरी केली. दुग्धजन्य पदार्थ तयार करण्याचे कौशल्य त्यांनी आत्मसात केले. श्रीखंड, पेढे, बर्फी, आईस्क्रीम, कुल्फी एवढेच काय, अगदी चॉकलेट आणि टॉफीसुद्धा ते दुधापासून बनवू लागले होते. आता ते डेअरी संदर्भात विक्री-विपणनाचे कामदेखील पाहू लागले होते. त्यामुळे अनेक दुकानदार, घाऊक आणि किरकोळ व्यापारी यांच्यासोबत त्यांची मैत्री झाली होती. आपणांस दुग्धजन्य पदार्थ तयार करण्याचे कौशल्य अवगत आहे. याचा उपयोग करुन आपण व्यवसाय सुरू केला तर...?
 
 
या विचाराने राजेशनी तत्काळ काही सामान आणले आणि दुधाचे काही पदार्थ तयार केले. त्यासाठी त्यांनी सात हजार रुपयांचे कर्जदेखील काढले. दुर्दैवाने उद्योजकतेचा हा प्रयोग फसला. अंगावर सात हजार रुपयांचे कर्ज घेऊन राजेशनी पुन्हा नोकरी स्वीकारली. त्याच डेअरीमध्ये ते पुन्हा नोकरीस लागले. नोकरी सोडली तेव्हा त्यांना १८०० रुपये पगार होता. मात्र, त्याच ठिकाणी पुन्हा नोकरी करायला लागले, तर त्यांचा पगार ठरला, १५०० रुपये. खर्‍या अर्थाने हे आर्थिक आणि मानसिक खच्चीकरण होते. पण, दुसरा पर्याय नव्हता. साठ हजार रुपयांचे कर्ज फेडायचे होते. राजेश नोकरी करु लागले.
 
 
२००३ मध्ये राजेश यांचा रिता नावाच्या तरुणीसोबत विवाह झाला. रिता मुंबई पोलीस दलात कार्यरत आहे. विवाह झाल्यानंतर राजेशच्या आयुष्यात आमूलाग्र बदल झाला. पाठीशी खंबीरपणे उभी राहील अशी जोडीदार मिळाल्याने त्यांचा हुरुप वाढला. काही कारणास्तव आपला उद्योजकतेचा प्रयोग फसला, पण पुन्हा उद्योगात उभे राहण्याचे त्यांनी ठरवले. आपल्या पत्नीला त्यांनी आपली कल्पना सांगितली. रिताने राजेशना पूर्ण सहकार्य करण्याचे वचन दिले. दरम्यान, सात हजारांच्या कर्जातून राजेश मुक्त झाले होते. त्यामुळे नवीन आव्हान पेलण्यास ते सिद्ध होते. त्याने नोकरीचा राजीनामा दिला. अवगत असलेले कौशल्य वापरुन त्यांनी श्रीखंड तयार केले. आपल्या ओळखीच्या व्यापार्‍यांना त्यांनी गाठले. या श्रीखंडाचे नमुने चवीसाठी त्यांनी व्यापार्‍यांना दिले. व्यापार्‍यांना श्रीखंडाची चव आणि दर्जा आवडला. व्यापार्‍यांनी हे नमुने आपल्या ग्राहकांना चाचणी करण्यासाठी दिले. ग्राहकांनादेखील श्रीखंड खूप आवडले. नेहमीच्या श्रीखंडापेक्षा त्याची चव ‘हटके’ होती.
 
 
लोकांच्या पसंतीस चव उतरल्याने मोठ्या प्रमाणावर श्रीखंडाची मागणी राजेशकडे आली. पहिली १५ किलो श्रीखंडाची मागणी पूर्ण केल्यानंतर राजेश यांचा आत्मविश्वास बळावला. ‘साई डेअरी फार्म’ नावाने त्यांनी दुग्धजन्य पदार्थांची निर्मिती करुन हे पदार्थ विकण्यास सुरुवात केली. तलासरी, डहाणूच्या पंचक्रोशीत राजेश यांच्या ‘साई डेअरी फार्म’चे नाव दुमदुमू लागले. व्यवसायाचा पसारा वाढत होता. त्याचा व्याप सांभाळण्यासाठी सहकार्‍यांची गरज भासू लागली. यावेळी धोडी भावकीतील काही तरुण राजेश सोबत काम करण्यास पुढे आले. लुएश केशव धोडी, विपुल नाटू धोडी यांच्यामुळे राजेश यांचे व्यावसायिक हात बळकट झाले. या दोघांना घेऊन आधुनिक उद्योजकतेची कास राजेशनी धरली. नावापासूनच सुरुवात झाली. ‘लुविरा फूड्स प्रायव्हेट लिमिटेड’ या नावाने कंपनीचा कायापालट झाला. लुएश, विपुल आणि राजेश यांच्या सुरुवातीच्या आद्याक्षरापासून कंपनीचे नामकरण झाले.
‘लुविरा’ आज ४५ हून अधिक लोकांना रोजगार देते. दररोज ८०० लीटर दूध शेतकर्‍यांकडून विकत घेतले जाते. त्यावर प्रक्रिया करुन दही, श्रीखंड, पनीर, आईस्क्रीम, कुल्फी, मिल्क टॉफीज यांसारखे दुग्धजन्य पदार्थ तयार केले जातात. तसेच फरसाण आणि इतर बेकरी उत्पादनेसुद्धा तयार केले जातात. हे सारे पदार्थ तयार करणारा कारखानादेखील राजेश धोडी यांनी उभारला आहे.
 
 
कोरोनापूर्वी डहाणू येथे चिकू महोत्सव झाला होता. या महोत्सवासाठी जगभरातून माणसे येथे येतात. या महोत्सवामध्ये राजेश धोडी यांच्या कंपनीने भाग घेतला होता. त्यांनी एक दालन उभारुन चिकूपासून बनविलेले कुल्फी, आईस्क्रीम, बर्फी, चॉकलेट्स विक्रीस ठेवले होते. त्याला ग्राहकांचा उदंड प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे या महोत्सवामध्ये राजेश धोडींना उद्योजकतेचा पुरस्कारदेखील मिळाला होता. हा आपल्या आयुष्यातील एक अविस्मरणीय क्षण होता, असे राजेश धोडी म्हणतात. आपला हा उद्योजकीय प्रवास पत्नी रिता यांच्याशिवाय अशक्य होता, असे राजेश धोडी प्रांजळपणे म्हणतात. या दाम्पत्यास गौरव आणि कृत्तिका अशी दोन मुले असून गौरव अभियांत्रिकीचे शिक्षण घेत आहे, तर कृत्तिका नववीमध्ये शिकत आहे. ‘अनंत आमुची ध्येयासक्ती, अनंत अन आशा, किनारा तुला पामराला...’ कुसुमाग्रजांनी रचलेले हे कोलंबसाचे गर्वगीत राजेश धोडी यांच्या उद्योजकीय प्रवासाला चपखल बसते.
 
 
@@AUTHORINFO_V1@@